आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भामट्या रिक्षाचालकाची वृद्धेस बेदम मारहाण; कान ओरबाडून लुटले दागिने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भामट्याने दागिने अाेरबाडल्याने कान व गळ्याला झालेली जखम दाखविताना लीलावती साेनवणे. - Divya Marathi
भामट्याने दागिने अाेरबाडल्याने कान व गळ्याला झालेली जखम दाखविताना लीलावती साेनवणे.

जळगाव- अमळनेर येथून जळगावात भाचीच्या लग्नासाठी आलेल्या वृद्ध महिलेस रिक्षाने सोडून देण्याचा बहाणा करून भामट्या रिक्षाचालकाने निर्मनुष्यस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. त्यानंतर कान ओरबाडून तिच्या अंगावरील ६७ हजार ८०० रुपयांचे दागिने लुटले. अंगावर शहारे आणणारी ही घटना रविवारी रात्री १० वाजता एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी पाेलिसात तक्रार देण्यासाठी गेलेल्या वृद्धेची जिल्हापेठ पोलिसांच्या हद्दवादामुळे अाठ तास फरफट झाली. सोमवारी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


लीलावती विनायकराव सोनवणे (रा.बालाजीपुरा, अमळनेर) असे वृद्धेचे नाव आहे. लीलावती यांचे भाऊ सुनील डिगंबर पाटील हे जुने जळगावात राहतात. त्यांची मुलगी रोहिणी हिचे मंगळवारी लग्न आहे. याच लग्नासाठी लीलावती रविवारी रात्री ७.३० वाजता एसटीने जळगावात आल्या हाेत्या. जुन्या गावात जाण्यासाठी त्या पायी निघाल्या होत्या. या वेळी पांडे चौकात त्यांना एक भामटा रिक्षाचालक भेटला. त्याने लीलावती यांना रिक्षाने सोडून देण्याचा आग्रह केला; पण त्यांनी नकार दिल्यानंतरदेखील रिक्षाचालकाने कमी पैशात सोडण्याचे सांगून लीलावती यांना रिक्षात बसवले. त्यानंतर जुने जळगावकडे न जाता पंचमुखी हनुमान मंदिराच्या दिशेने रिक्षा घेतली. लीलावती यांनी त्यास हटकल्यानंतर डिझेल भरण्याचे कारण पुढे करीत त्याने रिक्षा थेट एमआयडीसी परिसरात निर्मनुष्यस्थळी नेली. तेथे लीलावती यांना रिक्षातून खाली उतरवून चाकूचा धाक दाखवत मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत त्यांचे दोन्ही डोळे सुजले. यानंतर भामट्याने त्यांचा उजवा कान ओरबाडून कानातले सोन्याचे दागिने काढले. त्या पाठोपाठ मंगळसूत्र, सोन्याची पोत, टॅप्स, चांदीचे जोडवे हे सर्व दागिने ओरबाडून काढले. यानंतर ८०० रुपये रोख व १ हजार रुपये किमतीचा मोबाइलदेखील काढून घेतला. त्यानंतर महिलेला घरी जाण्याचे सांगितले. 


भामट्या रिक्षाचालकाने लीलावती साेनवणे यांना मारहाण सुरू केली असता, रस्त्यावरील काही नागरिकांनी त्याला हटकले. त्यावेळी रिक्षाचालकाने 'म्हातारी माझी मावशी असून ती वेडसर आहे' म्हणून ती विरोध करते आहे. मी तिला रिक्षातून घरी घेऊन जात अाहे, असे नागरिकांना सांगितले. त्यामुळे नागरिकांनी त्या रिक्षाचालकाकडे दुर्लक्ष केले. जर नागरिकांनी साेनवणे यांच्या अावाजाकडे लक्ष देऊन मदत केली असती तर कदाचित भामटा जेरबंद झाला असता. दरम्यान, शहरात गेल्या काही दिवसांपासून चाेरीच्या घटनामध्ये वाढ झाली पाेलिस प्रशासन चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्यात अपयशस्वी ठरत अाहे. 


पुन्हा पोलिस ठाण्यांचा हद्दवाद 
लीलावती यांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठले होते. तेथील डीबी कर्मचाऱ्यांनी लीलावती यांच्यासह पांडे चौकातील घटनास्थळाची पाहणी केली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत हद्द निश्चित करण्यात घालवले. घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याचे निश्चित करून लीलावती यांना माघारी पाठवले. त्यानंतर लीलावती यांनी ४ वाजता एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. त्या ठिकाणी सायंकाळी ६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, पाेलिस ठाण्यात हद्दीचा वाद हाेतात म्हणून पाेलिस अधीक्षकांनी यापूर्वीच पाेलिस अधिकाऱ्यांना सूचना देऊन वाद मिटविण्याच्या सूचना दिला अाहे. तरी देखील हद्दीचे वाद संपलेले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना खूप अडचणींना सामाेरे जावे लागत अाहे. 


भामट्याने २० रुपये देऊन पाठवले घरी 
लीलावती यांना मारहाण केल्यानंतर भामट्या रिक्षा चालकाने २० रुपये व आधार कार्ड परत करून घरी जाण्यास सांगितले. याच पैशातून लीलावती यांनी रिक्षाने नेरीनाका येथे जाऊन तेथून भाऊ सुनील पाटील यांचे घर गाठले. रात्री भावजय व भाच्यांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर सोमवारी एमअायडीसी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, भरत लिंगायत तपास करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...