आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेस्थानकात तरुणास बेदम मारहाण करून लूट, मदतीसाठी याचना; दहशतीमुळे नागरिकांची माघार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भामट्यांनी शिवाजीनगरच्या बाजूला असलेल्या रेल्वेस्थानकाच्या दादऱ्यावर एका तरुणास मारहाण करून त्याच्या खिशातील पैसे व मोबाइल लांबवल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजता घडली. चार-पाच धटिंगण बेदम मारहाण करीत असताना तरुण रेल्वेस्थानकावरील नागरिकांकडे मदतीसाठी याचना करीत होता. परंतु या गुंडांच्या दहशतीमुळे एकाही नागरिकाची पुढे येऊन मदत करण्याची हिम्मत झाली नाही. अखेर या तरुणाने एकट्यानेच प्रतिकार करण्यास सुरुवात करताच एका गंुडाने तरुणाचे डोके लोखंडी कंपाउंडवर आदळले आणि त्याच्या खिशातील पैसे,मोबाइल काढून घेत गंुड पळून गेले. 


अमोल वामन गुजर (वय २४, रा.धानोरा, ता.चोपडा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. अमोल हा शनिवारी रात्री पत्नीस बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर साेडायला गेले होते. परत जात असताना रात्री ११.३० वाजता त्यांना दादऱ्यावर चार-पाच चोरट्यांनी अडवले. गुजर यांना काही कळण्याच्या आतच या गुंडांनी त्यांच्या खिशात हात घालून पैसे, मोबाइल काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विरोध करताच सर्व भामट्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत असतानाच एकाने गुजर यांचे डोके लोखंडी कंपाउंडवर आदळले. यात त्यांच्या कपाळावर गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले. गुजर जखमी झाल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती देखील कमी झाली. ही संधी साधून गुंडांनी त्यांच्या खिशातील सुमारे १ हजार रुपये व ३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल काढून घेत पोबारा केला. गुजर यांना मारहाण सुरु असताना त्या परिसरात अनेक नागरिक होते. मारहाण सुरु असताना गुजर यांनी नागरिकांकडे मदत मागितली; परंतु, गुंडांच्या दहशतीमुळे कुणीही समोर आले नाही. सुमारे ५-७ मिनिटांच्या या थरारानंतर गुंडांनी पैसे, मोबाइल काढून घेत गेंदालाल मिलच्या दिशेने पळ काढला. यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या गुजर यांनी एका रिक्षाचालकाच्या मदतीने शहर पोलिस ठाणे गाठून पोलिसांना आपबिती कथन केली. 


पोलिसांची उदासीनता 
जखमी अवस्थेत गुजर हे शहर पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी वैद्यकीय उपचाराचा मेमो तयार करून देत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले. जखम खोल असल्यामुळे त्यांच्या कपाळावर सात टाके घालण्यात आले. उपचारानंतर शनिवारी रात्रभर गुजर हे रुग्णालयात होते. रविवारी दुपारी त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर ते घरी गेले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात कच्ची नोंद करण्यात आली आहे. 


विक्रेते, भामट्यांकडून हद्दीचा गैरफायदा 
रेल्वेस्थानकाच्या बाहेर शहर पोलिस ठाणे व लोहमार्ग पोलिसांची हद्द आहे. हद्द ओळखण्यासाठी लोखंडी पाइप बसवले आहेत. शहर पोलिस ठाण्याचे पथक गस्तीसाठी आले की विक्रेते, भामटे रेल्वेच्या हद्दीत प्रवेश करतात. लोहमार्ग पोलिस आल्यानंतर शहराच्या हद्दीत येतात. अशाच प्रकारे रात्रभर चोर-पोलिसांचा खेळ सुरू असतो. दरम्यान, रात्री रेल्वेगाड्यांमधून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मात्र या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो. प्रवाशांमध्ये महिला, तरुणींची छेड काढणे, ये-जा करण्यासाठी रस्ताच शिल्लक न ठेवण्यासारख्या टवाळखोऱ्या नित्याच्याच झाल्या आहेत. टवाळखोरांच्या दहशतीमुळे परिसरातील रिक्षाचालक, हॉटेल मालकदेखील त्यांना काहीच बोलत नाहीत. 


रेल्वेस्थानकाबाहेरील दोन हातगाड्या जप्त 
शहरातील रेल्वेस्थानकाबाहेर बेशिस्तपणे उभ्या असलेल्या दोन हातगाड्या पोलिसांनी रविवारी रात्री जप्त केल्या. चहा विक्री करणाऱ्या या हातगाड्या आहेत. विक्रेते रात्रभर चहा विक्री करीत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. रविवारी रात्री पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे हे पथकासह रेल्वेस्थानक परिसरात गस्त करीत होते. या वेळी त्यांनी दोन हातगाड्या जप्त करण्याचे आदेश दिले. या हातगाड्या शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आल्या आहेत. 


सिगारेटचे झुरके घेणाऱ्यांमुळे गर्दी 
शहरात सर्व हॉटेल, पानटपऱ्या बंद झाल्यानंतर दारुच्या नशेत तर्रर तरुण रात्री १२ वाजेनंतर रेल्वेस्थानक परिसरात सिगारेटचे झुरके घेण्यासाठी येतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चहूबाजूंनी दुचाकी उभ्या करून मद्यपी सिगारेट ओढत असतात. यातून प्रवाशांसोबत अर्वाच्य भाषेत बोलणे, धक्काबुक्की करण्यासारखे प्रकार घडतात. 


रेल्वे स्थानकाची रात्रीची सुरक्षा 'रामभरोसे' 
रेल्वे स्थानक परिसरात रात्रभर गंजोटी, चोरटे, भामट्यांची दहशत असते. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना त्यांचा प्रचंड त्रास होतो. अशातच गेल्या पंधरवड्यात स्थानकावर तलवार हातात घेऊन दहशत माजवण्यात आली आहे. रेल्वे तसेच शहर पोलिसांचा धाक संपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रेल्वे स्थानकाची सुरक्षा 'रामभरोसे' झाली आहे. गुजर यांच्यासोबत घडलेल्या घटनेवेळी अनेक नागरिक, विक्रेते तेथे उपस्थित असूनही त्यांना कोणीही मदत केली नाही. त्यामुळे या परिसरात भामट्यांची दहशत कायम अाहे. 

बातम्या आणखी आहेत...