आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळीच्या नुकसानीचे दुसऱ्या हप्त्याचे १७७ कोटी अनुदान प्राप्त; निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गेल्या वर्षी खरीप हंगामात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून दुसऱ्या हप्त्याची १७७ कोटी २९ लाख रुपयांचा हप्ता प्राप्त झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिली. 


बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने जिल्ह्याला ४४३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापैकी यापूर्वी ११८ कोटी रुपये जिल्ह्याला वितरित करण्यात आले अाहेत. महसूल विभागातर्फे शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३ लाख २५ हजार ११३.५३ हेक्टरवरील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. 
त्यामुळे ८१.७५ टक्के कपाशीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ४ लाख ८७,४९७ शेतकऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे बोंडअळीबाबत तक्रारी केल्या होत्या. कृषी विभागाने ७५ हजार ८६६ शेतकऱ्यांच्या तक्रारी अपूर्ण माहितीमुळे नाकारल्या आहेत. ४ लाख ११ हजार ६३१ तक्रारी स्वीकारण्यात आल्या आहेत. या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात येत आहे. 


एरंडोल, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चाळीसगाव, पारोळा व चोपडा येथे पहिल्या टप्प्यातील पूर्ण मदतीचे शेतकऱ्यांना वाटप केले आहे. उर्वरित सहा तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यातील मदतीचे वाटप अपूर्ण आहे. आतापर्यंत या तालुक्यांमध्ये ६० टक्क्यांपर्यंत मदत शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातही मदतीचे वाटप अपूर्ण आहे. 


यापूर्वी ११८ कोटींपैकी १६ कोटींची रक्कम शेतकऱ्यांना वितरित 
कोरडवाहूसाठी हेक्टरी ६ हजार ८०० तर बागायतीसाठी १३ हजार ५०० रुपयांची मदत शासनाने यापूर्वीच जाहीर केली आहे. या निकषानुसार शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येत आहे. यापूर्वी प्राप्त झालेल्या ११८ कोटींपैकी १६ कोटींची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याचे अद्याप बाकी आहे. 

बातम्या आणखी आहेत...