आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वखर्चाने चार दिव्यांगांना बांधून दिली शौचालये;कारखान्यातील निवृत्त कर्मचाऱ्याचे अाैदार्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फैजपूर (जि. जळगाव)- स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेत पिंपरुड (ता. यावल) येथील साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने स्वत:चे एक लाख रुपये खर्च करून गावातील चार दिव्यांग बांधवांना शौचालय बांधून दिले. प्रत्येक शाैचालयासाठी सुमारे २५ हजार खर्च केला. सध्या शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या दात्याचे नाव भागवत सुपडू पाटील आहे. स्वच्छतेच्या कामात खारीचा वाटा उचलून परमेश्वराची भक्ती व हातून सत्कर्म घडावे, या उद्देशाने त्यांनी हे काैतुकास्पद काम केले.   


फैजपूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर पिंपरुड हे गाव आहे. मधुकर सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त हंगामी कर्मचारी भागवत पाटील हे त्यांच्या पत्नी सुनंदा यांच्यासह या गावात राहतात. शेतमजुरी करून पाटील दांपत्याचा उदरनिर्वाह चालतो. एखाद्या चांगल्या कामात आपलेदेखील योगदान असावे, असा हेतू मनात बाळगून असलेल्या पाटील यांना स्वच्छता अभियानापासून प्रेरणा मिळाली. उघड्यावरील हागणदारी बंद झाल्यास होणारे फायदे, त्यात लोकसहभाग वाढावा यासाठी सरकार व प्रशासनाकडून होणारे प्रयत्न त्यांना भावले. या कामात आपला देखील खारीचा वाटा असावा, या उद्देशाने पाटील यांनी आयुष्यभराची जमापुंजी स्वच्छताविषयक कार्यासाठी सत्कारणी लावण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांनी प्रत्येकी २५ हजार रुपये खर्च करून गावातील चार कुटुंबांना शौचालये बांधून दिली. यापैकी तीन कुटुंबातील एक सदस्य दिव्यांग, तर एका कुटुंबातील सदस्य अंध आहे. शौचालयामुळे त्यांची गैरसोय दूर होईल, या हेतूने पाटील यांनी ही पदरमोड केली. त्यांनी अनुक्रमे रामा यादव सुरवाडे, उत्तम टिकाराम सुरवाडे, सुनील वासुदेव इंगळे आणि प्रभाकर रूपचंद सुरवाडे यांना शौचालये बांधून दिली. 

 

गैरसाेय दूर झाली
भागवत पाटील कुटुंबाने आम्हाला शौचालय बांधून देत मोठी गैरसोय दूर केली. त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आमच्याजवळ शब्द नाहीत. आम्हीही स्वच्छताविषयक कार्यासाठी शक्य तसे प्रबोधन करू.
-प्रभाकर सुरवाडे, ग्रामस्थ

 

स्वच्छता अभियानातून प्रेरणा
अंध, दिव्यांग बांधवांच्या घरी शौचालय बांधून देण्याची प्रेरणा स्वच्छता अभियानातून मिळाली. चांगल्या कामात खारीचा वाटा असावा, असा माझा हेतू होता. गावाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उघड्यावरील हागणदारी बंद व्हावी.
-भागवत पाटील, निवृत्त कर्मचारी

बातम्या आणखी आहेत...