आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासपोर्ट कार्यालयास उद्यापासून सुरुवात; ऑनलाइन प्रक्रियेनंतर मिळणार दीड महिन्यात पासपोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अनेक वर्षांपासून पासपोर्ट कार्यालयाची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. शहरात पासपोर्ट कार्यालयास बुधवारपासून सुरुवात होत आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आता शहरातच पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. 


नागरिकांना या आधी पासपोर्ट बनवण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज दाखल करून पडताळणीसाठी नाशिक येथे जावे लागत होते. यापुढे ही प्रक्रिया शहरातूनच होणार आहे. यासाठी बळीरामपेठेतील पत्रकार भवनमागील पोस्ट कार्यालयात हे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात अाले अाहे. रिजनल पासपोर्ट ऑफिसच्या अंतर्गत हे कार्यालय असणार आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता खासदार ए.टी. पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद््घाटन होणार आहे. या वेळी रिजनल पासपोर्ट अधिकारी स्वाती कुलकर्णी, औरंगाबाद डाक विभागाचे पोस्टमास्तर जनरल प्रणवकुमार, डाक अधीक्षक बी.व्ही.चव्हाण आदी उपस्थित असतील. 


अशी असेल प्रक्रिया 
कार्यालयासाठी दोन पासपोर्ट विभागाचे व एक पोस्ट विभागाचा कर्मचारी नियुक्त केले आहेत. सकाळी ८.३० सायंकाळी ५ या वेळेत कार्यालय सुरू राहील. पासपोर्टसाठी संकेतस्थळावर लॉगईन करून आयडी घेऊन या कार्यालयाकडे जावे लागेल. त्यानंतर कागदपत्र पडताळणीची तारीख दिली जाईल. यादरम्यान, ही माहिती मुंबई पोलिस विभागाकडे जाऊन चारित्र्य पडताळणी होईल. यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन पासपोर्ट दिला जाईल. या प्रक्रियेस किमान एक ते दीड महिने लागतील. दरम्यान, रोज किमान ५० पासपोर्ट प्रस्तावांची प्रक्रिया होईल. 

बातम्या आणखी आहेत...