आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - 'वंदे मातरम्चा वाद अाणि राष्ट्रगीताची सक्ती' यावरून देशात वातावरण ढवळून निघालेले असताना जळगावात मात्र विचारवंत अाणि कट्टरपंथीयांना लाजवेल अशा कृतीतून राष्ट्रभक्तीचा जागर केला जात अाहे. हे ठिकाण शाळा, महाविद्यालय किंवा चित्रपटगृह नाही तर जळगाव शहरातील रेल्वे मालधक्का अाहे. या ठिकाणी दरराेज हमाली कामाची सुरुवात ही राष्ट्रगीतानेच हाेत अाहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू झालेल्या या कृतीमुळे देशभक्तीचा संदेश दिला जात अाहे. एवढेच नव्हे तर यामुळे एकता अाणि समानतेची गाठ पडली अाहे.
भाेईटे नगरजवळील रेल्वेच्या मालधक्क्यावर नाेंदणीकृत ५५० हमाल कामगार दरराेज उदरनिर्वाहासाठी येत असतात. सिमेंट, रेशनचे धान्य तसेच रासायनिक खतांचा रेल्वे मालवाहतुकीचा रॅक अाल्यानंतर ताे खाली करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. दिवसाला किमान २०० ते २५० ट्रक मालाची निर्यात केली जाते. प्रचंड अंग मेहनतीचे काम करणाऱ्या हमाल कामगारांमध्ये निर्माण झालेले देशभक्तीचे प्रेम इतरांनाही प्रेरणा देणारे ठरत अाहे. गरिबीची परिस्थितीमुळे मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. दरराेज कमावणे अाणि दाेन पैसे घरी घेऊन जाणे हे एकमेव उद्दिष्ट डाेळ्यासमाेर असतानाही रेल्वेच्या मालधक्क्यावर काेणतेही मतभेद, वाद व नाराजी न ठेवता सर्व जाती धर्माचे लाेक गुण्यागाेविंदाने सर्वांचे पाेट कसे भरेल यासाठी प्रयत्नशील अाहेत.
संवादामुळे प्रत्येकाला राेजगार
कमी अधिक कामावरून हाेणारे किरकाेळ वाद देखील गेल्या ६ महिन्यात बंद झाले अाहे. राष्ट्रगीतानंतरच्या 'भारत माता की जय' या घाेषणेने अंगात प्रचंड उत्साह संचारताे व दिवसभराच्या कामासाठी माेठी ताकद मिळत अाहे. तसेच विसंवाद टळला असून संवादामुळे प्रत्येकाच्या राेजगाराचा विचार केला जात अाहे.
- लहू हटकर, मुकादम
हमालांच्या जीवनातील बनलाय अविभाज्य भाग
देशातील एका गावात भाेंगे लावून राष्ट्रगीत म्हटले जाते. राष्ट्रगीत सुरू हाेताच गावातील प्रत्येक अाहे त्या स्थितीत जागेवर उभे राहत असल्याचे वृत्त एेकल्यानंतर मुकादम तथा महापालिकेचे नगरसेवक राजू पटेल यांना हा उपक्रम सुचला. एक संपूर्ण गाव अापला काही वेळ देत असेल तर अापण का नाही करू शकत, या विचारातून त्यांनी अापल्या सहकाऱ्यांना सहज इच्छा बाेलून दाखवली. त्यानंतर सहा महिन्यांपासून कुणी असाे किंवा नसाे, पाऊस असाे की थंडी मालधक्कावर दरराेज राष्ट्रगीत हाेणार म्हणजे हाेणार. हमाल कामगारांच्या जीवनातील हा एक अविभाज्य भाग बनला अाहे. कामाची सुरुवात करण्यापूर्वी अत्यंत शिस्तीत उभे राहून एका सुरात राष्ट्रगीत म्हणताना हमालांना पाहून येणाऱ्या- जाणाऱ्यांचे पाय थबकणार नाही तर नवलच.
स्वच्छता अभियान राबविणार
देशभरात स्वच्छतेचा विषय सुरू असून वेगवेगळे अभियान राबवले जात अाहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी अापण दिवसभर काम करताे ताे परिसर अाणि रहिवासाचा भाग 'स्वच्छ व सुंदर' कसा राहिल यासाठी प्रबाेधन करण्याचा मानस व्यक्त केला अाहे. मालधक्का म्हटल्यावर सर्वत्र घाणीचे वातावरण असते हे चित्र बदलण्यासाठी हमाल कामगारांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवले जाईल असे कामगारांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.