आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२०,२२४ कृषिपंपांना लवकरच उच्च क्षमतेचा वीज पुरवठा; १६ नवीन उपकेंद्रासाठी २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी लवकरच हाय व्होल्टेज वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतील (एचव्हीडीएस) कामांची ऑनलाइन निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सुमारे ४७६ कोटी ४५ लाख रुपयांच्या कामांच्या या पारदर्शी निविदा प्रक्रियेतून २० हजार २२४ कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीजजोडणीची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिली. 


योजनेंतर्गत यापुढे एका वितरण रोहित्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप असणार आहेत. सततचा वीज पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून यामुळे शेतकऱ्यांची आता कायमची सुटका होणार आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या वितरण रोहित्र खरेदीची निविदा प्रक्रिया महावितरण मुख्यालयाकडून यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ३१ मार्च २०१७ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना वीज जोडणी देण्याची घोषणा विधिमंडळात करण्यात आली होती. या अनुषंगाने राज्यस्तरावर सर्वेक्षण करण्यात येऊन याबाबतची योजना तयार करण्यात आली. त्यानुसार महावितरण परिमंडळक्षेत्रात ३१ मार्च २०१७ सोबतच ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपाच्या वीज जोडण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांसह नव्याने मागणी करणाऱ्या ग्राहकाला एचव्हीडीएस या योजनेतून जोडणी दिली जाणार आहे. सध्या ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषिपंपांसाठी वीज पुरवठा केला जातो. सोबतच आकडे टाकून विजेचा वापर करणाऱ्याची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विजेचा दाब वाढून रोहित्र जळण्याचे प्रमाणही अधिक आहे. प्रचलित पद्धतीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते, वीजहानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वीजपुरवठ्यात वारंवार बिघाड होतो. यावर एचव्हीडीएस योजनेद्वारे या सर्वांवर मात करता येणे शक्य हाेईल. 


उच्चदाब वितरण प्रणालीचे फायदे 
वीजेची तांत्रिकहानी कमी होईल. वितरण रोहित्र जळण्याच्या प्रमाणात घट होईल. उच्च दाब वितरणप्रणालीत लघुदाब वीज वाहिनी नसल्याने व वितरण रोहित्रावरील वीजभार मर्यादित असेल. त्यामुळे अतिभार व लघुदाब वाहिन्यातील तांत्रिक बिघाड होणार नाही. अनधिकृत कृषिपंपाद्वारे वीजवापर होणार नाही. दोन वा तीन कृषिपंप ग्राहकांसाठी कमी क्षमतेचे १ वितरण रोहित्र असेल. त्यामुळे संबंधित कृषिपंप ग्राहकांमध्ये रोहित्राबद्दल स्वमालकीची भावना निर्माण होईल. ग्राहक रोहित्र नादुरुस्त होणार नाही व कुणीही अनाधिकृत वापरणार नाही याची काळजी घेईल. विजेची वाणिज्यिक हानी कमी होईल. योग्य दाबाचा वीजपुरवठा होईल. वापरकर्त्यापर्यंत ११ केव्ही उच्चदाब वीजवहिनी पोहचणार असल्याने कृषिपंप व्यवस्थित चालतील. वीज चोरीस आळा बसेल. वितरण रोहित्रावरून कृषिपंपास वीज जोडणी देण्यासाठी लघुदाब एरियल बंच केबलचा वापर केला जातो. 


असा आहे निधी 
- जळगाव जिल्ह्यासाठी २२७ कोटी ११ लाख, धुळे १३६ कोटी ९८ लाख, नंदुरबारसाठी ८७ कोटी निधी मंजूर आहे. 
- १६ उपकेंद्रे उभारण्यासाठी २६ कोटी रुपये निधी मंजूर आहे. नंदुरबार जिल्ह्यात बिरसा मुंडा कृषिक्रांती योजनेतून १४८८. 


पंपाची संख्या अशी
जळगाव परिमंडळातील पैसे भरुन प्रलंबित २० हजार २२४ कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीव्दारे वीज जोडणी देण्यात येणार आहे. यात जळगाव जिल्ह्यात १०१८९, धुळे ६१६३, नंदुरबार ३८७२ कृषिपंप अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...