आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: गावात शेती नसताना सोसायटीकडून घेतले कर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अमळनेर तालुक्यातील लोण ग्रुप विविध कार्यकारी सहकारी संस्थेतून गावात राहत नसलेल्या, गावात शेती नसलेल्या व्यक्तींना कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच कर्जाची परफेड करणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कर्ज घेण्याचा प्रकार घडला. अशा बाेगस कर्ज प्रकरणातून सोसायटीमध्ये २४ लाख ३१ हजार ३६५ रुपयांचा अपहार करण्यात आला. तसा ठपका प्रभारी विशेष लेखापरीक्षक ए.टी.सोमवंशी यांनी फेरलेखापरीक्षणात ठेवला आहे. 


लोण ग्रुप विविध कार्यकारी सहकारी संस्थेतून सुधाकर देवचंद पाटील यांना संस्थेने कर्ज खतावणीनुसार ७० हजार रुपयांचे कर्ज वाटप केल्याची नोंद आहे. मात्र,या सभासदाचा कर्ज मागणी अर्ज कर्जरोखा लेखापरीक्षकांना तपासणीसाठी आढळून आला नाही. तलाठ्याकडून या सभासदाचा सातबारा मागवण्यातआला. मात्र, पाटील यांची संस्थेच्या कार्यक्षेत्रातच शेत जमीन नसल्याने तलाठ्याने कळवले. 

 

कर्ज मागणीसाठी केलेल्या तक्त्यामध्ये हेक्टर शेती असल्याचे दर्शवून ७० हजार पीक कर्ज मागणी दर्शवली आहे. पाटील यांचा गावात ठावठिकाणा नसतानाही बंॅक अधिकाऱ्यांनी त्यांच्या किसान क्रेडिट कार्ड कर्जाचे खाते उघडलेले आहे. त्याचप्रमाणे लताबाई प्रमोद पाटील यांनाही ऑगस्ट २०१४ रोजी ९८ हजार रुपयांचे कर्जवाटप केलेले आहे. लताबाई यांची शेतीसुद्धा संस्थेच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे तलाठ्याने कळवले. शेतजमिनीवरील संपूर्ण कर्जाची पूर्ण परतफेड केलेली आहे. सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा नाही. तरीही सोसायटी गेल्या दीड वर्षांपासून आमच्या नावावर कर्ज दाखवत आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी लोण येथील गुलाब पाटील, जिजाबराव तुकाराम शिंदे आदींनी केली आहे. 


यासभासदांच्या नावावर उचलले कर्ज 
रमाबाई तुकाराम पाटील ३८ हजार ५००,भरत नारायण बोरसे २१ हजार, विकास अरविंद पाटील २६ हजार २५०, राघो जगन्नाथ पाटील ५७ हजार ७५० रुपये आदी शेतकऱ्यांच्या नावावरही कर्ज घेतल्याची संस्थेच्या कर्ज खतावणीमध्ये नोंद आहे. जिल्हा बँकेच्या वावडे शाखेत सभासदांच्या कर्जाचे नमुना सही कार्डवर देखील अंगठा सह्या आहेत. या सभासदांनी कर्ज अमान्य केले आहे. 


गुन्हे दाखल करणार 
लेखा परीक्षकांनी अमळनेरयांनी लोण ग्रुप विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे फेरलेखापरीक्षण केलेले आहे. त्यांच्या फेरलेखापरीक्षण अहवालाची पडताळणी केल्यानंतर या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. 
- रावसाहेब जंगले, विशेष लेखापरीक्षक 

बातम्या आणखी आहेत...