आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणगाड्यांच्या अचूक मारक क्षमतेचे दर्शन; केके रेंजेसवर सर्वांनी अनुभवला युद्धाचा थरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- रणगाड्यांच्या वाटचालीवरच युद्धाचे यश अवलंबून असते, असे जर्मन सेनानी जनरल गुडेरियन याने दुसऱ्या जागतिक युद्धाच्यावेळी म्हटले होते. त्याचा प्रभावी प्रत्यय सोमवारी खारे कर्जुने येथील युद्ध सराव मैदानावर (के. के. रेंजेस) उपस्थितांना आला. निमित्त होते. नगरच्या आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूल (एसीसीएस) व मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (एमआआरसी) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या वार्षिक युद्ध सराव प्रात्यक्षिकांचे. या दोन्ही दलांच्या युद्धातील मारक क्षमतेचा अनुभव उपस्थितांना आला. या प्रात्यक्षिकांत गेल्या वर्षापासून कमीत कमी दारूगोळा वापरण्याचे धोरण अवलंबले जात आहे. त्यामुळे प्रात्यक्षिकांच्या शेवटच्या भागात दारूगोळ्याचा वापर पूर्ण बंद केल्याचेही स्पष्ट झाले. 


अर्जुन, टी ९० एस (भिष्म), टी ७२ (अजेय) व टी ५५ या रणगाड्यांसह बीएमपी २ या हलक्या लढाऊ वाहनांसह दोन हेलिकॉप्टनी या युद्ध सरावात भाग घेतला. मिलान व काँकर्स, तसेच रणगाड्यावरून डागले जाणारे इन्व्हा हे क्षेपणास्रही या प्रत्याक्षिकांच्या वेळी डागण्यात आले. त्यांनीही आपल्या लक्षांचा अचूक वेध घेतला. 


जबरदस्त युद्ध कौशल्य, परिणामकारक वार करणारी अत्याधुनिक शस्त्रसामग्री व ही सामग्री अचूकपणे वापरण्याचे कौशल्य असलेले सैनिक यांचा अनुभव केके रेंजेसवर उपस्थितांना आला. एसीसीएस व एमआयआरसीतर्फे दरवर्षी अशी प्रात्यक्षिके सादर केली जातात. युद्धात रणगाड्यांचे कोणते स्थान असते? सैन्याला रणगाड्यांमुळे कोणता लाभ होतो, याचे प्रत्यक्ष दर्शन या प्रात्यक्षिकांतून घडवण्यात आले. दोन हेलिकॉप्टर व पायदळ मिळून शत्रूवर कसा विजय मिळवता येतो, हे ही या प्रात्यक्षिकांतून उपस्थितांना प्रत्यक्ष बघायला मिळाले. 


सकाळी साडेनऊच्या सुमारास या प्रात्यक्षिकांना प्रारंभ झाला. केके रेंजेसमधील प्रेक्षागृहासमोर पाचशे मीटरपासून ते साडेपाच किलोमीटरपर्यंत (फक्त क्षेपणास्त्रासाठी) अनेक लक्ष्ये ठेवण्यात आली होती. 


सुरुवातीस अर्जुन, टी-९० (भिष्म), टी- ७२ (अजय), हे रणगाडे व बीएमपी २ (आयसीव्ही२) व सीएमटी (कॅरिअर मोटर ट्रॅक) या हलक्या लढाऊ वाहनाची (इन्फन्ट्री कॉम्बॅट व्हेईकल) उपस्थितांना माहिती देण्यात आली. त्यानंतर जमिनीवरील लॉंचरमधून मिलान हे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र अचूकपणे लक्ष्यावर डागण्यात आले. आग ओकणाऱ्या रणगाड्यांच्या तोफांतून कानाचे पडदे भेदत जाणारे गोळे लक्ष्यांवर अचूकपणे आदळताना पाहण्याचा अनुभवच वेगळा होता. प्रत्येकवेळी लक्ष्यभेद झाल्यावर टाळ्यांच्या गजरात रणगाड्यातील क्रूचे कौतूक करण्यात आले. 


त्यानंतर प्रात्यक्षिकांच्या दुसऱ्या भागात म्हणजे, प्रत्यक्ष 'युद्धा'स सुरवात झाली. दूरवरून उजवीकडून चमकदार धूर व धुळीचा पडदा भेटून रणगाड्यांचा ताफा व हेलिकॉप्टर यांनी संयुक्तपणे आक्रमण केले. काही वेळा हालचाली करत काही या ताफ्याने 'शत्रू'वर जोरदार हल्ला चढवला. शत्रूवर कब्जा करणे, हे त्यांचे लक्ष्य होते. बाँब गोळ्यांचा (आधीच लावलेले रिमोटने फोडून) वर्षाव करीत व धुराचे प्रचंड लोट निर्माण करीत त्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केले. या वेळी एसीसीएसचे कमांडंट मेजर जनरल नीरज कपूर, एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर व्ही. व्ही. सुब्रमण्यम यांच्यासह लष्करी अधिकारी, त्यांचे कुटुंबीय, तसेच मित्र देशांतील लष्करी अधिकारीही उपस्थित होते. 


'सुखोई'अनुपस्थित 
एसीसीएस व एमआयआरसीतर्फे दरवर्षी अशी प्रात्यक्षिके सादर केली जातात. या वर्षी त्यांतील प्रत्यक्ष गोळीबाराच्या प्रात्यक्षिकांत मोठी घट झाली होती. प्रत्यक्ष युद्धाच्या सरावाच्या वेळीही फक्त टी ९० रणगाड्यांचा सहभाग होता. सुखोई विमानांचाही सोमवारच्या सरावात सहभाग नव्हता. फक्त दोन हेलिकॉप्टरचा नाममात्र सहभाग होता. 

 

पुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्...