आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले..माय लेकीचा झाला चेंदामेंदा, वडील गंभीर जखमी Two Died In Major Road Accident In Jalgaon One Injured

मदतीची याचना करत अर्धा तास पत्नी, मुलीच्या मृतदेहाजवळ बसून हाेता जखमी पिता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव-धुळे महामार्गावरील एकलग्नजवळ मंगळवारी कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात रस्त्यावर काेसळलेल्या माय-लेकीच्या डाेक्यावरून कंटेनरची चाके गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. थरकाप उडवणारे हे दृष्य पाहून एकलग्नचे गावकरी, रस्त्यावरील वाहनचालक सुन्न झाले. पाेलिसांचे मदत कार्य न मिळाल्यामुळे सुमारे अर्धातास दोघे मृतदेह रस्त्यावर पडून होते. तर जखमी सुखदेव पाटील हे मृतदेहांजवळ बसून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करून मदतीची याचना करत हाेते. त्यांच्या खिशातील डायरीवरून चुलतभावाच्या माेबाइलवर संपर्क साधून या अपघाताची माहिती देण्यात अाली. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिका पाठवली. त्यातून दाेघे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात अाणण्यात अाले. 


पाचाेरा तालुक्यातील वडगाव (सतीचे) येथील मूळ रहिवासी असलेले सुखदेव अाेंकार पाटील हे गेल्या २५ वर्षांपासून खासगी नाेकरीच्या निमित्ताने जळगावच्या रामेश्वर काॅलनीत राहतात. कामतवाडी (ता. पारोळा) येथून नातेवाइकांची भेट घेऊन दुचाकीने जळगावात येताना त्यांच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता ही घटना घडली. अपघातात त्यांच्या पत्नी संगीताबाई व मुलगी काजल यांचे चेहरे छिन्न-विछिन्न झाले होते. घटनास्थळीच त्यांचा करून अंत झाला. पाटील यांना मुका मार लागल्यामुळे ते शुद्धीवर होते. मुलीच्या मृतदेहाजवळ बसून ते तिला उठवण्याचा प्रयत्न करीत होते. दोन-तीन वेळा त्यांनी मुलीस काजल-काजल म्हणून आवाज दिला. हात लावून जागे होण्याचे सांगितले. पण ती प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी हंबरडा फाेडला. एकलग्न येथील गावकऱ्यांनी पाटील यांची समजूत काढली. आपण सर्वांना दवाखान्यात घेऊन जाऊ, असे सांगत गावकऱ्यांनी पाटील यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. 


यानंतर गावकऱ्यांनी पाटील यांच्याकडूनच मिळालेल्या मोबाइल क्रमांकावर फोन करून जळगावातील त्यांचे चुलत भाऊ सुरेश पाटील यांना घटनेची माहिती दिली. सुमारे अर्धा तास पाटील मृतदेहांजवळ बसून होते. या वेळी नागरिकांनी महामार्ग व एरंडोल पोलिसांना फोन करून माहिती दिली. परंतु, पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. सरकारी कामाप्रमाणे पोलिसांनी घटनेच्या गांभिर्याकडे दुर्लक्ष केले. अखेर जळगावातून सुरेश पाटील यांनी रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवली. तर जखमी पाटील यांना खासगी वाहनातून रुग्णालयात आणावे लागले. भररस्त्यावर तरुण मुलगी, पत्नीचा छिन्न-विछिन्न मृतदेह पाहून पाटील सुन्न झाले होते. काय करावे हेच त्यांना उमजत नव्हते. स्वत:च्या अंगावर झालेल्या जखमांचे रक्त हाताने पुसून ते सावरत होते. नागरिकांनी त्यांना धीर दिला. जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात आणल्यानंतर ते बेशद्ध झाले. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. 

 

मुलीने दिली हाेती एम.काॅमची परीक्षा 
पाचोरा तालुक्यातील वडगाव सतीचे येथील पाटील कुटुंबीय २०-२२ वर्षांपासून जळगावात आले आहे. पाटील सुरक्षारक्षक असून त्यांच्या पत्नी गृहिणी होत्या. तर मुलगी काजल हिने गेल्या महिन्यातच एम.कॉम.ची परीक्षा दिली होती. मोठा मुलगा कल्पेश (वय २५) हा देखील चांगले शिक्षण घेऊन सध्या आरटीओ कार्यालयात एजंटचे काम करीत आहे. उच्चशिक्षित असलेल्या काजलच्या लग्नासाठी चांगली स्थळेदेखील येऊ लागली होती. यंदा काजलच्या लग्नाचा मानस होता. घरात मंगलमय वातावरण होते. त्या अनुषंगाने पाटील हे नातेवाइकांच्या मदतीने काजलसाठी उच्चशिक्षित, समजूतदार मुलाचा शोध घेत होते. परंतु, मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी अपघातात काजलसह तिची आई संगीताबाईंचा मृत्यू झाला. पाटील कुटुंबातील दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली. 


तासभर महामार्ग राेखला 
अपघातानंतर जमावाने तासभर महामार्गावर वाहतुक राेखली. महामार्ग पाेलिसांचे वाहन तेथे अाल्यानंतर त्याच्या टायरची हवा साेडून राेष व्यक्त केला. दरम्यान, या अपघाताची माहिती सुखदेव पाटील यांच्या मुलास माेबाइलवर कळवण्यात अाली. घटनास्थळी पाेहाेचताच त्याने हंबरडा फाेडल्याने उपस्थितांचे अंत:करण द्रवले. 


महामार्ग अरूंद, अपघात वाढले 
महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. रहदारीच्या तुलनेत या महामार्गाची रुंदी खूपच कमी आहे. परिणामी महामार्गावर दररोज अपघात होत असतात. जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करणे अत्यंत गरजेचे असताना हा विषय थंड बस्त्यात पडून आहे. काजल व संगीताबाई पाटील यादेखील अरुंद व धोकादायक महामार्गाच्या बळी ठरल्या आहेत. 


रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी 
घटनेची माहिती कळताच पाटील यांच्या नातेवाइकांसह रामेश्वर कॉलनीतील नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच गर्दी केली होती. थरारक अपघाताचे वर्णन ऐकून तसेच मृतदेह पाहुन नागरिकांना अश्रू अनावर झाले होते. भांबावलेल्या अवस्थेत रुग्णालयात पोहचलेला मुलगा कल्पेशने मृतदेह पाहताच आक्रोश केला. एकीकडे आई-बहिणीचे मृतदेह तर दुसरीकडे गंभीर जखमी असलेल्या वडिलांवर उपचार सुरू होते. अशा परिस्थितीत अवसान गळालेल्या कल्पेशला मित्र, नातेवाइकांनी धीर दिला. दरम्यान, पाेलिसांचे पथक मदतकार्यासाठी तातडीने पाेहाेचले असते तर पसार झालेल्या कंटेनरचालकाच्या मुसक्या अावळल्या गेल्या असत्या, असा सूर घटनास्थळी उमटला. 


बांभाेरीच्या दुचाकीस्वार तरुणास कंटेनरने चिरडले 
बांभारीत राहणारे अनिल नन्नवरे हे नारायणगाव (पुणे) येथे एसटी बसचालक आहेत. ते सोमवारी चुलत भावाच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बांभाेरी गावात आले होते. तर मंगळवारी पुन्हा पुण्यास जाणार होते. खासगी कामाच्या निमित्ताने त्यांनी मंगळवारी ऐवजी बुधवारी पुण्यास जाण्याच बेत केला होता. तत्पूर्वी त्यांच्यावर काळाने घाला घातला. 


नन्नवरे हे मंगळवारी सायंकाळी खासगी कामासाठी पाळधी येथे दुचाकीने गेले होते. परत येताना एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समोर वाहतुक कोंडीतून मार्ग काढत असताना रात्री ८ वाजता कंटेनरने त्यांना धडक दिली. यात ते रस्त्यावर कोसळून कंटेनरच्या चाकात गुंडाळले गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर नागरीक घटनास्थळी जमले होते. नन्नवरे यांचा मृतदेह खासगी वाहनातून जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आला. संतप्त नागरीकांनी कंटेरनरच्या काचा फोडल्या. नन्नवरे यांच्या पश्चात पत्नी कल्पना, मुलगा मोहित, मुलगी लक्ष्मी, आई-वडील, दोन भाऊ व एक बहिण असा परिवार आहे. 


सुटीवर गावी अाले असताना अपघात 
रात्री ८ वाजता पाळधीकडून बांभाेरी गावात येत असताना महामार्गावर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली होती. याच कोंडीतून दुचाकीने मार्ग काढत नन्नवरे निघाले होते. १० टायरच्या कंटेनरजवळून जात असताना कंटेनरचालकाने त्यांना धडक दिली. यात ते रस्त्यावर पडल्यानंतर मागच्या चाकात अडकून मरण पावले. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...