आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुले मार्केटमध्ये खरेदीला जाताना सांभाळून, जिन्याची भिंत कोसळली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहराच्या हृदयस्थानी असलेल्या महात्मा फुले मार्केटमधील बन्सीलाल रसवंतीच्या शेजारील जिन्याची काँक्रिट भिंत साेमवारी रात्री अचानक काेसळली. सुदैवाने ग्राहक अथवा कामगार नसल्याने जीवितहानी टळली. गाळे करार मुद्यावरुन अाधीच महापालिका आणि गाळेधारक यांच्यातील संबंध ताणले असताना ही घटना घडली आहे. सुमारे ६० वर्ष जुन्या इमारतीच्या 'स्ट्रक्चरल अाॅडीट'बाबत प्रशासनासाेबत गाळेधारकदेखील अनभिज्ञ अाहे. जुनाट, जीर्ण झालेल्या या इमारतीबाबत भविष्यातील धाेका कसा टाळणार, असाच प्रश्न उपस्थित हाेत अाहे. त्यामुळे फुले मार्केटमध्ये खरेदीला जाताना जरा सांभाळून. 


महापालिकेच्या मालकीच्या २८ व्यापारी संकुलांमध्ये सगळ्यात अग्रस्थानी असलेल्या महात्मा फुले मार्केटची अवस्था दिवसेंदिवस खिळखिळी हाेत चालल्याचे चित्र पाहायला मिळत अाहे. तळमजला, मेझेनाइन व पहिला मजला अशी रचना असलेल्या फुले मार्केटच्या अायुष्याबाबत अाता साशंकता निर्माण झाली अाहे. साेमवारी रात्रीच्या वेळी बन्सीलाल रसवंतीच्या शेजारील जिन्यातून पहिल्या मजल्यावर चढताना मेझेनाइनजवळील जिन्याची काॅक्रिटची संरक्षण भिंत अचानक काेसळल्याची घटना घडली. रात्रीची वेळ असल्याने ग्राहक व कामगारांची गर्दी नव्हती. त्यामुळे माेठी दुर्घटना टळली अाहे. सात फूट लांब व पाच फूट उंच अशी भिंत काेसळल्याने भिंतीमधील अासाऱ्यादेखील वाकल्या असून जिन्याच्या बाजूने बाहेर अाल्या अाहेत. 


महिलांना वाढला धाेका
मार्केटमध्ये दररोज हजाराेंच्या संख्येने महिलांचा वावर असताे. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत महिला खरेदीसाठी मार्केट परिसरात फिरत असतात. फुले मार्केटच्या वरच्या मजल्यांवर हाेलसेल विक्रेते तसेच साड्या व कपड्यांचे दुकाने असल्याने महिला लहान मुलांना घेऊन जिन्याने चढ-उतर करत असतात. त्यामुळे भविष्यात पुन्हा अशीच घटना घडली तर धाेका निर्माण हाेण्याची शक्यता वर्तवली जात अाहे. 


जनरेटरमुळे हादरे
फुले मार्केटमध्ये रसवंतीची मशीन तसेच लाेडशेडींगमध्ये जनरेटरचा वापर केला जाताे. प्रत्येक दुकानदाराने अापली व्यवस्था करून घेत दुकानांसाठी गच्चीवर अथवा मिळेल त्या जागेत जनरेटर ठेवले अाहे. यामुळे माेठ्या प्रमाणात प्रदूषण हाेतेच साेबत जनरेटर सुरू झाल्यानंतर बसणाऱ्या हादऱ्यांमुळेही बांधकामाला धाेका पाेहचण्याची भीती असते. सध्या उन्हाळा असून लाेडशेडींग हाेत असल्याने सर्वत्र जनरेटरचा अावाज अाणि धुराचे लाेट बाहेर पडताना पाहायला मिळतात. यामुळे इमारतीचे अायुष्यदेखील कमी हाेण्यास कारणीभूत ठरू शकते,असे बांधकाम तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 


प्रशासनाचे अापल्या मालमत्तेकडे दुर्लक्ष
महात्मा फुले मार्केट हे महापालिकेच्या मालकीचे असून काेट्यवधी रुपयांची मालमत्ता अाहे. सध्या गाळेधारकांची मुदत संपली असून पाच वर्ष उलटले अाहेत. गाळेधारक व पालिका यांच्यात वाद सुरू अाहे. पालिकेने गाळ्यांचा लिलावाची तयारी सुरू केली अाहे. दरम्यान पालिका प्रशासन अापल्याच मालमत्तांच्या बाबतीत उदासीन असल्याचे स्पष्ट दिसत अाहे. एकीकडे उत्पन्न वाढीसाठी भर दिला जात असताना अापल्या मालकीच्या मालमत्तांकडे दुर्लक्ष करणे कितपत याेग्य अाहे? असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. 


रसवंतीच्या दुकानाला सर्वाधिक धाेका 
फुले मार्केटच्या तळमजल्यावर बन्सीलाल रसवंती असून दुकानाच्या भागातून जिन्याचा खालचा व वरचा स्लॅब गेलेला अाहे. जिन्यातील काॅक्रिट भिंत काेसळल्यामुळे अाता दुकानाच्या स्लॅबला माेठी भेग पडली अाहे. दुकान व जिन्याचा अाधार असलेली भिंतच काेसळल्याने दुकानाचा काही भाग केव्हाही काेसळू शकताे, अशी भीती दुकानदाराने व्यक्त केली. 


दुपारपर्यंत मलबा पडून 
रात्रीची घटना असल्यानंतरही महापालिका प्रशासनाचा काेणताही अधिकारी मार्केटकडे फिरकला नाही. तसेच मार्केटमधील गाळेधारकांनी देखील घडलेल्या घटनेबाबत पालिकेत कळवले नसल्याची बाब उघडकीस अाली अाहे. त्यामुळे रात्री भिंत काेसळल्यानंतरही दुपारी ४ वाजेपर्यंत काँक्रिट मलबा जिन्यातच पडून हाेता. अखेर वरच्या मजल्यावरील दुकानदारांच्या ग्राहकांना त्याचा त्रास हाेत असल्याने त्यांनीच जिन्यातील घाण दूर केली. 


तक्रारीनंतरही पालिकेने केले दुर्लक्ष 
पहिला माळा फुले मार्केट व्यापारी असाेसिएशनचे अध्यक्ष राजारामजी कटारिया यांनी २३ नाेव्हेंबर २०१७ राेजी अायुक्तांना निवेदन दिले हाेते. त्यात तळमजल्यावरील दुकान नंबर ७० बन्सीलाल रसवंती शेजारील वर जाणाऱ्या जिन्याची पायऱ्यांची व पडदीची जीर्ण अवस्था झाली अाहे. काेणत्याही क्षणी पडदी पडून जीवितहानी हाेण्याची शक्यता वर्तवली हाेेती. त्यानंतरही मनपाने काहीही उपाययाेजना केले नाही. 


मार्केटच्या इमारतीचे अायुष्य तपासण्याची तसदी नाही 
महात्मा फुले मार्केटच्या तळमजल्याचे बांधकाम सन १९५८ मध्ये पूर्ण झाले. ते लोडबेअरिंगवर करण्यात आले होते. सन १९६० मध्ये गाळेधारकांच्या ताब्यात देण्यात अाले हाेते. त्यानंतर २८ वर्षांनी म्हणजे १९८८ मध्ये फुले मार्केटच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यात अाले हाेते. पहिल्या मजल्याचे बांधकाम करताना तळमजल्यावर भार येऊ नये म्हणून स्वतंत्र काॅलम टाकून स्वतंत्र स्लॅब टाकण्यात अाला अाहे. त्यामुळे दाेन मजल्यांमध्ये मेझेनाइन फ्लाेअर तयार झाला अाहे. या ठिकाणी देखील प्रत्येक जिन्यात गाळे तयार करून त्यांचीही विक्री केली अाहे. वास्तविक या बांधकामाला नाशिकच्या नगररचना विभागाने परवानगी दिली नसल्याचे गाळेधारकांचे म्हणणे अाहे. तसेच इमारतीचे अायुष्य तपासण्याची तसदी काेणीच घेतलेली नाही. स्ट्रक्चरल अाॅडीटबाबत गाळेधारक, मनपा अधिकारी माहिती देऊ शकत नसल्याची स्थिती अाहे.

बातम्या आणखी आहेत...