आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलाच्या बांधकामावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी; सहा जण जखमी; दोघे गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नाल्यावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावरून रविवारी दुपारी १.३० वाजता मेहरूण परिसरात दोन गटात जाेरदार हाणामारी झाली. यात कुऱ्हाड, फायटर, लोखंडी टॉमी, बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या अासारी लाकडी दांड्यांचा वापर करून दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात नगरसेवक, एक महिलेसह दोन्ही गटातील सहा जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


मेहरूण परिसरातील पिरजादे वाड्यालगत मेहरूणचा गाव दरवाजा अाहे. या परिसरातून वाहणाऱ्या नाल्यावर पूल बांधण्याचे काम गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. नगरसेवक इकबालोद्दीन जियाउद्दीन पिरजादे (वय ६०) हे या बांधकामावर लक्ष ठेवून आहेत. रविवारी सकाळी महापालिकेचे अभियंता विजय मराठे यांनी बांधकाम कारागिरांना मोजमाप करून दिले होते. त्यानंतर काही वेळातच नगरसेवक पिरजादे तेथे पोहचले. त्यांनी पार्टिशन काढले. दुपारपर्यंत काम सुरू होते. त्यानंतर दुपारी १.३० वाजता परिसरातच राहणारे मोहंमद शकिल मोहंमद सईद जहागीरदार यांनी विरोध केला. खासगी जागेवर अतिक्रमण करून पुलाचे बांधकाम सुरु आहे. यात काही लोकांचे अतिक्रमण वाचवण्यासाठी नगरसेवक पिरजादे हे बांधकाम खासगी जागेकडे सरकवत असल्याचा आरोप शकिल यांनी केला. दोघांमध्ये वाद सुरू होताच दोन्ही गटातील ३०-३५ जण समोरासमोर अाले. क्षणात या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. 


शकिल यांनी डोक्यात कुऱ्हाड मारल्याचा आरोप नगरसेवक पिरजादे यांनी केला. तर आपल्या डोक्यात आसारी, लोखंडी टाॅमी नगरसेवक पिरजादेंनी मारल्याचा आरोप शकिल यांनी केला आहे. या दोघांच्याही डोक्यावर अणकुचीदार शस्त्राने वार केल्याचे व्रण आहेत. दोघांना टाके टाकले आहेत. या शिवाय शकिल यांचे वडील मोहंमद सईद अब्दुल्लामिया जहागीरदार (६२) शहीस्ताबी हमीदमिया जहागीरदार (२०) हे जखमी झाले. तर दुसऱ्या गटातील नगरसेवक पिरजादे यांच्यासह त्यांचा मुलगा मोहंमद नसीबदारा इकबालोद्दीन पिरजादे (२४) आणि पुतण्या अलताफ हुसेन नसिउद्दीन पिरजादे (३२) हे तिघे जखमी झाले. यात नगरसेवक पिरजादे, मोहंमद सईद मोहंमद शकिल हे गंभीर जखमी झाले. अलताफच्या गालावर फायटरने वार झाले आहेत. 


नगरसेवक पिरजादे यांच्या फिर्यादीवरून शफिक मिया सईद मिया, सईद मिया अब्दुल मिया, शकिल मिया सईद मिया, मनावर मिया माजिद मिया, माजिद मिया अब्दुल मिया, हमीद मिया अब्दुल मिया, साबीर मिया सईद मिया या सात जणांवर गुन्हा दाखल झाला अाहे. तर माेहम्मद शफी माेहम्मद सईद जहाॅगीरदार यांच्या फिर्यादीवरून इकबाल जीअाउद्दीन पिरजादे, इकबाल इकबालाेद्दीन पिरजादे, दारा सिद्दीक पिरजादे, इस्माईल पिरजादे, इस्लामाेद्दीन परिजादे यांच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 


दोन्ही कुटुंबीयांत जुने वाद 
पिरजादे जहागीरदार कुटुंबीयांमध्ये जुने वाद देखील आहेत. २०१२मध्ये गटारीचे बांधकाम सुरू असताना दोन्ही गटात हाणामारी झाली होती. या वेळी पाच-सहा जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर रविवारी पुन्हा नाला बांधकामावरून वाद पेटले. 


सिव्हिलमध्येही तणाव 
सुटीमुळे मेहरूण भागात नोकरदार, मजूर वर्ग घरीच होता. अशात दुपारी १.३० वाजता पिरजादेवाड्यात उसळलेल्या या हाणामारीमुळे तणाव निर्माण झाला. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर तेथेही तणाव दिसून आला. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात सर्व जखमींवर एकाच वेळी उपचार सुरू होते. या ठिकाणी दाखील हाणामारी होण्याची शक्यता हाेती. 


काय आहे नेमके प्रकरण 
मेहरूणगाव दरवाजा परिसरात मोठा नाला वाहतो. पावसाळ्यात नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरते. त्यामुळे नाल्याचे खोलीकरणासह कल्वर्ट, पूल बनवण्याची गरज आहे. या पुलाच्या कामासाठी शासनाकडून कोटी तर मनपाकडून कोटी निधी मिळाला आहे. नाला मेहरूण सर्व्हे क्रमांक मध्ये आहे. नाल्यास लागून मीटरचा रस्ता, खासगी प्लॉट आहेत. शकिल यांच्या मते पिरजादे हे पदाचा गैरवापर करून काही लोकांचे अतिक्रमण वाचवण्यासाठी नाल्याचे बांधकाम खासगी प्लॉटमध्ये सरकवत आहेत. पिरजादे यांच्या मते हे काम सरकारी असून सर्व प्रकारच्या पूर्तता पूर्ण करून नियमात सुरू आहे. 
जखमी नगरसेवक पिरजादे. 

बातम्या आणखी आहेत...