आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यावर शाई फेकायला गेले; बाटलीच उघडली नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - गेल्या तीन वर्षांत किती वीज मीटर बदलले याची माहिती मिळत नसल्याने युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी वीज कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचे ठरविले. आंदोलनाची पोलिसांना पूर्वकल्पना दिली. पोलिस आल्यावर पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी. एच. मचिये यांच्या दालनासमाेर ठिय्या आंदोलन सुरू केले. या वेळी मचिये यांच्या अंगावर शाई फेकण्यासाठी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बाटली काढली; परंतु या बाटलीचे झाकणच उघडले नाही. या वेळी पोलिसांनी शाईची बाटली ताब्यात घेतली. त्यामुळे युवक काँग्रेसचे 'शाई फेको' आंदोलन फसले. 

 

वीज कंपनीतर्फे जुने घरगुती मीटर बदलण्यात आले. शहरात जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत किती ग्राहकांचे मीटर बदलले याची वर्षनिहाय माहिती युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वीज कंपनीकडे मागितली होती. या विषयी कार्यकारी अभियंता के.डी. पावरा यांना निवेदन देण्यात आले होते. हा विषयी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अभियंता पी.एच. मचिये यांच्या अखत्यारित असल्याने युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडेही माहिती मागितली होती. माहिती न मिळाल्याने युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मचिये यांच्या दालनात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युवक काँग्रेसचे अध्यक्ष नीलेश काटे, इम्तियाज पठाण, रफिक शाह, महिला जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, तौसिफ खाटीक, पंकज चव्हाण, हरीश पाटील, सतीश रवंदळे, लंकेश पाटील, नाजनीन शेख, अबुलास खान, महेश कालेवार, शोएब अन्सारी, राजू कर्पे, रिदवान अन्सारी, वानूबाई शिरसाठ, अलोक रघुवंशी वीज कंपनीच्या कार्यालयात आले. त्यांनी आंदोलनाची माहिती पोलिसांसह प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर आंदाेलकांनी मचिये यांच्या दालनात ठिय्या आंदाेलन सुरू केले. त्यांच्याशी चर्चा केली. आंदोलकांना पोलिस आल्याचे कळताच त्यांनी अधिकाऱ्याच्या अंगावर शाई फेकण्यासाठी बाटली काढली. दोन कार्यकर्त्यांनी बाटलीचे झाकण उघडण्याचा प्रयत्न केला; परंतु ऐनवेळी बाटलीचे झाकण उघडले गेले नाही. 


या वेळी पोलिसांनी आंदोलकांच्या हातातील शाईची बाटली हिसकावली. या झटापटीत शाई खाली पडली. आता वीज वितरण कंपनीने आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणी युवक काँग्रेसचे नीलेश काटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

 

कारवाई केल्याने आंदोलन 
युवक काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याकडे वीज चोरीविरोधात कारवाई करण्यात आली. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. शाई फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणार आहे. -पी.एच. मचिये, अतिरिक्त कार्यकारी अभियंता 

बातम्या आणखी आहेत...