आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक; सोशल मीडियाचे वाढते धोके

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वस्तातल्या इंटरनेट सुविधेमुळे युवक, युवतींमध्ये समाज माध्यमांच्या वापराची क्रेझ वाढली आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअॅप जणू तरुणाईचा श्वासच झाला आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप, मेसेजेस, टि्वटर यांसारख्या मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी होत असेल तर तो स्वागतार्हच आहे. पण सर्वच जण या मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करतात असे नाही. समाजातील विकृत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या माध्यमांचा वापर युवती आणि महिलांची फसवणूक करण्याकरिताच अधिक वापरत असल्याचे मोठ्या प्रमाणात उघड होत आहे. फेसबुकवर अल्पवयीन मुलींशी ओळख करून तिचे अश्लील फोटो तयार करून व्हायरल करण्याची धमकी देत तिला भेटायला बोलावले. ती मुलगी भेटायला आल्यानंतर  पहिल्याच भेटीत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात घडली. मुलीशी ओळख करणाऱ्या मुलाने थेट मुलीच्या वडिलांचा नंबर घेऊन त्यावरही फोटो पाठवले होते. पण वेळीच लक्षात अाल्याने त्या मुलीने ते तत्काळ उडवले आणि घटना वडिलांना सांगितल्यानंतर प्रकरण थेट पोलिसांत गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी संजय विष्णू गुट्टे (वय २३) यास मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातून अटक केली आहे. सदर मुलगा हा बीसीएस झालेला असून पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरी करतो. मोबाइल वापरात तरबेज असल्यामुळे त्याने अनेक मुलींना फसवल्याचे अाता समोर येत आहे. जळगावातील ही तरुणी अल्पवयीन असली तरी तिने धाडस दाखवून  वडिलांना झाला प्रकार सांगितल्यानंतर गुन्हेगार जेरबंद झाला. पण अशा अनेक तरुणी आहेत ज्या झाल्या प्रकाराची वाच्यता करत नाहीत आणि स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करून घेतात.


 जळगावसारखीच घटना काही महिन्यांपूर्वी नागपुरात घडली. फेसबुकवर मैत्री करून आपण मोठा व्यापारी व पैसेवाला असल्याचे भासवून एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून लग्नाला नकार दिला. तरुणीने जेव्हा गावात त्याचा शोध घेतला तेव्हा तो मोठा व्यापारी-व्यावसायिक नाही, तर एक सलून दुकानदार होता. याबाबत तरुणीने पोलिसात तक्रार केल्यानंतर सलून चालक आशिष गोपाल दहेलकर असे फसवणूक करणाऱ्या अाराेपीस पाेलिसांनी जेरबंद केले हाेते. मुंबई पालघर येथेही अशीच फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीला अमिन मन्सुरी या तरुणाने २० लाखांत फसवून तिच्यावर अत्याचारही केला होता. शेवटी त्या तरुणीने बदनामीच्या भीतीपोटी आत्महत्या केली. समाज माध्यमाच्या अतिवापरामुळे गुन्हेगारही तेवढ्याच पटीत वाढत चालले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांपुढेदेखील माध्यमातील गुन्हेगारीला रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. बदनामी, अश्लील व आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या दोषींना तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. त्याआधी भारतीय दंड संहिता कायदा कलम २९२ प्रमाणे त्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करावा लागेल आणि तो तपासात सिद्ध करता आला पाहिजे. कायदा असला तरी कायद्याच्या रखवालदारांपेक्षा गुन्हेगार अधिक पुढे गेले आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना रोखण्यासाठी समाज माध्यम वापरणाऱ्या तरुणी, महिला आणि पुरुषांनीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे. कधी, कधी महिलांकडूनही पुरुषांची फसवणूक होऊ शकते. तथापि, सर्वाधिक प्रकार हे तरुणींना फसवल्याचे आणि बलात्काराचे उघड झाले आहेत. फेसबुकवर अनेक खाते बनावट नावाने असतात. त्यामुळे विश्वासार्ह आणि आधीच ओळख, परिचय असलेल्या व्यक्तींच्याच खात्यावर माहिती शेअर केली पाहिजे. अनोळखी व्यक्तींकडून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. अनोळखी व्यक्तींशी झालेल्या मैत्रीतूनच फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. बलात्कार आणि अत्याचारासोबतच आर्थिक फसवणूकही होऊ शकते. कार्यालयीन कामाचे ठिकाण असो की आॅफिस कामाचे निमित्त काढून फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून महिलांना छळण्याचे प्रकारही होत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे चॅटिंगचा स्क्रीन शॉट काढून ठेवत पोलिसांत तक्रार केल्यास संबंधिताविरुद्ध पुराव्यासह गुन्हा दाखल होऊ शकतो. समाज माध्यम संपर्क, समन्वय आणि संवादासाठी प्रभावी माध्यम असले तरी त्याचा गैरवापर करणारे गुन्हेगारही वाढले आहेत. तरुणींना अधिक जाळ्यात ओढले जात आहे. समाज माध्यमातील गुन्हेगार शोधण्यासाठी पोलिस त्यांचे काम करतीलच, पण समाज घटकानेही आपली जबाबदारी ओळखून या माध्यमाचा वापर आपल्या कामासाठी केला तर तो अधिक पुढे नेणारा राहील. समाज माध्यम जेवढे प्रभावी तेवढेच ते धोक्याचेही दिसत आहे. त्यामुळे धोके ओळखून समाज माध्यमाचा वापर करणे एवढेच आपल्या हातात आहे.  

 
 - त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव

बातम्या आणखी आहेत...