आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमळनेर- शहरात संशयित कृत्रिम (प्लास्टिक) अंडे आढळल्याच्या तक्रारीची अन्न व औषध प्रशासन विभागाने गंभीर दखल घेतली अाहे. या खात्याचे निरीक्षक आर. आर. चौधरी यांनी होलसेल विक्रेते नसीरखाँ हुसेनखाँ यांच्या बेस्ट आम्लेट सेंटरवर रविवारी (दि.११) दुपारी छापा टाकला. त्यांनी येथील अंडे ताब्यात घेतले असून काही अंड्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे रवाना केले आहेत.
केशवनगरातील संग्राम पाटील यांनी बंगाली फाईल परिसरातील किरकोळ स्वरुपातील अंडे विक्रेते शिवतीर्थ महाजन यांच्या दुकानातून ७ फेब्रुवारी रोजी १२ अंडे विकत घेतले होते. त्यांनी हे अंडे बॉइल केल्यानंतर त्यातील काही अंडे कृत्रिम (प्लास्टिकचे) असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. तसेच संग्राम पाटील यांनी हे संशयित कृत्रिम अंडे आमदार शिरीष चौधरी यांना दाखवले. आमदार चौधरी यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केलेली आहे. या विभागातील निरीक्षक चौधरी यांनी प्रारंभी किरकोळ स्वरुपातील अंडे विक्रेते शिवतीर्थ महाजन यांच्याकडे चौकशी केली.
महाजन यांनी हे अंडे होलसेल विक्रेते नसीरखाँ हुसेनखाँ यांच्या बेस्ट आम्लेट सेंटर येथून आणल्याचे सांगितले. त्यामुळे या सेंटरवर हा छापा टाकण्यात आला. नसीरखाँ यांनी हे अंडे धुळे जिल्ह्यातील मुक्टी येथून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. त्यामुळे निरीक्षक चौधरी यांनी धुळे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली आणि चौकशीच्या सूचना दिल्या अाहेत.
अहवालानंतर कारवाई
संशयित अंडे तपासण्यासाठी ताब्यात घेतले आहेत. ते सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाने पुणे किंवा मुंबई येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील. त्यांच्याकडी अहवाल अाल्यानंतर योग्य कारवाई केली जाईल.
- आर. आर. चौधरी, अन्न व औषध निरीक्षक, अमळनेर विभाग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.