आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदाही देशी कापूस बियाण्यांच्या विक्रीवर शासनाची बंदी कायम; कृषी विभागाला अद्यापही आदेश नाहीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बोंडअळीचा प्रादुर्भाव न होणाऱ्या व भरघोस उत्पादन देणाऱ्या देशी कापसाच्या बियाण्यांच्या विक्रीवरील बंदी उठवण्याची मागणी सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील आमदारांनी केली होती. याबाबत कृषिमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरही याबाबत अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नसून यंदाही ही बंदी कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या बियाण्यांची खरेदी शेजारील मध्य प्रदेश राज्यातून करावी लागणार आहे. 


बोंडअळीचा प्रादुर्भाव न होणाऱ्या व भरघोस उत्पादन देणाऱ्या देशी कापसाच्या बियाण्यांच्या विक्रीबाबत असलेली बंदी उठवण्यात यावी. हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत जिल्ह्यातील आमदारांनी सलग दुसऱ्या वर्षी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, गेल्या वर्षाप्रमाणे पालकमंत्र्यांनी यंदाही त्यांना केवळ आश्वासन दिले. देशी कापसाचे बियाणे उपलब्ध करून देण्याबाबत कृषी विभागाला अद्याप शासनाच्या आदेशाची प्रतीक्षाच आहे. गेल्या वर्षीही आमदारांनी पालकमंत्र्यांकडे याबाबत मागणी केली होती. त्या वेळी त्यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्यासोबत मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, पालकमंत्र्यांच्या आश्वासनानुसार बैठकच झाली नाही. गेल्या वर्षी या बियाण्यांवरील बंदी कायम होती. यंदाच्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला हाेता. आमदार किशोर पाटील, हरिभाऊ जावळे यांनी हा मुद्दा पालकमंत्र्यांकडे उपस्थित केला. स्वत: पालकमंत्री व आमदार एकनाथ खडसे यांनी बैठकीतून थेट कृषिमंत्र्यांशी या विषयावर संवाद साधला. कृषिमंत्री व त्यांचे सचिव यांच्यासोबत मुंबईत हाेणाऱ्या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली होती. मात्र, अद्याप त्याबाबत शासनाने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. 


देशी कापूस बियाणे असलेल्या स्वदेशी-५ या कंपनीचे १५ हजार पाकिटे जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत झालेल्या विषयानुसार कापसाच्या देशी बियाण्यांची जिल्ह्यात विक्री करण्याबाबत कृषी विभागाला अद्याप कोणतेही आदेश प्राप्त नाहीत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २१ मे नंतर सर्व प्रकारची बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी

बातम्या आणखी आहेत...