आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच निरीक्षकांसह २४५ पोलिसांच्या बदल्या; स्थानिक गुन्हे शाखेच्या सुनील कुराडे यांना दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अनेक दिवसांपासून प्रस्तावित असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना शुक्रवारचा मुहूर्त लाभला. जिल्ह्यातील पाच पोलिस निरीक्षकांसह २४५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी करण्यात आल्या. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय कारणास्तव एक वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. 


राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजकुमार   व्हटकर यांनी पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी दुपारी काढले. यात जिल्ह्यातील आदिनाथ बुधवंत यांची अमरावती ग्रामीण, पाचोऱ्याचे शाम सोमवंशी यांची टीआरटीआय नंदुरबार, जळगाव शहर पोलिस ठाण्याचे प्रदीप ठाकूर यांची बुलढाणा, वसंत मधुकर मोरे यांची अकोला तर अनिल देशमुख यांची नवी मुंबईत बदली करण्यात आली आहे. तसेच नंदुरबार येथील रामकृष्ण कुंभार, नागपूर येथील गुलाब पाटील आणि बुलडाण्याचे प्रताप शिकारे यांची जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. 


दरम्यान, नोव्हेंबर २०१७ मध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकपदी रुजू झालेले सुनील कुराडे यांचा जिल्ह्यातील आठ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. परंतु, प्रशासकीय कारणामुळे त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी देखील त्यांचीही बदली होणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. 


जिल्ह्यातील २४५ पोलिसांच्या बदल्या 
जिल्ह्यातील २४५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची यादी शुक्रवारी रात्री उशिरा जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी जाहीर केली. गेल्या चार दिवसांपासून बदलीस पात्र कर्मचाऱ्यांच्या मुलाखती सुरू होत्या. शुक्रवारी रात्री उशिरा कराळे यांनी २४५ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या. यात सहाय्यक पोलिस निरीक्षक ७८, पोलिस हवालदार १३०, महिला कर्मचारी १५ तर १५ चालकांच्या बदल्या केल्या आहेत. एका तालुक्यात १२ वर्षे तर पोलिस ठाण्यात ५ वर्ष पूर्ण केलेल्यांचा त्यात समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...