आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीवर मद्यपीची दगडफेक; महिला वाहक, चालक जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महामार्गावरील खेडी गावाजवळ ओव्हरटेक करून अचानक समोर आलेल्या दुचाकीस्वाराचा भुसावळ-सुरत बसच्या चालकाने तत्परतेने ब्रेक दाबून जीव वाचवला. तरीही मद्यधुंद दुचाकीस्वाराने वाहक व चालकाला शिविगाळ करून बसवर दगडफेक केली. या दगडफेकीत वाहक व चालक जखमी झाल्याची घटना गुरूवारी सायंकाळी खेडी गावाजवळ घडली. 


यात वाहक दीपक रामकृष्ण बडगुजर (वय ४०) यांच्या नाकावर दगड लागल्याने ते जखमी झाले अाहेत, तर चालक अनिल उत्तम पाटील यांच्या हातावर व छातीवर देखील दगडाचा मार लागला अाहे. गुरुवारी भुसावळ-सुरत(एमएच २०, बीएल ३७३६) ही बस ४.३० वाजता भुसावळवरून जळगावकडे निघाली. दरम्यान, खेडी गावाजवळ सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास भुसावळकडे जाणाऱ्या दुचाकी (एमएच १९, सीक्यू ०६९४)ही एका वाहनाला अाेव्हरटेक करुन अचानक बससमाेर अाली. त्यामुळे बसचालक अनिल उत्तम पाटील यांनी बसचे तत्परतेने ब्रेक दाबून दुचाकीस्वाराला वाचवले व बस थांबवली. तर भरधाव वेगात असलेली दुचाकी बससमोर रस्त्यावर पडली. या अपघातात दुचाकीस्वाराला काहीच लागले नाही. परंतु, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या दुचाकीस्वाराने बसच्या चालकाला शिविगाळ द्यायला सुरूवात केली. त्यानंतर त्याने एसटीवर दगडफेक करणे सुरु केले. 


मद्यपी दुचाकीस्वार शिविगाळ करत असल्याने महिला वाहक बडगुजर या चालकाच्या कॅबीनमध्ये गेल्या व दुचाकीस्वाराला जाब विचारू लागल्या. परंतु, मद्यपीने त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. तसेच बसवर दगडफेक करायला सुरूवात केली. त्यामध्ये बडगुजर यांच्या नाकावर दगड लागून त्या जखमी झाल्या. तर याच बसमधून प्रवास करणाऱ्या परेल बस डेपोमध्ये कार्यरत असलेल्या वाहक शीतल कापसे या देखील दोघांच्या मदतीसाठी समोर आल्या. मद्यपीने कापसे यांनाही धक्काबुक्की केली. त्यानंतर सर्वजण बस खाली उतरले. जखमी झालेल्या बडगुजर यांना या बसमधून प्रवास करणारे भुसावळ बस डेपोचे चालक भगवान फकीर ठाकूर यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मद्यपी दुचाकीस्वाराने धक्काबुक्की करताना वाहक बडगुजर यांच्या खिशातील १ हजार रूपये बळजबरीने चोरून नेल्याचे चालक पाटील यांनी सांगितले. 


बसला एक तास उशीर 
या बसमध्ये ३९ प्रवासी होते. घटनेनंतर काही प्रवाशी दुसऱ्या बसमध्ये निघून गेले. मात्र, काही वृद्ध प्रवासी बसमध्ये एक तास ताटकळत बसलेले होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बस एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेण्यात आली. चालक पाटील यांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. मात्र, या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. 

बातम्या आणखी आहेत...