आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन मंदिरांचे अतिक्रमण हटविल्यास मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी उभारले चबुतरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - पांझरा नदीकाठावरील रस्त्यांसाठी कालिकादेवी आणि शीतलादेवी मंदिराचे अतिक्रमण काढण्याची नोटीस प्रशासनाने मंदिर व्यवस्थापनांना दिली. प्रशासन स्वत:च हे अतिक्रमण काढणार आहे. या मंदिरांमधील मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी गणपती मंदिराच्या शेजारी सिमेंटचे चबुतरेही तयार केले अाहेत. प्रशासनाची तयारी पूर्ण झाली अाहे. केवळ संभाजी भिडे यांच्या सभेमुळे   अतिक्रमण हटविण्याची कारवाई पुढे ढकलली जात अाहे. त्यातच मंदिर बचाव समितीने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे यात काही निर्णय हाेताे का याकडेही प्रशासनाचे लक्ष लागले अाहे. 

 

पांझरा नदी किनाऱ्यावर रस्ता कामांसाठी अडथळे ठरणारे अतिक्रमण काढण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. यामुळे विरोधी गटानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. शीतलादेवी मंदिर आणि कालिकादेवी मंदिरावरून वातावरण सतत तणावपूर्ण हाेत अाहे. मंदिरांचे अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने मंदिर व्यवस्थापन आणि पुजाऱ्यांना तीन दिवसांची नोटीस दिली. त्याची मुदत गुरुवारी संपली. यानंतर प्रशासन अतिक्रमण काढणार हाेते. मात्र साेमवारी (दि.२८) शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे हे शहरात येणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमासाठी शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. त्यातच जर अतिक्रमण काढण्यात आले तर पोलिसांवरील ताण वाढेल. त्यामुळे तूर्त संभाजी भिडे यांचा दौरा आटोपेपर्यंत मंदिराच्या अतिक्रमणाला हात लावायचा नाही, असा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. 
एकीकडे मंदिराचे अतिक्रमण काढण्यास मंदिर बचाव कृती समितीने विरोध दर्शवलेला असला तरी प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून धार्मिक भावनांचा आदर राखत मंदिरे हटविण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने पांझरेश्वर गणपती मंदिराच्या शेजारी १० बाय १० आकाराचे दोन चबुतरे बांधले आहेत, असे दिसते. या दोन चबुतऱ्यांवर कालिका देवी आणि शीतलादेवी यांची प्रतिष्ठापना करण्याचे नियोजन प्रशासनाने केलेले आहे. या ठिकाणी मंदिराची प्रतिष्ठापना करण्यासाठी काही धर्म संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही जागा दाखविली हाेती, अशी माहिती मिळाली. 

 

मंत्री डाॅ. भामरे बाेलणार मुख्यमंत्र्यांशी... 
मंदिर बचाव कृती समितीने केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनाही मंदिरे वाचविण्याचे साकडे घातले. या वेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांनी मंदिर बचावासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या वेळी कृती समितीने मंदिर वाचविण्यासाठी रस्ता वळविण्यात यावा. तसेच रस्त्यासंदर्भात हरित लवादाकडे तक्रार आहे. तो निर्णय होईपर्यंत मंदिर हटविण्यात येऊ नये म्हणून विनंती केली.यावर मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा प्रकार घालण्याचे आश्वासन दिले. या वेळी मनोज मोरे, महेश मिस्तरी, हिरामण गवळी, संजय वाल्हे, हेमलता हेमाडे, दीपा नाईक, भिकन वराडे उपस्थित होते. 


अामदार गाेटेंच्या समर्थनार्थ महिला ब्रिगेड... 
अामदार अनिल गाेटे यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढल्यानंतर पुन्हा अाराेप-प्रत्याराेप झाले. त्यातून अंत्ययात्रा काढणाऱ्या महिलांमध्ये पुन्हा संताप निर्माण झाला. त्यानंतर अाता अामदार गाेटे यांच्या समर्थनार्थ लाेकसंग्राम संघटनेची महिला ब्रिगेड पुढे अाली अाहे. त्याचबराेबर युवकही पुढे सरसावले अाहेत. अामदार गाेटे यांच्या केसालाही धक्का लागला तर सहन करणार नाही, असा इशारा पत्रकात देण्यात अाला अाहे. गाेटे जनहिताचे सार्वजनिक काम करीत अाहेत. धर्माच्या नावाने विकासाला विराेध करणाऱ्यांना अाता शहरवासीय जागा दाखवतील, असेही म्हटले अाहे. 


बैठकांच्या फेऱ्या सुरूच 
एकीकडे प्रशासन मंदिरांचे अतिक्रमण काढण्याच्या निर्णयावर ठाम आहे. तर दुसरीकडे मंदिर बचाव कृती समितीने मंदिर वाचवण्यासाठी दररोज बैठकांच्या फेऱ्या सुरू ठेवल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी कालिकादेवी मंदिरात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या वेळी मंदिर वाचवण्यावर चर्चा झाली. कृती समिती सक्रिय झाली अाहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका बदलली अाहे. मात्र ही भूमिका तात्पुरती ठरू शकते. अतिक्रमण विषयीचा प्रश्न कायम अाहे. 

बातम्या आणखी आहेत...