आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतनगरी मुक्ताईनगरात दिंड्यांच्या आगमनला सुरुवात ! 200 दिंड्या येणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्ताईनगर- महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची चार प्रमुख शक्तीपीठे आहेत. यापैकी कोथळी येथील आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ एक धाम आहे. या तीर्थक्षेत्रासह योगिराज चांगदेव यांचे तपस्थळ असलेल्या चांगदेव (ता.मुक्ताईनगर) येथे शनिवारपासून यात्रोत्सव भरणार आहे. शुक्रवारी ध्वजावतरण करून या माघवारी महाशिवरात्री महायात्रेस सुरुवात करण्यात आली. शनिवारी सकाळपर्यंत कोथळी, मुक्ताईनगर व चांगदेव येथे सुमारे २०० दिंड्या दाखल होणार आहेत.

 
संत मुक्ताई  व चांगदेव यांच्यातील गुरु-शिष्याचे नाते अतुट स्नेहाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. माघवारी महाशिवरात्री यात्रोत्सव खान्देशातील भाविकांसाठी पर्वणी असते. शुक्रवारी सकाळी श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे मुक्ताई  मंदिरात कलशपूजन, ध्वजपूजन व ध्वजावतरण विधी पार पडला. संस्थानचे  अध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील, पुजारी विनायक व्यवहारे यांनी हे विधी पार पाडले. व्यवस्थापक उद््धव महाराज जुनारे, रवींद्र महाराज हरणे, नाशिक येथील कदम माऊली, आत्माराम हातोलकर, पंकज पाटील व वारकरी उपस्थित होते. शनिवारपासून महाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या यात्रोत्सवास खान्देशसह विदर्भ, मराठवाडा व मध्य प्रदेशातून हजारो वारकरी पायी दिंडीने मजल दरमजल करत  चांगदेव, मुक्ताईच्या दर्शनासाठी येतात. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव, चिखली, भानगुरे, निमखेडी, पिंपरी, खामखेडे, सातोड,  रूईखेडे, इच्छापूर, वरणगाव, तळवेल आदी गावांमध्ये लांब अंतरावरून आलेल्या दिंड्या अखेरच्या  मुक्कामाला आहेत. शनिवारी सकाळपासूनच त्यांचे मुक्ताईनगरीत आगमन होईल. 

 

२०० दिंड्या येणार 
माघवारी महाशिवरात्री यात्रोत्सवात २०० दिंड्यात मुक्ताईनगर, कोथळी, चांगदेव येथे येतात. त्यात झेंडूजी महाराज बेळीकर, गोमाजी महाराज (नागझरी),  गजानन  महाराज (शेगाव), रुख्मिणी माता (कौडण्यपूर), सखाराम महाराज (सखारामपूर), भोजने महाराज  (अटाळीकर), सोनाजी  महाराज (सोनाळा), रूपराव महाराज, जगन्नाथ महाराज अंजाळेकर, दिंगबर महाराज (चिनावल), पंढरीनाथ  महाराज या संत परंपरेतील मानाच्या दिंड्यांचा समावेश असतो.  

बातम्या आणखी आहेत...