आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मा पाटील आजोबांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका; उद्धव ठाकरेंकडून कुटुंबियांना आर्थिक मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे/ मुंबई- दोंडाईचा येथील सोलर पार्क (पूर्वीचा औष्णिक) प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने मंत्रालयात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या धर्मा पाटील (वय-80,रा. विखरण, ता.शिंदखेडा) यांची रविवारी (ता.28) रात्री प्राणज्योत मालवली. 22 जानेवारीपासून त्यांची मृत्यूसोबत झुंज सुरु होती. अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

 

सरकारी यंत्रणेने घेतला धर्मा पाटील यांचा बळी...

संपादीत केलेल्या शेतजमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी धर्मा पाटील गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाचे उंबरे झिजवत होते. मात्र, सरकारी यंत्रणेकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकरी धर्मा पाटील यांनी अखेर मंत्रालयात विष प्राशन करून स्वतःला संपवले. धर्मा पाटील आजोबांचा खून झाला आहे, सरकारी यंत्रणेने त्यांचा बळी घेतला आहे, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

 

धर्मा पाटील आजोबांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका..

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी रुग्णालयात जाऊन धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांच्याकडे आर्थिक मदत पोहोचवली. दुसरीकडे, शिवसेना धुळे व नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी थेट विखरण गावी जाऊन धर्मा पाटील यांच्या घरी धाव घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, नंदुरबार संपर्क संघटक शालिनी देशपांडे, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनावणे, तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, छोटु पाटील व मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले होते.

 

संतप्त गावकर्‍यांचे रास्तारोको...

धर्मा पाटील यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच धुळे जिल्ह्यातील विखरण येथील संतप्त गावकऱ्यांसह शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक तास रास्ता रोको आंदोलन करून सरकारविरोधात आपला राग व्यक्त केला. धुळे- दोंडाईचा मार्गावर हे आंदोलन करण्‍यात आले. आंदोलकांनी सरकारी अनास्थेचा निषेध केला. सरकारने प्रकल्पासाठी जमिनी संपादीत केल्या आहेत त्याला योग्य मोबदला दिलाच पाहिजे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. पोलिसांनी काही शेतकर्‍यांना ताब्यात घेतले आहे.

 

मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंबियांचा इशारा...

धर्मा पाटील यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेत नाही, अशा शब्दात धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांनी जे.जे. रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरु केले आहे.

 

आत्महत्या केलेल्या वडिलांना योग्य न्याय मिळेपर्यंत मृतदेह रुग्णालयातून हलवणार नाही, अशी भूमिका धर्मा यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी घेतली. धर्मा पाटील यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. मात्र, पाटील यांच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा सोमवारीही कायम ठेवला आहे.

 

प्रकरण सरकारच्या अंगलट येणार?

हे प्रकरण अंगलट येणार असे दिसताच सरकारने घाईघाईत पत्रकार परिषद घेत, या प्रकल्पात जमिनी गेल्याल्यांना मोबादला देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी असे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे. पुढील 30 दिवसांत  संपादीत जमिनीचा मोबदला व्याजासह शेतकर्‍यांना दिला जाईल, असेही बावणकुळे यांनी सांगितले आहे.

 

5 एकर जमिनीच्या बदल्यात केवळ 4 लाख..

धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली.

 

धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडे होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला.

इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला. मात्र त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केले होते.

 

धर्मा पाटलांच्या विषप्राशनानंतर जाग आलेल्या सरकारने पाटील यांच्या कुटुंबियांना 15 लाखाचे सामुग्रह अनुदान देऊ केले होते. मात्र अनुदान नको, आम्हाला मोबदला द्या, अशी मागणी लावून पाटील कुटुंबाने धरली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... धर्मा पाटील यांच्या निधनानंतर  धुळ्यात रस्त्यावर उतरलेल्या संतप्त शेतकर्‍यांचे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...