आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी बाेहरी रुग्णालयात असताना हल्लेखाेर बसला हाेता छतावर लपून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अमळनेर येथील बोहरी यांना गावठी कट्ट्यातून गोळी मारल्यानंतर नवघरे, तौफिक व तन्वीर हे तिघे संशयित घटनास्थळावरून दुचाकीने पळून गेले होते. बोहरा यांना नागरिकांनी जखमी अवस्थेत अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या वेळी चौथा संशयित मुस्तफा हा देखील थेट रुग्णालयात पोहोचला होता. काही वेळात तन्वीर याने दुचाकीवरून नवघरे याला रुग्णालयाच्या जवळ सोडले होते. रुग्णालयात पोलिसांचा ताफा बाेहरी यांच्याजवळ असताना त्याच गर्दीत मुस्तफा देखील थांबला. तो तेथून मोबाइलवरून नवघरे व तन्वीर यांना प्रत्येक हालचालीची माहिती देत होता. तर बोहरी यांच्या मृत्यूवेळी नवघरे याने थेट रुग्णालयाचे छत गाठले. तो रात्रभर त्याच छतावर लपून बसला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याने तन्वीरच्या मदतीने रुग्णालयातून बाहेर पडून अमळनेर शहर सोडले. 


चौघांनी या कटाचे नियोजन केले होते. पहिल्या दोन्ही दिवस योगायोगाने बोहरी यांनी घरी जाण्याचा मार्ग बदलल्यामुळे कट हुकला होता. अखेर ३ मे रोजी रात्री शिवाजी गार्डनजवळ एका चारचाकीत तन्वीर, नवघरे व तौफिक या तिघांनी तीन बियर रिचवल्या, तर मुस्तफा याने गांजा ओढला होता. नवघरेजवळ गावठी कट्टा होता. बोहरी यांच्या पेट्रोल पंपाच्या कार्यालयाचे शटर बंद होताना मोठा आवाज झाल्यावर चौघांनी आपापली 'पोझिशन' घेतली. मुस्तफा याने 'निगराणी'चे काम केले. तो काही अंतर लांब जाऊन थांबवला होता. बोहरी दुचाकीने रस्त्यावर निघताच नवघरे व तौफिक यांनी मिरचीपुड फेकून त्यांना अडवले. त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. बोहरींच्या दुचाकीच्या हँडलवर अडकवलेल्या पिशवीत सुमारे दीड लाख रुपयांची रोकड होती. हेच पैसे लुटण्याच्या विचाराने त्यांना अडवले होते. 


रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी पाहू नये म्हणून तन्वीर याने पंधरा मिनिटे आधीच पथदिव्यांचे स्विच बंद करून अंधार करून ठेवला होता. बोहरी व दोन्ही भामट्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. बोहरींनी प्रचंड विरोध करीत दुचाकी वळवून पळून जाण्याचा प्रयत्न करताच नवघरे याने कमरेत खोचलेला गावठी कट्टा काढून बोहरींच्या छातीत गोळी झाडली. गोळी झाडताच नवघरे व तौफिक हे दोघेही भांबावले. गोळीचा आवाज आल्यानंतर काही सेकंदाच तन्वीर दुचाकीने तेथे पोहोचला. त्याच्या दुचाकीवर बसून तिघांनी पळ काढला. तर काही अंतरावर थांबलेला मुस्तफादेखील पायीच निघून गेला. 


यानंतर चौघेजण रुग्णालयात पोहोचले. येथून तौफिक व तन्वीर हे दोघे दुचाकीने पसार झाले. अखेर शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून तिघांना ताब्यात घेतले. तर नवघरे पोलिसांना मिळाला नाही. अटकेतील तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी त्यांना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 


स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे यांना संशयित अमळनेर शहरात असल्याचे शनिवारी दुपारी माहिती मिळाली होती. त्यांच्यासह सहाय्यक निरीक्षक राजेंद्र होळकर, शशिकांत पाटील, अनिल इंगळे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, संतोष मायकल, सुरेश पाटील, रवींद्र पाटील, गफुर तडवी, इद्रिस पठाण, सूरज पाटील, दत्तात्रय बडगुजर, सतीश हळनोर, दर्शन ढाकणे व विनयकुमार देसले यांच्या पथकाने अमळनेर गाठले. तेथून मुस्तफा आणि तन्वीर यांना ताब्यात घेतले. तर तौफिक याला भनक लागल्यामुळे तो पुन्हा बेपत्ता झाला होता. नवघरे अमळनेरमध्ये नसून ओझर (जि.नाशिक) येथे असल्याची माहिती पथकास मिळाली. 


ताब्यात घेतलेल्या दोघांना जळगावात आणले. तर पथकाने अमळनेर येथून थेट ओझर गाठले. पोलिसांना नवघरे याच्या मोबाइल क्रमांकावरून लोकेशन मिळाले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी रात्रीतून ओझर शहरात शोध सुरू केला. याची नवघरे माहिती मिळताच त्याने रात्री ९ वाजता मोबाइल बंद केला. त्यानंतर तो सुरूच केला नाही. शनिवारी रात्रभर पोलिसांनी ओझर शहरात त्याचा शोध घेतला; परंतु तो मिळून आला नाही. अखेर रविवारी पहाटे पथक जळगावात परतले. तर रविवारी दुपारी तौफिक याला देखील अमळनेर शहरातून अटक केली. 


तन्वीर काही दिवस पंपावर कर्मचारी 
या गुन्ह्यातील संशयित तन्वीर अडीच वर्षांपूर्वी बोहरी यांच्या पेट्रोल पंपावर कामाला होता. त्यामुळे त्याला बोहरी यांच्या येण्या-जाण्याची वेळ, कौटुंबिक माहिती, पैशांची आवक अशी सर्व माहिती होती. हीच माहिती टीप देऊन त्याने नवघरे व इतर दोघांच्या मदतीने बोहरी यांना लुटण्याचा कट रचला होता. 


पेट्रोलपंप लुटीचीही दिली कबुली 
२४ फेब्रुवारी २०१८ रोजी बोहरी यांच्या पेट्रोल पंपावर लुट झाली होती. या वेळी ८ लाख ३ हजार रूपये लुटण्यात आले होते. हा गुन्हा देखील नवघरे याच्या मदतीने चौघांनी केल्याची कबुली तनवीर याने पोलिसांना दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...