आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''दोन अनोळख्या आंतरजातीय, आंतरधर्मिय व्यक्ती पहिल्यांदा भेटतात...त्यांचे विचार जुळातात.. त्यांच्यात मैत्री होते आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी होतं हे त्यांनाही कळत नाही...एकमेकांत गुंततात.. भविष्याच्या आणाभाका खाऊन प्रेमाचे रेशीम धागे सप्तपदीने घट्ट करण्याचा निर्णय घेतात...परंतु शेवटी त्यांच्या घरचे या प्रेमाला नाकारतात... कारण काय तर 'ती काय आपल्या जातीची आहे?' मात्र ते दोघे डगमगत नाहीत ..विशेष म्हणजे माघार घेत नाहीत.. दोघं स्वतःला सावरतात... स्वत:चं विश्व निर्माण करण्यासाठी धडपडतात. कुटुंबापासून लांब जाऊन 'दुरून डोंगर' सजवतात अन् समाजसेवेचं व्रत स्विकारतात..!'' मित्रांनो हे काही चित्रपटाचं कथानक नाही तर हे वास्तव आहे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील सम्यक फाऊंडेशचे डॉ.संग्राम व डॉ.नुपूर पाटील यांचे...
डॉ.संग्राम आणि डॉ.नुपूर हे पुण्यात मेडिकल कॉलेजला पहिल्यांदा भेटले. नव्वदच्या दशकातला तो काळ होता. पण त्या काळी प्रेम होणे म्हणजे एक मोठा गुन्हा समजला जात होता. आणि नेमका हाच गुन्हा डॉ.संग्राम यांच्याकडून झाला. त्यात डॉ.नुपूरही तितक्याच सहभागी होत्या. डॉ.संग्राम यांना त्यांच्या मनातील भावना डॉ.नुपूरपर्यंत पोहोचविण्यासाठी तब्बल दोन 'व्हॅलेंटाईन'जाऊ द्यावे लागले. त्यात डॉ.नुपूर यांचा होकार येईपर्यत तिसरा व्हॅलेंटाईन आला.
आंतरजातीय विशेष म्हणजे आंतरधर्मीय प्रेमविवाहाला डॉ.संग्राम यांच्या घरून विरोधाचं वादळ उठण्याची चिन्हे आधीच दिसू लागताच हे वादळ त्यांची प्रेमाची बोट उलटवून टाकण्याच्या आत ती किनार्यावर लावली पाहिजे,असा सल्ला जवळच्या मित्रांनी देताच काही दिवसातच दोघांनी बिनखर्चात,कर्मकांड विरहित,तीन साक्षीदारांच्या साक्षीनं सरकारी लग्न उरकून घेतलं. बहिणीचं लग्न,घरच्यांचा रुद्रावतार वगैरे सगळ्या जबाबदार्याचं भान ठेवून लग्न झाल्याचं त्यांनी तब्बल तीन वर्षांनंतर जाहीर केलं.
अपेक्षेप्रमाणे घरच्या कुटुंबियांसह समाजातून वाईट प्रतिक्रिया उमटू लागल्या.त्यामुळे तब्बल चार वर्षे त्यांना घराबाहेर राहावं लागलं. यादरम्यान घरच्या मंडळींच्या भेटी तर दूरच साधा एका शब्दाचाही संवाद झाला नाही.
परदेशात जाताना त्यांच्या घरची मंडळी भावनिक झाले खरे परंतु त्यांची मानसिकता बदलली नव्हती.भावनेच्या भरात ते पून्हा मायभूमीकडे परतले. परतल्यानंतर मात्र काही क्षणातच त्यांना कळले की त्यांचा भ्रमनिरासच झाला आहे.परंतु त्यातूनही त्यांनी एकमेकांना सावरलं.'आंतरजातीय प्रेमविवाह करणारे बहुतांश जोडपे खेड्यांपासून, समाजापासून व कुटुंबापासून लांब जाऊन 'दुरून डोंगर' का सजवतात. याची कल्पना त्यावेळी आली असावी आणि तेच त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलंही..!
आज सगळं काही सेटल झालं अर्थात त्यांनी त्यांच्यापुरत ते करून घेतलय. आज दोघांनी पस्तीशी ओलांडलीय. मागे वळून पाहताना त्यांच्या वाटेला आलेलं दु:ख... संघर्ष पाहून त्यांनी जे सोसलं आहे ते इतरांच्या वाटेला येऊ नये म्हणून दोघं रात्रदिवस झटत आहेत.
डॉ.संग्राम आणि डॉ. नुपूर यांनी बाबा आमटे सेवा यांच्या आनंदवन व डॉ. अभय बंग यांच्या सर्चग्राम येथून प्रेरणा घेऊन एरंडोल येथे गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी 'बाबा आमटे ग्रामीण रुग्णालय' सुरु केलं आहे. अल्प दरात सेवाभावी तत्त्वाने आरोग्याच्या अत्याधुनिक सेवा त्यांनी पंचक्रोशीत उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पाच वर्षे लंडन येथे राहून ऐशोआरामाचा त्याग करून संवेदनशील मनाने एरंडोलपर्यंतचा प्रवास परत मायभूमीकडे या पुस्तकात मांडला आहे .
प्रेम करणार्या प्रेमींना त्यांनी सल्ला दिला आहे की, 'प्रेमात गुंतण्यापूर्वी व्यक्तीने 'जात' हा शब्द आधी मनातून कायमची काढून टाकायला पाहिजे, कारण जात, खानदान, परंपरा, अंधश्रद्धा व कर्मकांड हे पुढे जाऊन सुखी जीवनातही मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात' असा सल्लाही या दाम्पत्याने दिला आहे.
प्रेमविवाह, तसेच आंतरजातीय विवाह मोडायला आपलेच कुटुंबीय अनेकदा कारणीभूत ठरतात. कुटुंबियांना तेवढं सांभाळण्याची कसरत जमली म्हणजे आपल्या समाजात, नातेवाईकामध्ये किंवा खेडोपाडी राहूनही आंतरजातीय प्रेमविवाहातून यशस्वी कौटुंबिक जीवन जगणे काहीच अवघड नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... डॉ. संग्राम आणि डॉ. नूपूर यांचे फॅमिली फोटो..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.