आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅनलाइन बदलीविरोधात शिक्षक संघटना उभारणार न्यायालयीन लढा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बदली प्रक्रियेत अन्याय झालेल्या विस्थापित शिक्षकांच्या न्यायासाठी संगणकीय बदली प्रणाली विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याचा ठराव सोमवारी भाऊसाहेब राऊत विद्यालयात झालेल्या शिक्षक संघटनेच्या बैठकीत करण्यात आला. प्रशासनाने हा घोळ दूर झाल्याशिवाय नवीन पोर्टल सुरू करू नये, या मागणीचा ठरावही या वेळी करण्यात आला. अखिल जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने ही बैठक घेतली. दरम्यान, या प्रक्रियेविरोधात सोमवारी राज्य शिक्षक सेना, राष्ट्रवादी शिक्षक संघासह विविध शिक्षक संघटनांनीही सीईओंना निवेदन दिले. 


जिल्हा बदलीप्रक्रियेत ज्या शिक्षकांवर अन्याय झाला, तसेच शासन निर्णयानुसार बदलीप्रक्रिया राबवली गेली नाही. अशा शिक्षकांना न्यायालयीन लढाईसाठी योग्य दिशा मिळावी, यासाठी ही सहविचार सभा घेण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी या वेळी बदली प्रक्रियेत झालेला अन्यायाविरोधात शिक्षकांना करावा लागणारा संघर्षाविषयी माहिती दिली. या वेळी अन्यायग्रस्त शिक्षकांनी आपल्या व्यथा मांडल्या. ९० टक्के बदलीप्रक्रिया योग्य पद्धतीने झाली असली तरी १० टक्के शिक्षकांवर अन्याय होता कामा नये, यामुळे या शिक्षकांसाठी लढा लढण्याचाही ठराव करण्यात आला. बदली प्रक्रियेच्या अंमलबजावणीतील दोष शोधून त्यावर न्यायालयीन व विधायक लढा उभारावा, अन्यायग्रस्त शिक्षकांच्या पाठीशी उभे राहण्याचाही शिक्षकांनी निर्णय घेतला. 


या लढ्याविषयी सर्व माहिती वकीलपत्र, केससाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, न्यायालयाची फी, याविषयी माहिती रवींद्र सोनवणे यांनी दिली. तर या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात अाली. या बैठकीस दोनशेपेक्षा अधिक शिक्षक सहभागी झाले होते. बैठकीत महिला अध्यक्ष ज्योती राणे, उपाध्यक्ष लालचंद साळुंखे, प्रसिद्धी प्रमुख नीलेश अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. 


बदलीप्रक्रियेत एकाच शिक्षकास दोन ऑर्डर देण्याचा प्रकारही या वेळी उघड झाला. नवलसिंग धर्मा पाटील (भडगाव) यांना बोराडखेडा (ता. चाळीसगाव) यासह बहाळ (ता. चाळीसगाव) या दोन शाळांवर हजर होण्याच्या ऑर्डर देण्यात आल्याचेही या वेळी सांगण्यात आले. 


बंद शाळेत ४ जणाना नियुक्त्या 
या प्रक्रियेत पाचोरा कन्याशाळा २ बंद अवस्थेत आहे. मात्र, या शाळेतही ४ शिक्षकांना नियुक्त्या देण्याचा अजब प्रकार घडल्याचेही शिक्षकांनी सांगितले. ज्याची मागील वर्षी जिल्हा बदली झाली आहे, त्यांनी अर्ज भरायचे नव्हते. मात्र, संगणक प्रणालीत त्यांचे अर्ज स्वीकारले गेले व त्यांनी खो दिलेले शिक्षक विस्थापित झाले आहेत. यासह काहींना ३० किलोमीटरपेक्षा अधिक दूर दिले आहे. तसेच काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त शिक्षक दिले आहेत. यामुळे त्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. 


सीईओ, शिक्षणाधिकाऱ्यांनी केले हात वर 
शिक्षक संघटनांनी बैठकीनंतर आपल्या व्यथा सीईओ शिवाजी दिवेकर यांच्यासह प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, सभापती पोपट भोळे यांच्याकडे मांडल्या. मात्र, हा निर्णय आपला नसून यावर काही करू शकत नसल्याचे सांगत हात वर केले. यामुळे शिक्षकांनी आता कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. यात बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. मात्र, विस्थापित शिक्षकांचा प्रश्न सोडण्यावर त्यांनी मौन बाळगल्याचेही शिक्षकांनी सांगितले. 


बदल्या फेल ठरल्याने वाढली यंत्रणेची डोकेदुखी 
शिक्षकांच्या अाॅनलाइन बदल्यांचा प्रयाेग फसल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला अाहे. अाॅनलाइन प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ३ हजार ३६१ शिक्षकांच्या बदल्या झाल्या अाहेत. या बदल्यांमध्ये जागा अस्तित्वात नसलेल्या शाळेत नियुक्ती मिळणे, एकाच शिक्षकाला दाेन ठिकाणचे बदली अादेश मिळाल्याचे प्रकार घडले अाहेत. या बदल्यांविराेधात शिक्षक संघटनांनी अांदाेलनाचा पवित्रा घेतला अाहे. बदल्यांमध्ये मराठी माध्यमाचे ५५ मुख्याध्यापक असून उर्दू माध्यमाचे २६ मुख्याध्यापक अाहेत. जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात २१२ शिक्षक, भडगावमध्ये १८८ शिक्षक, भुसावळ १२१, बाेदवड ७०, चाळीसगाव ४०७, चाेपडा २६२, धरणगाव २११, एरंडाेल १८२, जळगाव २४७, जामनेर ३७५, मुक्ताईनगर १२२, पाचाेरा ३०३, पाराेळा २१९, रावेर २१९ अाणि यावलमध्ये २२३ शिक्षकांच्या बदल्या झाल्या अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...