आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे मिळाल्यानंतरच अस्थीविसर्जन; मृत शेतकरी धर्मा पाटील यांच्या मुलाचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- ‘अामच्या जमिनीचे फेरमूल्यांकन केले. ५४ लाख ४८ हजार १३२ रुपयांचा मोबदला मान्य केला. पण अद्यापपर्यंत आपल्याला कोणतेच पत्र मिळाले नाही. अथवा काेणत्याही शासकीय अधिकाऱ्याने संपर्क साधलेला नाही. प्रत्यक्ष  शासनाकडून मोबदला मिळत नाही. तोपर्यंत वडिलांच्या अस्थींचे विसर्जन करणार नाही’, असा पवित्रा धर्मा पाटील यांचा मुलगा  नरेंद्र पाटील यांनी घेतला आहे.   


धर्मा पाटील यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन झाले. तसा अहवाल िजल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयात पाठवला. हे वृत्त माध्यमांतूनच अाम्हाला समजले, असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले. ‘वडिलांच्या आत्महत्येनंतर अद्यापपर्यंत प्रशासकीय यंत्रणेतील कोणत्याच अधिकारी  किंवा कर्मचाऱ्यांनी  परिवाराशी संपर्क  केलेला नाही. तसेच मोबदला मान्य केल्याचे कोणतेच पत्र देण्यात आलेले नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, धर्मा पाटलांच्या मृत्यूनंतर शासनाने जिल्हा प्रशासनाला जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे आदेश दिले होते. सरकारकडून नव्याने देण्यात येणाऱ्या या मोबदल्यात नव्या कायद्यातील तरतुदीनुसार सानुग्रह अनुदानाचा समावेश आहे. आंब्याच्या झाडांचे मूल्यही विचारात घेण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत फक्त प्रशासकीय स्तरावरच हालचाली सुरू आहेत. मात्र पाटील परिवाराशी शासनाकडून संपर्क करण्यात अालेला नाही.

 

सरकारने खबरदारी घ्यावी : एकनाथ खडसे
तापी नदीवर बॅरेज उभे करून मोठा अवधी उलटला. मात्र अद्याप शेताच्या बांधापर्यंत पाणी पोहाेचलेले नाही. शेतकरी हवालदिल झालेला अाहे. अशातच संघर्ष करीत धर्मा पाटील सारख्या शेतकऱ्याने आत्महत्या करावी ही शोकांतिका आहे. सरकारने ठोस उपाययोजना करून दुसरा धर्मा पाटील होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करावा, असा सल्ला माजी महसूलमंत्री तथा अामदार  एकनाथ खडसे यांनी बुधवारी सरकारला दिला.

बातम्या आणखी आहेत...