आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाच्या तारखेसाठी गेलेल्या भामट्याने वृद्धाला गंडवले, सीसीटीव्ही फुटेजमुळे काही तासांतच ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - फसवणुकीच्या गुन्ह्यातील शनिपेठेतील संशयित जामनेर न्यायालयात तारखेवर गेल्यानंतर त्याने मिळालेल्या फावल्या वेळात परिसरातीलच एका बँकेत वृद्धाचे १५ हजार रूपये लुबाडल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला. सीसीटीव्ही फुटेजमुळे काही तासांतच हा भामटा पकडला गेल्यामुळे वृद्धाला पैसे परत मिळाले.

 

शहरातील शनिपेठ भागात राहणारा हा भामटा आहे. तो टापटीप कपडे घालून बँकांमध्ये वृद्धांना भुलथापा देत पैसे लुबाडण्याचा 'प्रताप' गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. काही गुन्ह्यांमध्ये त्याला अटक केली असून खटल्यांचे न्यायालयात कामकाज सुरू आहे. अशाच एका खटल्याच्या तारखेवर हजर राहण्यासाठी तो दोन दिवसांपूर्वी जामनेर न्यायालयात गेला होता. न्यायालयीन कामकाजात ब्रेक मिळताच त्याने फावल्या वेळात जामनेर शहरातील एक बँक गाठली. त्याने पैसे भरण्यासाठी आल्याचा बनाव केला. आपला सहकारी काही वेळात पैसे घेऊन येत असल्याचे सांगत त्याने काही वेळासाठी बँकेत उभ्या असलेल्या एका वृद्धाकडून १५ हजार रूपये घेतले. पैसे खिशात ठेऊन पैसे भरण्याच्या काउंटरजवळ काही वेळ घुटमळला. काही सेकंदातच वृद्धाची नजर चुकवून मोबाइलवर बोलण्याच्या बहाण्याने त्याने बँकेतून पोबारा केला. ही बाब वृद्धाच्या लक्षात येताच त्याने बँक मॅनेजरकडे तक्रार केली. काही वेळातच तेथे जामनेर पोलिस ठाण्याचे कर्मचारीदेखील दाखल झाले. बँकेत मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये भामट्याच्या सर्व हालचाली कैद झाल्या होत्या.


हा भामटा जळगावाचा असल्याचा अंदाज लावत जामनेर पोलिसांनी शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाेध पथकाच्या कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअॅप वरून फुटेज पाठवले. त्याची ओळख पटताच गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी थेट त्याच्या घरी पोहोचले. तो जामनेर येथे न्यायालयाच्या तारखेवर गेल्याची माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली.

 

वॉरंटच्या नावाने भामट्यास बोलावले
शहर पोलिसांनी भामट्याला मोबाइलवर संपर्क करुन त्याला वॉरंट बजावण्याच्या कामासाठी पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्याला खाक्या दाखवताच त्याने जामनेरमध्ये वृद्धाचे पैसे लुबाडल्याची कबुली देऊन ५०० रूपये खर्च झाले असून उर्वरीत १४ हजार ५०० रूपये पोलिसांच्या स्वाधीन केले. शहर पोलिसांनी ही माहिती जामनेर येथे दिली. त्यानंतर भामट्याला जामनेर येथे नेण्यात येऊन वृृद्धाला पैसे परत मिळाले. मात्र, त्यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने गुन्हा दाखल झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...