आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेरमध्ये लुटेरी दुल्हन..शेतकरी कुटुंबाकडून पैसे उकळून 2 वधू रफुचक्कर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- मधल्या काळात जवळपास सर्वच समाजात मुलींचा जन्मदर कमी झाल्याने आता विवाहयोग्य झालेल्या मुलांना वधू मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. विवाहाच्या प्रतिक्षेत मुले वाममार्गाला जात आहेत. शेतकरी मुलांची तर अतिशय बिकट परिस्थिती असून दलालांकडून अनेकांची फसवणूक होऊ लागली आहे. असाच प्रकार तालुक्यातील मारवड आणि धार येथे घडला असून पैसे लाटून दोन वधुंनी पलायन केल्याने पच्छातापाची वेळ शेतकरी कुटुंबियांवर आली आहे.

 

मारवड आणि धार येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विवाहयोग्य मुलांना वधुचे मिळत नसल्याने मुलांसह आई-वडील ही बेचैन झाले होते, अखेर मुलांचे भविष्य लक्षात घेता समाजाचा नाद सोडून आंतरजातीय विवाहाचा निर्णय मुलांच्या पालकांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने सुरुवातीला मारवड येथील शेतकरी कुटुंबाने मालेगाव येथील दलालांच्या संपर्क साधला. दलालांनी देखील चांगले गिर्हाईक मिळाल्याने ही संधी न गमावता आर्थिक बोलणी करून दोन ते तीन दिवसांतच बुलढाणा जिल्ह्यातील मुलींचे स्थळ सुचविले. मुलगी देखणी असली तरी विवाहाची घाई असल्याने मुलाने व कुटुंबाने तातडीने होकार दिला, दलालाने दीड लाखाचा आकडा फेकून हा विवाह निश्चित केला. 18 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्‍यात आली. विवाह जुळल्याने शेतकरी कुटुंबात कमालीचा आनंद होता.

 

धार येथील शेतकरी कुटुंबास ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही आशेपोटी मारवड येथील कुटुंबियास संपर्क साधून आपल्या मुलाचा विवाह जुळविण्यास मदत करण्याची विनंती केली. त्यांनीही गावशेजारी या नात्याने त्या दलालाशी संपर्क करून दिला. दलालाने बुलढाणा जिल्ह्यातीलच एक स्थळ आणून 1 लाख 30 हजार रुपयांत विवाह निश्चित केला. या लग्नाची 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली आणि अखेर पाहुण्यांच्या साक्षीने मारवाड येथील मुलाचा तेथील देवस्थानावर तर धार येथील मुलाचा अमळनेर येथील वर्णेश्वर मंदिरावर विवाह पार पडला. दोन्ही विवाहात एकच दिवसांचे अंतर होते. दोघे विवाहात वर मंडळींनी लाखोंचा खर्च केला. 


दोन्ही ठिकाणी सत्यनारायण महापूजा झाल्यानंतर वधू व वर एकरूप होण्याआधी दोन्ही वधुंनी आमच्याकडे गावावर सैलानी बाबांची यात्रा असून विवाहासाठी आमच्या कुटुंबियांनी नवस मानला होता, यामुळे यात्रेत नवस फेडल्यानंतर सुखी संसाराला सुरुवात करू असे सांगितले, यामुळे दोन्ही कुटुंबे भावनिक दृष्टया यासाठी तयार देखील झाले, मारवड येथील वर मुलगा आपल्या वधुसह यात्रेत पोहोचला तर धार येथील वधूला तिचा भाऊ यात्रेसाठी सोबत घेऊन गेला. इकडे मारवड येथील पती-पत्नी सोबत फिरून यात्रेचा आनंद घेत असताना अचानक त्या वधुने आपल्या पतीला एका ठिकाणी थांबवून त्या ठिकाणी असलेल्या तिच्या नातेवाईकांसोबत पळ काढला. तीन- चार तास झाले तरी पत्नी न परातल्याने घाबरलेल्या मुलाने मारवड येथे घरी फोन केला. त्यांच्या वडिलांना लागलीच हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी मुलावर काही आघात नको म्हणून काहीही न करता ताबडतोब घरी निघून येण्याचा सल्ला दिला. यामुळे तो मुलगा तातडीने घरी पोहोचला. दुसरीकडे धार येथील वधु आठ ते पंधरा दिवस उलटूनही परतली नाही. मुलाच्या वडिलांनी फोन केला असता मुलगी आजारी असल्याचे कारण ते सांगत राहिले. अखेर दोन महिन्यानंतर मुलाच्या वडिलांनी बुलढाणा जिल्ह्यातील त्यांचे गाव गाठून विचारणा केली असता मुलीने आजारपणाचे ढोंग केले आणि लवकरच पाठवू असे आश्वासन त्यांना दिले. आशेपोटी ते खाली हात परतले. मात्र आज चार महिने उलटूनही मुलगी सासरी न आल्याने शेतकरी कुटुंब अवस्था आहे.
 

दलालांनी विवाह लावणे एक धंदाच केला असून त्यांच्या माध्यमातून एका मुलीचे आठ ते दहा विवाह लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमळनेर तालुक्यासह जिल्हा व राज्यात फसवणुकीच्या अनेक घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता नागरिकांनी सतर्क होण्याची गरज आहे. दलालांमार्फत अशा पद्धतीने विवाह लावायचाही असल्यास आधी संबंधीत व्यक्ती व कुटुंबाची संपूर्ण माहिती घ्यावी. तसेच नोंदणी अथवा रजिस्टर पद्धतीने विवाह करावा. विवाहाचे संपूर्ण फोटो सेशन आणि व्हिडिओ चित्रिकरण करावे. असे केल्याने दलाल आणि अशा फसव्या प्रकाराला चाप बसू शकेल. 

बातम्या आणखी आहेत...