आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारकीसाठी सर्वच पक्षांतील दिग्गजांकडून मोर्चेबांधणी सुरू; राजकीय वातावरण तापले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- विधानसभा निवडणुकीला अद्याप १८ ते २० महिन्यांचा अवधी असताना पारनेर तालुक्यात मात्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. घराणेशाहीचा बीमोड करण्यासाठी भाजपच्या उच्च पदाधिकाऱ्यांकडून तालुका राजकारणात हस्तक्षेप सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत पारनेरचा "भावी आमदार" कोण? यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. तालुक्यात निवडणुकीच्या रणधुमाळीने आतापासूनच वेग घेतला आहे. 


पारनेर तालुक्यात विजय औटी यांची आमदारकीची सलग तिसरी टर्म अाहे. तालुक्यात सर्वच गावांमध्ये छोट्या-मोठ्या प्रमाणात विकासकामे करून आमदार औटी यांचे गावोगावी फलक लागले आहेत. कडक स्वभावाचे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण होऊन आमदार म्हणून तालुक्यात त्यांचे नाव घेतले जाते. मात्र, सध्याच्या परिस्थितीवरून संघटनात्मक जबाबदारीकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी तालुक्यात जनसंपर्क टिकून संघटनात्मक बांधिलकी जोपासली. तरुणांचे ते 'नेते' आहेत. परंतु अलीकडे लंके यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी पारनेरचा पुढील आमदार लंके असणार, अशा घोषणा देण्यास सुरुवात केल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून एकसंध असणाऱ्या शिवसेनेत फूट पडण्यास सुरुवात झाली अाहे. आगामी निवडणुकीत उमेदवारीसाठी शिवसेनेकडून आमदार औटी व नीलेश लंके प्रबळ दावेदार मानले जात अाहे. शिवसेनेची उमेदवारी औटी यांना मिळाली, तर अशा वेळी लंके दुसरा पर्याय निवडतात का? त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 


तालुका राष्ट्रवादीतील झावरे-पवार, सावंत वाद टोकाला गेला आहे. हा वाद कित्येकवेळा अजित पवारांच्या दरबारात पोहोचला. त्यामुळे सुजित झावरे व इतर बंडखोरांमध्ये वादाच्या ठिणग्या वेळोवेळी पडतच आहे. राष्ट्रवादी काँग्रेेसमध्ये तालुक्यात एकसंधता नाही. त्यामुळे वरिष्ठांकडून राष्ट्रवादीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. एका कार्यक्रमात किती वेळा तिकीट द्यायचे, असा टोला अजित पवार यांनी सुजित झावरे यांना लगावला होता. तेव्हापासून नाराज असलेले व बंडखोरांकडून आरोपांचे धनी ठरलेले झावरे यांच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचे आहे. त्यातच शिवसेनेचे लंके यांच्याबरोबर झावरे एका कार्यक्रमात एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. २७ जानेवारीला शरद पवार पारनेर दौऱ्यावर येणार अाहेत. सुजित झावरे तालुक्यातील गावागावात जाऊन राष्ट्रवादीचे जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. जुने नवे कार्यकर्ते एकत्र करण्यात झावरे कितपत यशस्वी होतात, हे आगामी काळात समजेल.


भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नुकतेच सुपा येथे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्या हस्ते १२ मोटारसायकलींचे वितरण करण्यात आले. भाजप तालुकाध्यक्ष विश्वनाथ कोरडे यांच्याकडून राज्यातील सत्तेच्या जोरावर तालुक्यात विधानसभा जिंकण्यासाठी तयारी सुरू आहे. संपूर्ण तालुक्यात अनेकांना भाजपची पदे दिली आहेत, तर एकाच महिलेकडे अनेकपदांची कमांड देऊन महिला शक्तीच्या जोरावर तालुक्यात भाजपाचा विस्तार सुरू आहे. त्यातच कोरठण देवस्थानच्या अध्यक्षांना शिवसेनेच्या गोटातून भाजपात आणण्यात यश मिळवून तालुकाध्यक्ष कोरडे यांनी वरिष्ठांपुढे वजन निर्माण केले आहे. मात्र शिवसेनेचे तालुकाप्रमुख लंके यांना कार्यक्रमास न बोलावल्याने तालुका पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांची नाराजी होती. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीपुढे प्रश्नचिन्ह अाहे. भाजप उमेदवार आयात करण्याचीच जास्त शक्यता आहे. 


काँग्रेसचे माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे पुत्र राहुल झावरे गेली अनेक वर्षे राजकीय पुनर्वसनास धडपडत असताना नंदकुमार झावरे यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार औटी यांना केलेल्या मदतीची सव्याज परतफेड आमदार औटी यांनी राहुल यांना सभापती करून केली. पंचायत समितीच्या सभापतिपदी राहुल विराजमान झाल्याने तालुका काँग्रेसला नवसंजीवनी आली अाहे. तालुक्यात काँग्रेस पुन्हा सक्रिय झाली आहे. याच जोरावर काँग्रेसकडूनही स्वतंत्र उमेदवार देऊन विधानसभा निवडणूक गाजवू शकतात. जिल्हा परिषद सदस्या पुष्पा वराळ व पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर यांनी निघोज परिसरात काँग्रेसचा दबदबा निर्माण केला आहे. स्व. बाळासाहेब विखे यांचा प्रभाव पारनेर तालुक्यावर असल्याने खासदार विखेंना मानणारा एक गट तालुक्यात सक्रिय आहे. मात्र, यासंबंधीचे सर्व सुत्रे 'प्रवरे'तून हलत असल्याने काँग्रेसच्या भूमिकेकडेही लक्ष असणार आहे. 


उद्योजक, सभापतींसह अनेक इच्छुक 
कम्युनिस्टचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्या उज्ज्वला ठुबे, माजी सदस्य ॲड. आझाद ठुबे हे हातात लाल निशाण घेऊन कम्युनिस्टकडून तालुक्यातून निवडणूक लढवू शकतात. आमदार औटी यांचे भाचे असल्याने आझाद ठुबे यांना ऐनवेळेस औटींचे सहकार्य मिळू शकते. उद्योजक माधवराव लामखडे हेही पूर्ण ताकदीनिशी विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, काशिनाथ दाते, माजी सभापती गणेश शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्याही भूमिका काय ते महत्त्वाचे आहे. 


सर्वच राजकीय पक्षात अंतर्गत वाद 
सध्या सर्वच राजकीय पक्षांत अंतर्गत वाद सुरू आहे. याचा फटका सर्वांनाच बसणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपानंतर पुन्हा घरोबा करत नीलेश लंके यांनी संयम व जबाबदारपणा पुन्हा उदाहरण देऊन लंके-रोहोकले यांचे सुरू झालेले वादळ दोन दिवसांत संपवले, राष्ट्रवादीला आपले अंतर्गत मतभेद दूर करता आले नसून गटबाजी सुरूच आहे. सभापती राहुल झावरे व आझाद ठुबे हे दोघेही माजी आमदार पुत्र आहेत. आज आमदार विजय औटी यांच्या अधिपत्याखाली राजकारण करत असले, तरी विखे पॅटर्न ठरवेल तोच निर्णय राहुल झावरे यांना घ्यावा लागेल, हा मागील निवडणुकींचा इतिहास आहे.