आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंना बदनामीची धमकी देणारा नगरसेवक औरंगाबादेतून अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- माजी मंत्री एकनाथ खडसे, त्यांचे कुटुंबीय आणि जळगाव जिल्ह्यातील यावलचे नगरसेवक अतुल पाटील यांची बदनामी करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या यावलच्या नगरसेवकाला रविवारी औरंगाबादमध्ये ताब्यात घेण्यात आले. 


या गुन्ह्यातील संशयित तथा नगरसेवक सुधाकर आनंदा धनगर याने खडसे कुटुंबीयांसह अतुल पाटील यांची बदनामी करण्यासाठी ऑडिओ क्लिप तयार केली होती.  यावल नगरपालिका विषय समित्यांच्या निवडीत व्हीप झुगारल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अतुल पाटील यांनी अपात्रतेची तक्रार केल्याचा आनंदा धनगरला संशय होता. त्यामुळे धनगरने क्लिप प्रसारित करण्याची धमकी देत अतुल पाटील यांच्याकडून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. 
नगरसेवक अतुल पाटील यांनी गुरुवारी (दि.८)  धनगरला खंडणीपोटी १० हजार रुपये दिले आणि उर्वरित ४० हजार रुपये नंतर देण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी शनिवारी रात्री अतुल पाटील यांनी यावल पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार नगरसेवक धनगर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी करत आहेत. 

 
अशी झाली कारवाई  
संशयित धनगर याचा औरंगाबादमध्ये वॉटर प्लँटचा व्यवसाय आहे. त्यामुळे तो औरंगाबादमध्येच स्थायिक आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी यावल पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक अहिरे, हवालदार सुशील घुगे, राहुल चौधरी, सतीश भोई, प्रशांत ठाकरे यांचे पथक खासगी वाहनाने रविवारी पहाटेच्या सुमारास औरंगाबादला आले होते. सकाळी ६.३० वाजता औरंगाबादच्या म्हाडा कॉलनीतील गल्ली क्रमांक तीनमधील निवासस्थानातून आनंदा धनगरला पोलिसांनी ताब्यात घेतले. दुपारी त्याला यावलमध्ये नेण्यात आले.  

 

वादग्रस्त कारकीर्द  
नगरसेवक सुधाकर धनगरची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. भाजयुमो पदाधिकाऱ्याला धमकी दिल्याने त्याच्यावर यापूर्वी दोन अदखलपात्र गुन्हे नोंदवण्यात आले होते. तसेच पालिका कर्मचाऱ्यासोबत झालेल्या वादाचे प्रकरणदेखील गाजले होते.

 

क्लीप प्रसारीत करीत उकळली खंडणी
 8 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता यावल शहरातील हॉटेल पूर्णब्रह्मा समोर फिर्यादीच्या मोबाईलवर आरोपीने फिर्यादी व माजी मंत्री एकनाथराव खडसे त्यांच्या कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरून रेकॉर्डींग क्लीप तयार करीत 50 हजारांची मागणी केली होती तर त्यांनी फिर्यादीने आरोपीस दहा हजार रुपये दिले होते. तसेच आरोपीने पुन्हा आठ ते दहा दिवसात उर्वरीत 40 हजारांची रक्कम न दिल्यास हात-पाय तोडून टाकण्याची धमकी देत रेकॉर्डींग क्लीप प्रसिद्धीस देईल, अशी धमकी दिली होती. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी औरंगाबादकडे पसार झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी व सहकार्‍यांनी त्याच्या रविवारी पहाटे मुसक्या आवळल्या. पोलिस पथक आरोपीला घेऊन यावल येथे दुपारी 12 वाजेच्या सुमारास पोहोचले. सध्या आरोपीची वैद्यकिय तपासणी सुरु आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...