आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; लेवा समाजाचा क्रांतिकारी विचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुले, शाहू, आंबेडकर यांनी समाजात जेव्हा नवीन विचार मांडला, तेव्हापासून त्यांचे समर्थन करणारा एक वर्ग होता आणि त्यांच्या परिवर्तनाच्या विचाराला विरोध करणारा दुसरा वर्ग होता. समाजातल्या या दोन विचारधारांना तेव्हा ढोबळमानाने पुरोगामी आणि प्रतिगामी असे म्हटले जात होते. सुधारणावादी विचारांच्या बरोबर राहणारे पुरोगामी आणि त्यांचे पाय ओढणारे प्रतिगामी म्हणून ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्राच्या इतिहासात हे दोन विचार सातत्याने वाहताना दिसतात. काळ बदलला, समाज साक्षर झाला, शिक्षणाचे प्रमाण वाढले, जीवनमानावर तंत्रज्ञान अधिराज्य गाजवू लागले. तरीही परिवर्तनास नकार देणारा विचार अजूनही सर्वत्र वेगळ्या रूपात का होईना वाहताना दिसत आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक बहुमताने मंजूर झाले असले तरी ते होण्यासाठी २० वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागला. या विधेयकाला विरोध करणारा वर्ग अजूनही अधूनमधून विरोध वेगळ्या रूपात प्रकट करताे.  


पुरोगामी महाराष्ट्रातील हे वास्तव चित्र असले तरी याच महाराष्ट्रात जो लेवा पाटीदार समाज आहे, त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच पुरोगामी विचारांची रुजवात केली आणि समाजाभिमुख ठराव करण्याचा क्रांतिकारक निर्णयही घेतला. तो आजही कायम आहे. किंबहुना त्यात आणखी सुधारणा केल्या आहेत, हे विशेष. याच लेवा समाजाचे यावल तालुक्यातील पाडळसे येथे भोरगाव लेवा पंचायतीच्या वतीने राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला देश-विदेशातून समाजबांधवांनी उपस्थिती दिली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात समाजाचे ३३ वर्षांनंतर प्रथमच महाअधिवेशन झाले. त्यामुळे समाजाच्या आणि बिगर लेवा समाजवासीयांच्या दृष्टीने या अधिवेशनाची उत्सुकता होती. बिगर लेवा समाजातील लोकांसाठी उत्सुकता असण्याचे कारण म्हणजे, लेवा समाजातील महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर समाजातील विविध पक्षांचे आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार, विविध पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी हे खरंच एकत्रित येतील काय? पण पक्ष, मतभेद विसरून हे सर्वच नेते एका व्यासपीठावर आले. तेथेही त्यांनी आपल्या पुरोगामी विचारांवर शिक्कामोर्तब केले. लेवा समाजाने स्वातंत्र्यपूर्व काळात जो विचार मांडला होता आणि तशी नोंद कुटुंबनायकाच्या परवानगीने समाजाच्या घटनेत करून घेतली आणि ती म्हणजे समाजातील कोणत्याही तरुण-तरुणींनी आपल्याच समाजातील पोटजातीतील मुला-मुलींशी विवाह केला तर त्यांचे स्वागतच आहे. समजा आंतरजातीय विवाह केला तरी त्याबद्दल कोणतीही कटुता समाजाने मनात ठेवू नये. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आपल्यासारखेच वागवण्याची शिकवण कुटुंबनायकाने समाजाला दिली आहे. लेवा समाजाचा हा क्रांतिकारक विचारच समाजाला फार मोठ्या उंचीवर घेऊन गेला. कोणत्याही समाजातील मुला-मुलींनी पसंतीच्या जोडीदारासोबत विवाह केला तर त्यांना पालक, समाजाने रोखू नये, तसे करण्याचा त्यांना अधिकार आहे, असे कायदा सांगतो. म्हणून स्वत:ला पुढारलेल्या समजणाऱ्या इतर समाजात असे आंतरजातीय विवाह आता अपवादाने व्हायला लागले आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असो की अल्पसंख्येने असणाऱ्या कोणत्याही समाजात अजूनही समाजाबाहेर विवाह करणे तेवढे स्वागतार्ह समजले जात नाहीत. अपरिहार्यता म्हणून स्वीकार केला जातो. म्हणूनच महाराष्ट्रात पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून अनेक समाज धुरंधर वावरत असले तरी त्यांचा खरा चेहरा हा वेगळाच असतो हे अनेकांना माहीत आहे. पण आपले जे आहे ते आजही कायम आहे हे ठणकावून सांगण्याचे काम लेवा पाटीदार समाजाने दोन दिवसांपूर्वी अधिवेशनातून पुन्हा एकदा केले. जुन्या रूढी, परंपरा मोडीत काढतानाच नवीन गोष्टींनाही फाटा देण्याचे ठराव या समाजाने केले आहेत. विवाह समारंभ म्हणजे मानापमान व रुसवे-फुगव्यांचा संस्कार बनला आहे. पण लेवा समाजाने जे ठराव केले ते पुरोगामित्वाचा बुरखा पांघरून बसलेल्यांच्या डोळ्यात अंजन घालणारेच आहेत. समाजातील लालगंध, साखरपुडा बंद करा, मान-सन्मानासाठी साड्या वाटपाची प्रथा बंद करा, लग्नात डीजे, बँड नकोत आणि मुला-मुलींचे नाचणेही नको, मानापमानाचे भोजन नको, द्यायची असेल तर साधी पंगत हवी, मुलींनी तोंडाला स्कार्फ बांधू नये, पोटजाती विसरून एकत्रित यावे, समाजात जे बेरोजगार असतील त्यांना मदत करून व्यवसायाभिमुख बनवावे. ‘आपला आपण करूया उद्धार’ हे बोधवाक्य डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्र पुरोगामी आहे काय? याचे उत्तर समर्पकपणे कुणालाही देणे अवघड आहे. पण महाराष्ट्रातला लेवा समाज हा खरा पुरोगामी आहे हे मात्र ठामपणे सांगता येईल. तसा आदर्श या समाजाने घालून दिला आहे.


 - त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...