आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेस्थानकावर आता सीसीटीव्हीची तीक्ष्ण नजर; नवीन वर्षात बसणार अत्याधुनिक 24 सीसीटीव्ही कॅमेरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- रेल्वेस्थानकावर असलेली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर कमी झाली असून त्याची जागा नवे आणि लांबपर्यंत झूम करता येतील, असे अत्याधुनिक २४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता रेल्वेेस्थानक या कॅमेऱ्यांच्या नजरेत राहणार आहे. 


जळगाव रेल्वेस्थानक मॉडेल स्टेशन करण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे विभागाचे प्रयत्न सुरू आहेत; पण रेल्वेस्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न रेल्वे विभाग आणि आरपीएफसमोर आहे. जळगाव येथून पश्चिम आणि मध्य रेल्वेमार्ग असल्यामुळे जळगाव स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मागील काही महिन्यात रेल्वेस्थानकावर चोऱ्यांच्या घटनेतही वाढ झालेली आहे. त्यामुळे येथे असलेले आरपीएफचे पोलिस कर्मचारी भुसावळकडे जाणाऱ्या प्रत्येक गाडीवर लक्ष ठेवून असतात. याठिकाणी १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यापैकी १२ कॅमेरेच कार्यरत आहेत. ते कॅमेरेही २००५ पूर्वीचे असल्यामुळे त्यांची नजर विशिष्ट मर्यादेपर्यंत होती. त्यामुळे कॅमेऱ्यातील छायाचित्र ओळखणे बऱ्याचदा जिकरीचे होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेऱ्यांचा उपयोग लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता. आता नव्या कॅमेऱ्यांची कॅच करण्याची क्षमता पूर्वीपेक्षा अधिक राहणार असून कॅमेरा झूम केल्यानंतर संबंधिताची ओळख पटवणेदेखील सोपे होणार आहे. येत्या नव्या वर्षात रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक २४ कॅमेरे लावण्यात येणार आहे. 


यार्डातील भुरट्या चोऱ्या रेल्वे पोलिसांसमोर आव्हान 
यार्डातून धावत्या रेल्वेतून प्रवाशांचे मोबाइल हिसकावण्याचे प्रमाण गेल्या सहा महिन्यांत वाढले आहे. यार्डातून मोबाइल अथवा इतर वस्तू चोरून शिवाजीनगरकडील रस्त्यांवरून धूम ठोकणाऱ्या भुरट्या चोरट्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी आरपीएफच्या जवानांनी पिंप्राळा रेल्वे गेट आणि सुरत रेल्वेगेटवर थांबून सुरक्षेचा आढावा घेतला होता. याठिकाणाहून बहुतेक विक्रेते चालत्या रेल्वेत चढतात. तर, बरेच प्रवासी देखील चालत्या रेल्वेतून याठिकाणी उतरतात. त्यांचीही चौकशी रेल्वे पोलिसांनी केली होती. 

बातम्या आणखी आहेत...