आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये दुचाकीस्वार तरुणाने गमावला जीव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूषण सपकाळे, जखमी नयन - Divya Marathi
भूषण सपकाळे, जखमी नयन

जळगाव- कालिंका माता चौकात सकाळी कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एका होतकरू तरुणाचा दुचाकीस्वाराचा दुर्दैवी अंत झाला. कुत्र्याला वाचवताना रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे तरुणाची दुचाकी घसरली आणि तो रस्त्याच्या मधोमध पडला. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरच्या चाकाखाली तरुण चिरडला गेला. दुचाकीवर त्याच्या पाठीमागे बसलेला मित्र रस्त्याच्या कडेला फेकला गेल्याने सुदैवाने बचावला. अपघातात मृत्युमुखी पडलेला हा तरुण कडगावचा रहिवासी असून तो स्पोकन इंग्लिश क्लाससाठी जळगावकडे येत होता. 


भूषण उर्फ देवानंद पुरुषोत्तम सपकाळे, (वय २७) असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या जखमी मित्राचे नाव नयन सुहास पाटील ( वय १९ ) आहे. या अपघातात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूषण याचे शिक्षण डी.एड.पर्यंत झाले होते. शिक्षकाची नोकरी लागण्यासाठी तो सीईटीची तयारी करीत होता. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम समोरील डंबेलकर्स इंग्लिश स्पिकिंगमध्ये त्याने इंग्रजी बोलण्यासाठी शिकवणी लावलेली होती. काही दिवसांपूर्वीच त्याने नवीन दुचाकी घेतलेली होती. तिच्यावर वाहन नोंदणी क्रमांकही टाकण्यात आलेला नव्हता. 


कडगाववरून दररोज तो दुचाकीवर शिकवणीसाठी जळगावला येत होता. तर त्याचा मित्र नयन पाटील हा गोदावरी महाविद्यालयात मेकॅनिकल डिप्लोमा करतो. शुक्रवारी तो त्याच्यासोबत दुचाकीवर मागे बसलेला होता. त्याला शैक्षणिक कामासाठी एम.जे.महाविद्यालयाकडे जायचे होते. शुक्रवारी हे दोघे जुन्या नशिराबाद रस्त्याने येत होते. 


कुत्रा आडवा आल्याने मारले करकचून ब्रेक
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८.३० च्या सुमारास तोलकाट्याजवळून कालिंका माता मंदिर परिसराकडे येत असताना हॉटेल साई पॅलेससमोर त्यांच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आला. त्याला वाचवण्यासाठी भूषणने करकचून ब्रेक दाबले. रस्त्यावर खडी असल्यामुळे दुचाकी घसरली. भूषण रस्त्याच्या मधोमध तर नयन रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. याचदरम्यान त्यांच्या पाठीमागून येत असलेल्या भरधाव डंपरचे (क्रमांक एम.एच.१९ झेड ८३८८ ) मागचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. या अपघातात भूषणचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र नयनच्या पायाला फ्रॅक्चर झाले. 


बरगडीला डोक्यालाही जबर मार बसला आहे. या घटनेनंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त डंपर दुचाकी ताब्यात घेऊन शनिपेठ पोलिस ठाण्यात लावली आहे. या वेळी तेथे आलेल्या कडगाव येथील काही युवकांनी जखमी नयनला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याचप्रमाणे अपघाताबाबत भूषण नयन यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. 


दु:खातिरेकाने वडिलांना भोवळ 
अपघाताबाबत कळताच भूषण वडील पुरुषोत्तम सपकाळे, पोलिस पाटील असलेले भाऊ जगदीश सपकाळे यांच्यासह कडगावचे ग्रामस्थ माेठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयात आले होते. तरुण, होतकरू मुलाचा अपघात झाल्याने वडील आणि भावाचा करुण विलाप सुरू होता. तेवढ्यात भूषणचा मृत्यू झाल्याचे कळताच दु:खातिरेकाने त्याच्या वडिलांचा रक्तदाब वाढला आणि त्यांना भोवळ आली. त्यांची प्रकृती बिघडल्याने नातेवाइकांनी रुग्णालयात दाखल केले. 


डंपरच्या प्रश्नावर आमदारही निरुत्तर 
दरम्यान,या अपघाताबाबत कळताच जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, प्रताप पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांनी रुग्णालयात येऊन नातेवाइकांचे सांत्वन केले. या वेळी नातेवाइकांनी वाळूच्या भरधाव डंपरने धडक दिल्याने भूषणचा मृत्यू झाला. चालक बेदरकारपणे डंपर चालवतात. त्यांना गावातून वाळू वाहतूक करण्यास बंदी घातली पाहिजेत, अशी अपेक्षा नातेवाइकांनी आमदार भोळे यांच्याकडे व्यक्त केली. मात्र, आमदार भोळे निरुत्तर झाले. काहीच बोलता ते नि:शब्दपणे तिथेच उभे राहिले. नातेवाइकांची भेट घेतल्यानंतर ते निघून गेले. 


रस्ते अपघातात ११ महिन्यांत ३९वा मृत्यू 
गेल्याअकरा महिन्यांमध्ये जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघातात ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे जळगाव शहरात ३८ जणांचा मृत्यू झालेला आहे. भूषण सपकाळे याचा रस्ते अपघातातील ३९ वा मृत्यू आहे. दरम्यान दुपारी १.३० वाजेच्या सुमारास त्याच्यावर कडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आईवडील, दोन भाऊ असा परिवार आहे. 

बातम्या आणखी आहेत...