आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी घरामध्येच दिला ठिय्या; मनपाचे अतिक्रमण पथक माघारी; गणेशनगरात तणाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कारागृहामागील गणेशनगरात पालिकेच्या अारक्षित जागेवरील अतिक्रमणधारक व पालिका प्रशासनात शुक्रवारी जाेरदार संघर्ष रंगला. क्रीडांगणासाठी अारक्षित जागेवरील अनधिकृत बांधकाम काढण्यास स्थानिक नागरिकांनी प्रचंड विराेध केल्याने पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले. पक्क्या अतिक्रमणावर हाताेडा चालणार असल्याने परिसरातील महिलांनी घरातच ठिय्या मांडल्याने पाेलिस बंदाेबस्त असतानाही पालिकेच्या पथकाचा नाईलाज झाला. झाेपडपट्टीधारकांनी दुपारी पालिकेवर माेर्चा काढत कारवाई अन्यायकारक असल्याचा अाराेप केला. तर उपायुक्तांनी कारवाईत अडथळा अाणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे अादेश दिले. 


गणेशनगरात महापालिकेने क्रीडांगणासाठी अारक्षण टाकले अाहे. या अारक्षित जागेच्या शेजारी पालिकेचे कर्मचारी मनाेज शर्मा यांचे घर अाहे. अारक्षित जागेत पूर्वी पार्टिशनचे घर हाेते. अाता त्या ठिकाणी पक्क्या घराचे बांधकाम केले जात अाहे. परंतु घराचे बांधकाम करताना संंबंधितांनी मनाेज शर्मा यांच्या खासगी जागेतून वहिवाट सुरू केली अाहे. त्यावरून १५ दिवसांपूर्वी दाेघा शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. भांडणात शर्मा यांच्या हाताला जखमादेखील झाल्या. दरम्यान, शर्मा यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली हाेती. त्यानंतर तत्कालीन उपायुक्त राजेश कानडे, अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान व अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली असता अारक्षित जागेवर अतिक्रमण असल्याचा मुद्दा पुढे अाला अाहे. पालिकेची जागा अनेक वर्षांपासून वापरली जात असून त्या ठिकाणी पक्की घरे बांधण्यात अाल्याने ते अतिक्रमण केव्हापासून अाहे. यासंदर्भात उपायुक्त कानडे यांनी अारक्षित जागेची संपूर्ण माहिती मागवली अाहे. त्यात नगररचना विभागाने चार अतिक्रमणधारकांना नाेटीस देखील बजावली हाेती. दरम्यान, परिसरात मनपाच्या अारक्षित जागेवर चार व्यतिरिक्त अाणखी घरे अाहे. अाज चार घरांचे अतिक्रमण निघल्यानंतर उद्या अापल्या देखील घराचे अतिक्रमण काढले जाईल या भितीपाेटी इतर नागरिक एकवटले हाेते. 


पाेलिस बंदाेबस्त कमी पडला 
उपायुक्तांच्या सूचनेनंतर जिल्हापेठ पाेलिसांचा बंदोबस्त मिळाला हाेता. परंतु पाेलिस पथकात केवळ एक महिला व दाेन पुरुष कर्मचारी हाेते. स्थानिक विराेधकांची संख्या पाहता पाेलिस बंदाेबस्त अत्यंत किरकाेळ हाेता. त्यात महिलांना घराबाहेर काढण्यासाठी केवळ एकच महिला पाेलिस कर्मचारी असल्याने कारवाई करणे अवघड झाले हाेते. 


गुन्हा दाखलचे अादेश 
पालिकेच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकाला विराेध करणाऱ्या नागरिकांविरुद्ध जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे अादेश देण्यात अाले. त्यामुळे दुपारी अतिक्रमण अधीक्षक एच.एम.खान हे जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले हाेते. 


महिला, पुरुषांनी काढला माेर्चा 
पालिकेचे पथक ठाण मांडून बसल्याने झाेपडपट्टीतील महिला व पुरुषांनी भाजपचे मंडल अध्यक्ष धीरज साेनवणे व रवी पाटील यांच्या नेतृत्वात पालिकेत माेर्चा अाणला. या वेळी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. शहरातील अनेक अाेपन स्पेसवर अनधिकृत झाेपडपट्टी अाहेत मग गणेशनगरातच कारवाई का? पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या जागेचा काहीही प्रश्न नसताना केवळ त्याला पाठबळ देण्याचा हा प्रयत्न असल्याचा अाराेप करण्यात अाला. नाेटीस बजावलेल्या चाैघांना अापली बाजू मांडण्याची संधी देखील दिली नसल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून रहिवास असल्याने कारवाई करण्यामागचा हेतू काय? असा सवालही उपस्थित करण्यात अाला. 


अाम्ही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करताे. पालिका अामच्या घरांवर हाताेडा मारणार असल्याचे कळताच कामे साेडून घराकडे परतलाे. अनेक वर्षांपासून अाम्ही राहत अाहाेत. मग अाताच कारवाई का हाेत अाहे? हा अामच्यावर अन्याय असून माेठ्यांचे अतिक्रमण दिसत नाही का? 
- कल्पना मिस्तरी, रहिवासी 


गेल्या ४० वर्षांपेक्षा अधिक काळापासून 'त्या' ठिकाणी राहत अाहे. किराणा दुकानात काम करून कुटुंबाला हातभार लावते. अामच्या मुलांचा जन्मदेखील याच ठिकाणी झाला अाहे. अाता वृद्धापकाळात अाम्ही जायचे कुठे? पालिकेने अामचे घर पाडू नये म्हणून भर उन्हात पालिकेत अालाे अाहाेत. 
- छबाबाई शिंदे, रहिवासी 


दुपारपर्यंत पथक थांबून 
पालिकेचे अतिक्रमण निर्मूलनाचे पथक शुक्रवारी सकाळी गणेशनगरात धडकले. त्याठिकाणी दाेन पक्के तर दाेन झाेपड्यांचे अतिक्रमण काढायचे असल्याने पथकाने रहिवाशांना घराबाहेर निघण्यास सांगितले. परंतु परिसरातील सर्वच अतिक्रमणधारकांनी कारवाईला विराेध केला. सुमारे १५ ते २० महिला अतिक्रमीत घरांमध्ये बसून राहिल्या. तसेच घरातील साहित्यदेखील बाहेर काढले नाही. त्यामुळे दुपारपर्यंत पथकाला काेणतीही कारवाई करता अाली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...