आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापी बंधाऱ्यात १० दिवसांचाच साठा; पाऊस लांबल्यास पुन्हा टंचाईचे संकट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापीपात्रातील बंधाऱ्याची जलपातळी पुन्हा खालावली आहे. शहराला केवळ १० ते १२ दिवस पुरवठा करता येईल इतकाच साठा सध्या शिल्लक आहे. पाऊस लांबल्यास शहराला जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरावर पुन्हा टंचाई निर्माण होणार आहे. हतनूर धरणातून १० जूननंतरच   आवर्तन मिळणार आहे. यामुळे पावसाळ्याच्या सुरूवातीला शहरावरील टंचाईचे ढग अधिक गडद झाले आहेत. त्यामुळे उपलब्ध साठ्याचा काटकसरीने वापर गरजेचा आहे. 

तापीकाठावर वसलेल्या भुसावळ शहराला गेल्या चार ते पाच वर्षांपासून उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे. पालिकेचे नियोजन नसल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती कायम आहे. सध्या शहरातील सर्व भागांना सहा ते सात दिवसांआड तर मुस्लिम बहूल भागात रमजान महिन्यामुळे तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. प्रचंड तापमान आणि पाण्याची वाढलेली मागणी यामुळे तापी पात्रातील बंधाऱ्यात सध्या साठा पुन्हा खालावला आहे. शहरातील मागणीचा अभ्यास केल्यास हा साठा केवळ दहा ते १२ दिवस पुरेल. या दरम्यान पाऊस लांबला किंवा हतनूर धरणातून आवर्तनास विलंब झाल्यास शहरावर पुन्हा पाणीटंचाईचे संकट कोसळणार आहे. उन्हाळ्यापुर्वीही मार्च महिन्यापासून दर महिन्याला शहरात टंचाई निर्माण झाली. एप्रिल आणि मे महिन्यात साठा संपल्याने पालिकेची रॉ वॉटर यंत्रणा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली होती. आता उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पुन्हा ही समस्या निर्माण होऊ पाहत आहे. हतनूर धरणातून मिळणारे शेवटचे आवर्तन आता १० जूननंतर मिळणार आहे. तोपर्यंत पाऊस लांबल्यास शहराला पुन्हा टंचाई सहन करावी लागेल. 


बंधाऱ्याची उपाययोजना फोल 

पालिकेने चार वर्षांपासून दरवर्षी बंधाऱ्याची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र आता पाण्याचा वापरही वाढल्याने तसेच बाष्पीभवनातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने बंधाऱ्याची उंची वाढवण्याचा प्रयोग फोल ठरू पाहत आहे. यामुळे भविष्यकाळातील गरज पाहता अमृत योजनेतील बंधाऱ्याची उभारणी होणे अपेक्षित आहे. मात्र हे काम रेंगाळल्याने टंचाईच्या झळा पुढील वर्षीही सहन कराव्या लागतील. 


अमृत योजनेनंतर प्रश्न सुटेल 
 हतनूर धरणामध्ये सध्या केवळ ९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून सोडल्या जाणाऱ्या आवर्तनात पाच ते सहा दलघमी पाणी वापरले जाईल. यामुळे धरणात अल्प प्रमाणात साठा शिल्लक राहील. यामुळे प्रशासनाने आता आवश्यकता भासल्यास १० ते १२ जूननंतर आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत शहरात टंचाई कायम राहणार आहे. 


हतनूर धरणातच पाणी नसल्याने पालिकेला वेळेवर आवर्तन मिळाले नाही. आपल्याकडे पूर्वीपासूनच साठ्याची क्षमता कमी आहे. या सर्व अडचणींवर मात करुन समाधानकारक पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केले. अमृत योजनेच्या बंधाऱ्यानंतर शहरातील पाणीप्रश्न कायम स्वरुपी मार्गी लागणार आहे. रमण भोळे, नगराध्यक्ष, भुसावळ 


बंबांचा वापर सुरुच 

टंचाईच्या काळात पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने तीन टँकर खरेदी केले. वापरात नसलेल्या एका टँकरची डागडुजी केली. पालिकेकडे सध्या सहा टँकर उपलब्ध आहेत, असे असतानाही पालिकेकडून जुन्या अग्नीशमन बंबाचा वापर केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी सिंधी कॉलनीतील भागात अग्नीशमन बंबाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. टँकरद्वारे सर्व भागांना समान पाणीवाटप करणे अपेक्षित आहे. 

बातम्या आणखी आहेत...