आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडा शिकवण्याच्या प्रयत्नात शेतमालकालाच घडली ‘अद्दल’; राजकीय रंग देण्याचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव -  वारंवार ताकीद देऊनसुद्धा शेतातील विहिरीत पोहण्यासाठी येणाऱ्या मुलांना धडा शिकवण्यासाठी तसेच त्यांच्या कुटंुबीयांकडे तक्रार करण्याच्या उद्देशाने शेतमालकाच्या सांगण्यावरून सालदाराने मातंग समाजाच्या दोन मुलांना विवस्त्र करून पट्ट्याने बेदम मारहाण केली. याच अवस्थेत त्यांना सुमारे साडेतीन किलोमीटर पायी चालवत शेतात अाणले.

 

त्या ठिकाणी मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. मुलांच्या या फजितीचा वाकडी गावात गंमतीचा विषय व्हावा म्हणून फुटेज व्हायरल केले. परंतु या अघोरी प्रकारामुळे शेतमालकाला चांगलीच ‘अद्दल’ घडली असून देशभर चर्चेचा विषय बनलेल्या प्रकाराचे हेच सत्य अाहे. या प्रकारामुळे आता गावात नागरिक मोबाइलमध्ये फोटो काढत असतानादेखील ‘विहीर’प्रकरणामुळे दचकत असल्याची माहिती ‘दिव्य मराठी’ने शनिवारी केलेल्या ग्राउंड रिपाेर्टच्या माध्यमातून उजेडात अाली अाहे.  


देशभरात चर्चेचा  विषय बनलेली मातंग समाजाच्या दोन मुलांना विवस्त्र करून पट्ट्याने बेदम मारहाणीची घटना वाकडी (ता.जामनेर) येथे १० जून रोजी घडली. वाकडी गावालगतच ईश्वर जोशी यांच्या मालकीचे मोठे शेत असून त्यात दोन विहिरी आहेत. यातील एका विहिरीत गावातील सुमारे १० ते १५ मुले पोहण्यासाठी आले होते. याचा राग आल्यामुळे जोशी यांच्या सांगण्यावरून सालदार प्रल्हाद लोहार याने मातंग समाजातील दोन मुलांना विवस्त्र करून पट्ट्याने बेदम मारहाण केली. तर जाेशी यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करून ती व्हायरल केली. गेल्या तीन दिवसांत या प्रकरणात वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या.

 

शुक्रवारी एका मुलाच्या कुटंुबीयांनी शेतमालकाची चूक नसल्याचे माध्यमांना सांगितले. तर दुसऱ्या मुलाच्या कुटंुबीयांनी मुलांना बेदम मारहाण झाली असून अन्याय झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे या घटनेचे सत्य शाेधण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने शनिवारी गावातील काही लोक, पीडित मुले, त्यांचे कुटंुबीय, शेतमालकाचे नातेवाईक, पोलिस, गावातील तरुणांशी चर्चा केली. मुलांना विवस्त्र करून मारहाण केल्याचे उघड आहे. प्रश्न होता तो फक्त त्या मागच्या उद्देशाचा. शेतात नवीनच पेरणी झाली असून रोपे उगवण्यास सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत शेतात इतर लोकांनी शिरलेले शेतमालकास अावडणार नाही.

 

तर दुसरीकडे गावातील १०-१५ मुले शेतातील विहिरीत पोहण्यासाठी येत होते. याविषयी शेतमालक जोशी याने त्यांना ताकीद दिली होती; पण मुले ऐकत नसल्यामुळे १० जून रोजी ईश्वर जोशी, प्रल्हाद लोहार, शकूर तडवी व अजिज तडवी या चौघांनी पोहण्यासाठी आलेल्या मुलांचा पाठलाग केला. शेताच्या बांधावरून मातंग समाजाच्या दोन मुलांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, विहिरीपासून सुमारे ३.५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्णफाटा या गावाजवळ त्यांना पकडले. तेथून दोघांचे कपडे काढून घेत विवस्त्र करून पायी चालवत त्यांना पुन्हा शेतात आणले. रस्त्यात अनेक शेतांमध्ये महिला काम करत होत्या. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी मुलांनी पळसाच्या झाडाच्या फांद्या तोडून अापले अंग झाकले.

 

शेतमालकाच्या पाया पडून दाेघेही मुले कपडे परत देण्याच्या विनवण्या करत हाेते. पण मुलांना धडा शिकवायचाच, या अविर्भावात असलेल्या शेतमालक जोशी याने काही एक एेकून घेतले नाही. शेतात मुलांना अाणल्यानंतर शेतमालक जाेशी यांच्या सांगण्यावरून सालदार प्रल्हाद लोहार याने दोघांना पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्याचे जाेशी यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. शकुर सरदार तडवी याने मुलांना मारण्यासाठी काठी आणून दिली तर अजिज कासम तडवी हा मागे उभा राहून मुलांची अवस्था पाहून हसत होता.

 

या चौघांनी दोन्ही पीडित मुलांना सुमारे तासभर छळले. दरम्यान, मोबाइलमध्ये व्हिडिओ शूटिंग करत असताना जोशी याने मुलांना दमबाजी केली. पाचवेळा समजावले तरी तुम्ही पोहायला का येतात, असा प्रश्न विचारला. तसेच मुलांना विवस्त्र करून मारहाण केल्याचे व्हिडिओ शूटिंग गावातील काही तरुणांच्या व्हाॅट;्सअॅपवर पाठवले. दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ व्हायरल होताच शेतमालक जोशी यांच्या अंगलट आला. या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल होऊन जोशीसह चौघांना अटक करण्यात आली अाहे. मुलांची फजिती करण्याच्या चुकीच्या प्रकारामुळे शेतमालकालाच ‘अद्दल’ घडल्याचे या घटनेमागील खरे सत्य अाहे. दरम्यान, या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली  आहे.  नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये,  असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

राजकीय रंग देण्याचा प्रयत्न : चंद्रकांत पाटील
वाकडी येथील घटना गंभीर अाहे. त्या दृष्टीने पाेलिसांकडून दाेषींवर कारवाई करण्यात येत अाहे. पाेलिस यंत्रणा त्यांचे काम करीत असताना विविध राजकीय शिष्टमंडळांच्या भेटीमुळे वाकडीकर वैतागले अाहेत. गावाची राज्यभर, देशभर बदनामी हाेत असताना राजकीय शिष्टमंडळे मात्र पत्रके अाणि निवेदनातून राजकीय पाेळी भाजण्याचा प्रयत्न करीत असल्याचा अाराेप पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बाेलताना केला. 

 

आणखी दोन संशयितांना पोलिसांनी केली अटक

वाकडी गावात मातंग समाजाच्या दोन मुलांना झालेल्या मारहाणीप्रकरणी आरोपींना मदत करणाऱ्या अजित कलीम तडवी व शकुर सरदार तडवी या दोघांना शनिवारी अटक करण्यात आली. त्यामुळे प्रकरणातील आरोपींची संख्या आता ४ झाली. मुख्य आरोपी ईश्वर जोशी व प्रल्हाद तडवी यांना यापूर्वीच अटक झाली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी वाकडी गावास भेट दिली. या वेळी त्यांनी पीडित मुलांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. शासनातर्फे प्रत्येकी एक लाख रुपये मदत जाहीर करून २५ हजारांचा पहिल्या टप्प्याचा धनादेश या वेळी दोन्ही कुटुंबीयांना दिला. 


आमच्या कुटुंबाला धोका

एका पीडित मुलाची आई व मुख्य फिर्यादी दुर्गाबाई चांदणे हिने यापूर्वी शेतमालकाबाबत आमची कुठलीही तक्रार नाही, आमच्या मुलांचीच चूक झाली, असे सांगितले होते. मात्र, शनिवारी ‘मला लहान मुलं, मुली आहेत. मारहाण करणारे आडदांड आहेत. आपल्या कुटुंबाला धोका आहे,’ अशी भीती त्यांंनी आठवलेंपुढे व्यक्त केली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. आतापर्यंत तुम्हाला कुणी धमक्या दिल्या का? असा प्रश्न दुर्गाबाईंना केला असता त्यांनी नकार दिला. मात्र, भविष्यात त्रास होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...