आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे वनपरिक्षेत्रात तीस बिबटे; नऊ वर्षांत संख्येत चौपट वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- वन विभागातर्फे होणाऱ्या सकारात्मक प्रयत्नामुळे धुळे वनपरिक्षेत्रातील बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत वन परिक्षेत्रात सुमारे ३० बिबट्यांचे वास्तव्य आहे. मोबाइल अॅप्स, जीपीएस प्रणाली सारख्या हायटेक प्रणालीचा वापर करून झालेल्या वन्यजीवांच्या गणनेनंतर हा आकडा समोर आला. यापूर्वी सन २००९मध्ये वन्यजीवांची गणना झाली होती. त्या वेळी केवळ सहा बिबटे होते. गेल्या नऊ वर्षांत बिबट्यांची संख्या चौपट वाढली असल्याची माहिती देण्यात आली होती. 


वन विभागातर्फे दरचार वर्षांनी वन्यजीवांची गणना करण्यात येते. त्यानुसार यापूर्वी २००९मध्ये गणना झाली होती. त्या वेळी धुळे वनपरिक्षेत्रात केवळ सहा बिबटे असल्याची नोंद होती. त्यानंतर वन्यजीवांची गणना मात्र झाली नव्हती. दरवर्षी बुद्ध पाैर्णिमेला वन्यजीव निरीक्षण करून नोंद घेतली जात होती. त्यामुळे वन्यजीवांची ढोबळमानाने माहिती व संख्या स्पष्ट होत असे; परंतु बिबट्यांची संख्या वाढीबद्दल मात्र कोणतेही संकेत मिळत नव्हते. दुसरीकडे दरवर्षाप्रमाणे यंदाही वन्यजीवांची गणना झाली. या वेळी गणनेसाठी माेबाइल अॅप्स, जीपीएस प्रणालीचा वापर करण्यात आला. त्यासाठी दोन अॅप्स तयार केले आहेत. 


अशी होती २००९ची वन्यजीव गणना 
यापूर्वी सन २००९मध्ये वन्यजीव गणना झाली होती. त्या वेळी सहा बिबटे, ७७ कोल्हे, २७ तरस, १४६ लांडगे, २५५ चिंकारा जातीची हरणे, ५४ रानडुक्कर व इतर प्राण्यांसह एकूण ७८८ वन्यजीव धुळे वनवृत्तात होते. दरम्यान, लळिंग कुरण परिसरात वनपर्यटन विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांतर्गत वन्यजीवांसाठी पाणवठे तयार करण्यात आले आहे. 


वाघाप्रमाणेच बिबट्याला संरक्षण 
वनअधिनियम सन १९७२च्या तरतुदीनुसार वाघानंतर बिबट्या हा श्रेणी क्रमांक एक मधील वन्यजीव मानला जातो. शिवाय वाघाप्रमाणेच बिबट्यांची अन्नसाखळी आहे. बिबट्यांची संख्या वाढावी यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. वाघा प्रमाणेच बिबट्याची शिकार करणाऱ्याला किमान तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बिबट्याचे आयुर्मान सरासरी २० वर्षे मानले जाते. 


वन विभागाचे प्रयत्न 
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वन विभाग तत्पर आहे. वन विभागाने केलेली कामे, वनक्षेत्रात बिबट्यांसाठी अन्नसाखळी उपलब्ध आहे. तसेच बिबट्यांबद्दल ग्रामस्थांमध्ये प्रबोधन केले. जंगलात जाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे बिबट्यांचा अधिवास कायम राहिला. परिणामी बिबट्यांची संख्या वाढली. वन विभागाच्या कार्याची ही पावती म्हणावी लागेल. 
- संजय पाटील, सहवन संरक्षक

बातम्या आणखी आहेत...