आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती चितमपल्ली: 66 वर्षे जंगलात भटकंती, 5 लाख किमी प्रवास, 13 भाषांचे ज्ञान, 4 कोशांचे लेखन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा- नोकरीनिमित्त ३६ वर्षे जंगलात कार्यरत मारुती चितमपल्ली यांनी पक्षिकोश, प्राणिकोश, मत्स्यकोशाचे काम पूर्ण केले. ते आता वृक्षकोशाचे काम करताहेत. तरुणालाही लाजवेल अशी सकारात्मक काम करण्याची त्यांची कारकीर्द नो निगेटिव्ह संकल्पनेला नवा आयाम देणारी. त्यावर त्यांच्याशी संवाद साधत टाकलेला प्रकाशझोत....

 

वन खात्यात ३६ वर्षे सेवा. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती. ५ लाख किमी प्रवास. १३ भाषांचे ज्ञान. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत मिळवलेली माहिती. त्या माहितीची नोंद केलेल्या व ३० वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायऱ्या. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षिकोश, प्राणिकोश व मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी २५ पुस्तके लिहिली. आता  ८६ व्या वर्षी वृक्षकोशावर काम. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली. हा दुर्मिळ ठेवा समोर आणण्याच्या सकारात्मक प्रेरणेतूनच हे सर्व साध्य झाल्याचे चितमपल्ली यांनी सांगितले.  


पक्षिकोशाला चांगला प्रतिसद मिळाला. आता प्राणिकोश आणि मत्स्यकोश प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. प्राणिकोशासाठी १५ वर्षे काम केले. देशभर जंगलातून माहिती मिळवली. पारधी, गोसावी, वडारी, अादिवासी लाेकांकडून  प्राण्याविषयी माहिती मिळाली. मत्स्यकोशासाठी ५ वर्षे कोकणात राहिलो. कोळ्यांबरोबर समुद्रात प्रवास करत माशांचे प्रकार जाणून घेतले. भंडारा जिल्ह्यातील कोळ्यांकडून गोड्या पाण्यातील माशांची माहिती मिळवली. मला मराठी, संस्कृत, हिंदी, तेलगू, कन्नड अशा १३ भाषा येतात. याचा माहिती जमा करताना खूप उपयोग झाला, असे सांगताना तरुण संशोधक याकडे जास्त वळत नसल्याबद्दल चितमपल्ली यांनी खंत व्यक्त केली.


प्राणिकोश
चितमपल्ली यांनी सांगितले, प्राणिकोशात भारतातील ४५० हून अधिक प्राण्यांची माहिती, छायाचित्रे, विविध भाषेतील नावे आहेत. वाघाचे प्रकार, बिबट्याची हत्तीची वैशिष्ट्ये, वानराची शैली, उंदराचे १०० हून जास्त प्रकार, वटवाघळाच्या १५० हून जास्त प्रकाराची माहिती आहे. हा प्रकाशनाच्या वाटेवर आहे.


वृक्षकोश 
यात महाराष्ट्रासह देशातील सुमारे ४००० वनस्पतींची नावे, त्यांची वनस्पतीशास्त्रीय मांडणी, त्यांची विशेष वैशिष्ट्ये आदी माहिती आहे. कडुलिंबाचे ८ प्रकार, बिबा, बहावा, मोह, साग आदींचे महत्त्व व त्यांच्याशी संबंधित रंजक माहिती अशी मांडणी आहे. या कोशाचे काम सुरू आहे.   


मत्स्यकोश  
यात खाऱ्या पाण्यातील ४५० आणि गोड्या पाण्यातील २५० मासे व त्यांची विविध नावे, वैशिष्ट्ये, रंजक माहिती यांचा समावेश आहे. सर्वांना केवळ खाण्यात येणाऱ्या माशांविषयी माहिती आहे. यात सर्व प्रकारच्या माशांविषयी विस्तृत माहिती आहे. या कोशाचे काम पूर्ण झाले असून वर्षभरात तो प्रकाशित होईल.


प्राणी, मासे, वृक्ष अन् पाऊसमान   
चितमपल्ली यांनी सांगितले, अनेक वृक्ष पावसाचे संकेत देतात. बहावा पूर्ण फुलला की पाऊस चांगला पडतो. बिब्याच्या झाडाला फुले लागली तर त्या भागात दुष्काळ पडतो. कोणत्या झाडाखाली पाणीसाठा आहे यावरच कोशात एक प्रकरण आहे. सावळा नावाच्या माशांच्या पोटातील अंडकोशावर पावसाच्या ९ नक्षत्रांच्या खुणा असतात. मूलत: त्यांचा रंग काळा असतो. तो तांबडा असेल तर पाऊस चांगला पडतो. दुष्काळ पडणार असेल तर वानरे खाल्लेली पाने, फळे, फुलांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून लाडू तयार करून ठेवतात. काटेरी झाडांवर कावळ्यांनी घरटी बांधली तर त्या वर्षी दुष्काळ पडतो, याउलट आंबा, कडुलिंब यासारख्या सदाहरित वृक्षांवर घरटी बांधली तर पाऊस चांगला पडतो. कावळ्याने तीन-चार अंडी घातली तर उत्तम पाऊस होतो, एक अंडे घातले तर अवर्षण पडते. निरीक्षणातून हे ज्ञान सिद्ध झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...