आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांच्या वादातून पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; पत्नीसह पाच जणांवर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- पैसे न दिल्याचा राग आल्याने पत्नीने माहेरच्यांच्या मदतीने पतीला जाळण्याचा प्रयत्न केला. यात ताे  ४५ टक्के भाजला. चाळीसगाव शहरातील गजाननवाडी भागात रविवारी (दि.११) रात्री ११.३० वाजता ही घटना घडली. या प्रकरणी मंगळवारी (दि.१३) पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात अाला. 


उमेश रतन चौधरी (वय ३६) असे भाजलेल्या तरुणाचे नाव आहे. मालवाहतुकीच्या वाहनावर चालक असलेला उमेश हा पत्नी निता, मुलगा समर्थ यांच्यासह गजाननवाडी भागात राहतो. रविवारी (दि.११) रात्री ११.३० वाजता उमेश हा आपले काम आटोपून घराकडे जात असताना रस्त्यात त्याला पत्नी निताचा फोन आला. संभाषणात पत्नीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली असता उमेश याने तिला पैसे नसल्याचे सांगितले. याचा तिला राग अाला. उमेश घरी आल्यानंतर त्याची सासू कमल दगडू चौधरी, शालक गणेश चौधरी, शालकाची पत्नी उषा व मुलगा भूषण गणेश चौधरी याने त्याला मारहाण करून धरून ठेवले. त्यानंतर नीता हिने त्याच्या अंगावर राॅकेल ओतून पेटवून दिले. नंतर त्याच्या सासूने उमेशच्या अंगावर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र उमेशने त्याच अवस्थेत पळ काढला.

 

भाजलेल्या अवस्थेत काढला पळ
पत्नी नीता, सासू, शालक त्याची पत्नी व मुलगा हे उमेशला भाजलेल्या अवस्थेत सोडून पळून गेले. अशा अवस्थेत उमेश वडिलांच्या घरी गेला. त्यांनी त्याला रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचारानंतर धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात पत्नी नीता चौधरी, सासू कमल दगडू चौधरी, शालक गणेश, शालकाची पत्नी उषा व मुलगा भूषण गणेश चौधरी या पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज रबडे करीत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...