आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरखेडा येथे घरफोडी; 3 लाखांचा एेवज लंपास; श्वानपथकाने पातोंडा रस्त्याकडे दाखवला माग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- घरात कोणी नसल्याचा फायदा घेत दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटातील १३३ ग्रॅम सोन्याचे व ५० भार चांदीचे मौल्यवान दागिने असा एकूण अडीच लाख रूपये किंमतीचा एेवज चाेरट्यांनी लंपास केला. ही घटना तालुक्यातील बोरखेडे येथील शेतकरी भीमराव महादू पाटील (वय ५१) यांच्या घरी रविवारी रात्री घडली. शहर व तालुक्यात चाेरीचे सत्र सुरुच असल्याने नागरिक भयभीत झालेले अाहेत. 


घटनास्थळी पोलिसांकडून पाचारण करण्यात आलेल्या श्वानपथकाने पातोंडा रस्त्याकडे चोरट्यांचा माग दाखवला. भीमराव पाटील हे पत्नी व मुलीसह बोरखेडे येथे राहतात. घराच्या समोर त्याचा वाडा असून तेथे एक खोली आहे. या खोलीत शेतीचे अवजारे, गुरांची ढेप व कपाशी ठेवलेली असते. त्यामुळे ही खोली रोज त्यांना उघडावी लागते. वाड्यातील खोलीत त्यांंनी एक लोखंडी कपाट ठेवलेले असून या कपाटात त्यांनी व त्यांच्या पत्नीने मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिनेे ठेवलेले होते. रविवारी रात्री ८ वाजता भीमराव पाटील यांच्या पत्नी कल्पना पाटील यांनी नेहमीप्रमाणे गुरांसाठी ढेप काढल्यानंतर वाड्याच्या दरवाज्यास कुलूप लावले. त्यानंतर सर्वजण जेवण करुन रात्री ९ वाजता झोपी गेले. त्यानंतर भीमराव पाटील हे सोमवारी सकाळी ५.३० वाजता झोपेतून उठून घराबाहेर आले असता त्यांना समोरील वाड्याच्या दरवाजाला असलेले कुलूप अाेट्यावर पडलेले दिसले. दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला होता. 


भीमराव पाटील यांनी वाड्यात डोकावून पाहिले असता लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी पत्नी व मुलीला बोलावून खात्री केली असता कपाटाचे पुढील व आतील कुलूप तुटलेले दिसले. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिणेही त्यांना मिळाले नाही. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला अाहे. तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश मानकर करीत आहेत. पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी घटनास्थळी येवून माहिती घेतली. 


वाहनाने चाेरटे पसार 
चाेरट्यांनी वाडयात कुणीच नसल्याची संधी साधत लोखंडी कपाटातील लॉकरममधील दागिने लंपास केले. या ठिकाणी जळगाव येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचरण करण्यात आले होते. श्वानपथकाने शेतातून मार्ग काढत पातोंडा रस्त्यापर्यंत माग दाखवला. तेथून चोरटे वाहनाने पसार झाले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांना या ठिकाणी काही ठसेही मिळाल्याचे सांगण्यात येते. 


परिसरात चाेरीचे सत्र 
शहर व तालुक्यात अाठवडाभरात चाेरीची ही तिसरी माेठी घटना अाहे. यात शहरातील दाेन धाडसी चाेऱ्यांच्या घटनांचा समावेश अाहे. मात्र एकही घटना उघडकीस अाली नाही. दाेन दिवसांपूर्वीच शहरात धुळे राेडवरील पाेस्टल काॅलनी राेडवर महिलेची साेनसाखळी चाेरट्यांनी लांबवली आहे. महिलेने चाेरट्यांचे वर्णन दिल्यानंतरही चाेरटे अद्याप पाेलिसांच्या हाती लागले नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...