आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध दारू विक्री, व्याजाच्या पैशांवरून महिलांत हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- व्याजाने घेतलेले पैसे आणि अवैध धंद्यावरून महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता मेहरूण परिसरात घडली. यात घरातील साहित्याची तोडफोड आणि पैसे लुटून नेले. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना माध्यम प्रतिनिधीला धक्काबुक्की झाल्याने कॅमेऱ्याचेही नुकसान झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


दीपा नेतले (वय ३६, रा.महादेव मंदिराजवळ, मेहरूण) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी १० वाजता शिवसेनेच्या महिला उपमहानगरप्रमुख मनीषा पाटील, कोकिळाबाई नाथ, आशाबाई नाथ या घरी आल्या. आम्ही महिला मंडळाच्या सदस्या असून तू अवैध दारू विक्री करीत असल्याचे सांगत त्यांनी घरात घुसून तोडफोड केली. कपाटातील हजार रुपये लुटून नेले. याप्रकरणी तिघांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दरम्यान, सकाळी शिवसेनेच्या महिलांनी महादेव मंदिर परिसरात रस्त्यावर अवैध दारूची विक्री होणाऱ्या दुकानातील दारूच्या बाटल्या फोडल्या होत्या. तसेच कोकिळाबाई नाथ (वय ४५, रा.रामेश्वर कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दीपा कंजर यांच्याकडून २५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. हे पैसे काही दिवसांपूर्वीच त्यांना परत केले होते. तरीदेखील तिने मुलगा अनिल नाथ याची फाफडा विक्रीची हातगाडी शुक्रवारी रात्री जप्त करून त्याला मारहाणदेखील केली होती. याप्रकरणी शुक्रवारी रात्रीच अनिल याच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.मुलाची हातगाडी सोडवण्यासाठी गेलो असता दीपा नेतले, लक्ष्मी कंजर (पूर्ण नाव माहित नाही), लक्ष्मीचे दोघे मुले, मुत्ती कंजर (पूर्ण नाव माहित नाही) मुन्नीचा मुलगा आणि मुलगी यांनी मारहाण केली. या घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्यांना मारहाण करणाऱ्यांनी कोकिळाबाई यांचे घर गाठून संसारोपयोगी साहित्याची तोडफोड केली. याप्रकरणी कोकिळाबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपा यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिस ठाण्यातही घातला गोंधळ 
तांबापुराभागात झालेल्या या गोंधळानंतर दोन्ही गट एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोहोचले होते. येथे देखील काही महिला कॅमेरामनच्या अंगावर धावून आल्या. त्यांना अडवणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांसोबत देखील महिलांनी धक्काबुक्की केली. दारू, व्याजाचे पैसे या अवैध धंद्यांमुळे हा वाद झाला असून देखील महिलांनी पोलिस ठाण्यात ‘धटिंग’ सुरूच ठेवली होती. 


खासगी भांडणाचा गैरफायदा 
शिवसेनेच्या महिला पदाधिकारी तांबापुरा भागात अवैध दारूची दुकाने बंद करण्याची कारवाई करीत असल्याचा निरोप मिळाल्यानंतर स्थानिक वृत्त वाहिनीचा एक कॅमेरामन घटनास्थळी पोहोचला होता. त्याने व्हिडिओ चित्रण करण्यास सुरुवात करताच जमावाने त्याच्यावर हल्ला चढवला. यात त्याच्या कॅमेऱ्याचे नुकसान झाले. दोन गटातील पैशांच्या व्यवहारातून हा वाद उद््भवला; खासगी भांडणात दुसऱ्या गटावर दबाव टाकण्यासाठी माध्यमांचा गैरफायदा घेण्याचा प्रकार या घटनेतून समोर आला. पोलिसांनी संपूर्ण चौकशी केल्यानंतर दोन्ही गटांमध्ये असलेला वाद समोर आला. त्यामुळे दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीनुसार परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...