आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडा हत्याकांड: फॉरेन्सिक लॅबने घेतले 13 वस्तुंचे नमुने, तिस-या दिवशी एकही संशयित हाती लागला नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
file photo - Divya Marathi
file photo

धुळे- साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील सामूहिक हत्याकांड प्रकरणी पोलिसांच्या फॉरेन्सिक लॅबने  ग्रामपंचायत कार्यालय व बाजारपेठेतील  १३ वस्तूंचे नमुने घेतले आहेत. तपासणीसाठी हे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत,  तर तिसऱ्या दिवशी पोलिसांच्या हाती एकही संशयित लागला नाही. त्यामुळे पाेलिस रेकॉर्डवर असलेल्या या  सामूहीक हत्याकांडातील अनेक मारेकरी पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. 


सामूहिक हत्याकांडमूळे संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेला राईनपाड्यामध्ये मंगळवारी घटनेच्या तिसऱ्या दिवशीही पोलिस अधिकारी तळ ठोकून होते. घटनेनंतर संपूर्ण गाव रिकामे झाले आहे. तर मारेकरीही गाव सोडून पसार झाले आहेत. त्यामुळे पोलिसांना संशयितांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. या घटनेनंतर फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने राईनपाडा गाठले. या पथकातील धुळयातील कर्मचारी हालोर यांच्यासोबतच नाशिक येथुनही पथक आले होते. या पथकाने ग्राम पंचायत कार्यालय, अाठवडे बाजार परिसरात जावुन तपासणी केली. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालयातील रक्ताने माखलेली भिंत, लोखंडी टेबल, रॉड, दांडे यांच्यावरील रक्ताचे नमुने घेतले. याशिवाय घटनास्थळी आढळलेले डाेक्याचे केसही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. रक्त व केसांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.  त्यासाठी विविध १३ गोष्टीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. नाशिक येथील न्याय वैद्यक प्रयोगशाळेत त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्याचा अहवाल पोलिसांना तपास व दोषारोप पत्रासाठी उपयुक्त ठरेल, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिव्य मराठीशी बोलताना  दिली.


न्यायाच्या आश्वासनानंतर पाच मृतांवर अंत्यसंस्कार
मंगळवेढा | धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे चोर समजून झालेल्या हल्ल्यात मृत पावलेल्या मंगळवेढा तालुक्यातील चार जणांपैकी दादाराव शंकर भोसले, भारत शंकर माळवे, भारत शंकर भोसले यांच्यावर खवे येथे तर आगणूक श्रीमंत इंगोले यांच्यावर  मानेवाडी येथे पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. हल्ल्यातील पाचवे मृत राजू श्रीमंत भोसले यांच्यावर  कर्नाटकातील गोंदवन गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.  सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मतदेह घेऊन रुग्णवाहिका मानेवाडी येथे दाखल झाली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी मारहाणीची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत स्वतःच्या हस्ताक्षरात न्याय देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने डवरी गोसावी समाजाने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.   

 

पोलिसांचे मात्र मौन 

या घटनेप्रकरणी दुसऱ्या दिवशी सहा जणांना ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याकडे चौकशीही करण्यात येत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.  याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्याचे अधिकारी पी. बी. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नकार दिला. तर तपास अधिकारी डीवायएसपी श्रीकांत घुमरे यांनी मात्र सामूहिक हत्याकांडाच्या घटनेनंतरही  मौन बाळगणे पसंत केले.

 

बातम्या आणखी आहेत...