आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९ दिवसांत स्टेट बँकेसमोर अाणखी एकास गंडवले, तरुणास बोलण्यात गुंगवून दोन भामट्यांचा कारनामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बहिणीला पैसे पाठवण्यासाठी स्टेट बँकेत आलेल्या तरुणाला दोन भामट्यांनी गंडवले. या तरुणाकडून १० हजार रुपये रोख व ७ हजार रुपयांचा मोबाइल घेऊन त्याच्या हातात कागदाची गड्डी ठेवलेली पिशवी देऊन दोघा भामट्यांनी पोबारा केला. दरम्यान, १७ एप्रिलला स्टेट बँकेच्या बाहेर रस्त्यावर पैसे टाकून २० लाख रुपये लांबवल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारी तरुणास गंडवल्याची घटना घडल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड भिती पसरली आहे. 

पवन ईश्वर लोहार (वय २२) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुसुंबा येथे राहणारा पवन हा एका कंपनीत डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतो. सुरत येथे राहत असलेल्या बहिणीच्या खात्यावर १० हजार रुपये पाठवण्यासाठी तो बुधवारी दुपारी १२ वाजता स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत आला होता. पवन हा पैसे भरण्यासाठी स्लिप भरत असताना एक भामटा त्याच्याजवळ आला. त्याने अकाऊंट नंबर घेण्यासाठी एक कॉल करु द्या, असे सांगत पवन याच्याकडून मोबाइल मागितला. यानंतर तो भामटा मोबाइलवर बोलत बाहेर गेला. त्याच्यापाठोपाठ पवन देखील बँकेच्या बाहेर गेला. यानंतर लगेच दुसरा भामटा पवनजवळ आला. पवनच्या खिशात पैसे असल्याची रेकी दोन्ही भामट्यांनी आधीच केली होती. दुसऱ्या भामट्याने पैसे ट्रान्सफर करण्याची पद्धत पवनला विचारली. समोर सायबर कॅफे असल्याचे सांगून पवन दुसऱ्या भामट्यासोबत बँकेच्या गेटबाहेर आला. या वेळी दुसऱ्या भामट्याने त्याच्याजवळील एक पिशवी पवनच्या हातात दिली. यात १ लाख ९० हजार रुपये आहेत. मला तूर्त १० हजार रुपयांची आवश्यकता अाहे. थोड्या वेळात परत करतो, असे सांगून दुसऱ्या भामट्याने पवनजवळील १० हजार रुपये घेतले. यानंतर दोन्ही भामट्यांनी बँकेच्या परिसरातून पोबारा केला. पवनने बराच वेळ वाट पाहिल्यानंतर देखील दोघे भामटे परतले नाहीत. भामट्याने दिलेली पिशवी पाहिली असता, त्यात कागदाचे बंडल असल्याचे आढळून आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे समजल्याने पवनने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

भामटे सीसीटीव्हीत कैद 
पवन दुपारी ११.५७ वाजता बँकेत आला. तेव्हापासून दोन्ही भामट्यांनी पवनसोबत संवाद साधला. दुपारी १२.० ६ वाजता म्हणजेच अवघ्या ९ मिनिटात त्यांनी पवनला गंडवले. भामट्यांचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले अाहे. 

 

पोलिसांचे अपयश

स्टेट बँकेच्या बाहेरून आठ-नऊ भामट्यांच्या टोळक्याने रस्त्यावर पैसे टाकून २० लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १७ एप्रिल रोजी घडली होती. यानंतर नऊ दिवसांनी पवन यालादेखील याच बँकेच्या परिसरात गंडवण्यात आले अाहे. स्टेट बँकेत मोठ्याप्रमाणात नागरिकांची गर्दी असते. भामटे याच ठिकाणी रेकी करत असतात. परंतु, पोलिसांची गस्त होत नसल्यामुळे त्यांना चांगलेच फावते आहे. तर पाठोपाठ होणाऱ्या अशा घटनांमधून पोलिसांचे अपयश समोर येते आहे. 

बातम्या आणखी आहेत...