आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२ वी पास तरुणाने डेबिट कार्डचे क्लोन तयार करून १० महिन्यांत गंडवले २० लाखांना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मॅग्नेटिक स्ट्रीप कार्ड रिडर, राउटर, चार मोबाइल सिमकार्ड, संगणक, सिमकार्डच्या आकाराचे २० प्लास्टिकचे कार्ड अशा तांत्रिक वस्तूंचा आधार घेत ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या जळगावच्या निशांत कोल्हे याने १० महिन्यांच्या काळात बनावट कार्ड वापरून तब्बल २० लाख रुपयांना गंडवले आहे. काही मिनिटांसाठी हाती पडलेल्या दोन जणांचे   डेबिट कार्ड क्लोन करून निशांतने ऑनलाइन पेमेंट केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली अाहे. केवळ १२ वी पास असलेल्या कोल्हे याचे ऑनलाईन फसवणूकीचे एकेक उद्योग समजून घेण्यात सायबर क्राईम पोलिसांची दमछाक होत असून या प्रकरणी दररोज १२-१२ तास चौकशी आणि तपास सुरु आहे. तसेच त्याने किती लोकांचे बँक खाते किंवा क्रेडिट कार्ड वापरुन २० लाखांची फसवणूक केली त्याचाही तपशील अद्याप मिळालेला नाही. 


गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथील जहिरोद्दीन शेख यांच्या कंपनीतून ८४ हजार ५९९ रुपयांचा माल मागवून ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी निशांत कोल्हे व दिग्विजय पाटील (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. त्यानंतर आठ दिवसांपासून नागपूर, ठाणे येथील सायबर गुन्ह्यातील तज्ज्ञांनी जळगावात येऊन तपास सुरू केला आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत निशांतकडून संगणक, चार सिमकार्ड, मॅग्नेटिक स्ट्रीप कार्ड अशा तांत्रिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातून दररोज नवीन माहिती समोर येते आहे. निशांत हा एका आंतरराष्ट्रीय रॅकेटसाेबत काम करीत असल्याचे निष्कर्ष पोलिसांनी काढले आहेत. त्याचे शिव कॉलनीतील एका बँकेत अकाउंट आहे. या अकाउंटची माहिती पोलिसांनी काढली. यात २९ जुलै २०१७ ते १९ मे २०१८ दरम्यान तब्बल १९ लाख ९८ हजार ७९८ रुपये निशांतच्या खात्यात जमा झाले असून ते नंतर खर्च करण्यात अाले आहेत. १२ वी पास असलेल्या निशांतने १० महिन्यात २० लाख खर्च केल्याचे पाहून तपास करणारे पोलिस देखील चक्रावले आहेत. निशांतला शुक्रवारी आणखी एका गुन्ह्यात अटक करण्यात आली.याप्रकरणी गुरुवारी मध्यरात्री त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पाेलिसात पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 


एका मिनिटात डेबिट कार्ड क्लोन
निशांत याने शिव कॉलनीतच राहणाऱ्या दोन जणांना गंडवल्याचे शुक्रवारी समोर आले. त्याने दिग्विजय चित्रे व विनोद वेताळ नावाच्या दोन जणांचे डेबिट कार्ड क्लोन केले आहे. याचा वापरकर्त्यांना कुठलाही संशय अाला नाही हे विशेष. पोलिसांच्या तपासात ही बाब उघड झाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी संशयावरून चित्रे यांना गुरुवारी रात्री पोलिस ठाण्यात बोलावले. आपले डेबिट कार्ड क्लोन झाल्याचे एकूण चित्रे देखील भांबावले होते. चित्रे यांचीदेखील फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांची फिर्याद घेतली. त्यावरून कोल्हे याच्याविरुद्ध रामानंदनगर पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


२०० क्रेडिट कार्ड, ६० हजार ईएमआयचे डिटेल्स
कोल्हे याच्याकडे २०० जणांच्या क्रेडिट कार्डची तपशीलवार माहिती असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच एका फायनान्स कंपनीचे ६० हजार ईएमआय कार्डच्या ऑनलाइन सॉफ्ट कॉपी आहेत. या सर्व प्रकाराचा तपास करण्यात पोलिस यंत्रणा गुंतली आहे. 


कोल्हे तासन‌्तास प्रयोगशाळेत 
आठ दिवसांपासून कोल्हे याच्या फसवणुकीचा तपास जळगावात सुरू आहे. या तपासासाठी त्याला पोलिस मुख्यालयातील सायबर क्राइमच्या प्रयोगशाळेत तासन‌्तास बसवून ठेवले जाते आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाइन फसवणूक केल्याचे हे प्रकरण असल्यामुळे तज्ज्ञांना देखील सलग १२-१२ तास तपास करावा लागतो आहे. कोल्हे याने नेमक्या कोणकोणत्या डेबिट-क्रेडिट कार्डचे क्लोन तयार करुन किती लोकांना गंडवले याचाही पूर्ण तपशील अद्याप पोलिसांच्या हाती आलेला नाही. 


कार्डचे क्लोनिंग म्हणजे काय? 
डेबिट- क्रेडिट,किंवा सीम कार्डमधील डाटा (उदा.आपल्या कार्डच्या पाठिमागे असलेल्या लांबट मॅग्नेटिक टेपवरील गोपनीय माहिती, पीन) चोरून तयार केलेली प्रतिकृती. 


कार्ड वापरताना अशी घ्या काळजी 
कार्ड क्लोनिंग प्रकार हॉटेल्स,रेस्तराँ,पेट्रोल पंप, एटीएम मशीन,मॉल्समध्ये वापरल्या जाणाऱ्या मशीनमधून चोरला जाऊ शकतो. त्यामुळे कार्ड स्वाईप करण्यापूर्वी ते ई पॉस अथवा कार्ड स्वाईप मशीन नीट तपासून घ्या. एखाद्या एटीएममशीनचा की बोर्ड वर आलेला दिसत असेल किंवा कार्ड सरकवण्याच्या जागेच्या खाली अथवा वर काही खडबडीत भाग असेल तर काळजी घ्या. 


हॉटेल, मॉल, पेट्रोल पंप, गर्दीच्या ठिकाणी कार्ड स्वाईप करताना बारकाईने लक्ष द्या. कारण कार्ड स्वाईप करताना मशीनशेजारी चिकटवलेल्या 'स्कीमर'वर कार्ड स्वाईप केल्यास आपल्याला दिसून येत नाही. 


क्लोन कसा तयार करतात ?
आपल्या डेबिट-क्रेडिट कार्डमधून चोरलेला गोपनीय माहिती संगणकाव्दारे एखाद्या जुन्या डेबिट-क्रेडिट कार्डच्या किंवा हॉटेल रुमच्या किल्लीच्या मॅग्नेटिक टेपवरही साठवली जाते. या क्लोन कार्डचा वापर करुन किंवा क्रेडिट कार्डवरुन खरेदी केली जाऊ शकते. 


असा चोराता डेटा 
डेबिट,क्रेडिट कार्डचे क्लोन करण्यासाठी एक उपकरण वापरण्यात येते त्याला 'स्कीमर' म्हणतात. हे एटीएम मशीन,कार्ड स्वाईप मशीन,ई-पॉस वगैरेला चिकटवण्यात येते अथवा त्याच्याशेजारी लावण्यात येते. अत्यंत छोटा आकार असल्याने चटकन ते दिसून येत नाही.आपले डेबिट-क्रेडिट कार्ड स्वाईप करताच त्यामधील डेटा 'स्कीमर'च्या मेमरी कार्डमध्ये साठवला जातो. 


अश्लील खेळण्यांची विक्री 
कोल्हे याच्यासह त्याच्या फेसबुक फ्रेंड्समधील जॉन बर्मन, ज्योतिर्मय सहारिया, वायदुरा फुकान (रा.गुवाहाटी), सनी वाघेला (रा.हरियाणा), अभिषेक कुमार (रा.दिल्ली), पुष्पक राठोड (रा.यवतमाळ) आणि प्रणिल राठोड (रा.मुंबई) यांचा तपास पोलिस करीत आहेत. हे संशयित फेसबुकवर अश्लिल साइटचे अकाउंट तयार करून तरुणांना प्रलोभन देतात. यानंतर तरुणांना ऑनलाइन पद्धतीने अश्लील खेळणी विकत असतात. कोल्हे याच्या घरून अशाच प्रकारचे एक अश्लील खेळणे पोलिसांनी २१ मे रोजी जप्त केले आहे. या प्रकरणीदेखील स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...