आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमविचा 27 ला दीक्षांत सोहळा 21 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २६ वा पदवी प्रदान समारंभ २७ राेजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात अायाेजित करण्यात अाला अाहे. या समारंभासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध अनिवासी भारतीय शास्रज्ञ व उद्याेजक डाॅ.अशाेक जाेशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते पाॅवर पाॅइंट प्रेझेंटेशनसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार अाहेत. तर प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी २१ हजार १५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती शुक्रवारी कुलगुरू पी. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


पदवी प्रदान समारंभात ३५ हजार १६४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार अाहे. यात विज्ञान, तंत्रज्ञान विद्याशाखेचे ११ हजार ९२५ विद्यार्थी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ३ हजार ३२५ विद्यार्थी, मानव्य विद्याशाखेचे ५ हजार २४२ आणि आंतर विद्याशाखेचे ६६३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गुणवत्ता यादीतील ८४ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे. यंदा विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही मंचावर बाेलावण्यात येणार अाहे. समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी २१ हजार १५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यामध्ये २२२ पीएच.डी. धारक विद्यार्थी आहेत. दरम्यान, या समारंभाची तयारी पूर्ण झाली असून, जवळपास २ हजार निमंत्रितांची आसन व्यवस्था केली आहे. विविध समित्या स्थापन केल्या अाहेत. या सर्व समित्यांमार्फत कामाचा आढावा कुलगुरू घेत अाहेत. या वेळी सुनील पाटील, ए. बी. चाैधरी उपस्थिती हाेते. 


डॉ. जोशींकडे १०० पेटंट 
अशाेक जाेशी यांचे अमेरीकेत विज्ञान व उद्याेजक क्षेत्रात माेठे कार्य अाहे. १९६६मध्ये पुणे येथील काॅलेज अाॅफ इंजिनिअरिंग येथून अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या जाेशी यांनी अमेरिकेतील नाॅर्थ वेस्टर्न विद्यापीठातून एम.एस. अाणि पीएच.डी. पदवी प्राप्त केली अाहे. 


पेनिसिल्व्हेनिया विद्यापीठातून ते पाेस्ट डाॅक्टरेट झाले. अमेरिकेतील मान्यताप्राप्त संशाेधक व उच्च तंत्रज्ञानातील उद्याेजक अशी त्यांची अाेळख अाहे. ऊर्जा, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रात त्यांनी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले असून १०० पेक्षा अधिक अमेरिकी पेटंट त्यांच्या नावावर अाहेत. भारतात २ हजार अपंग विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ६ शाळा सुरू केल्या अाहेत. 


प्रथमच ऑनलाइन अर्ज मागवले 
यावर्षी प्रथमच पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. पेपरलेस कामकाजाच्या दृष्टीने विद्यापीठाने टाकलेले हे पाऊल आहे. यंदा पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेचे नाव छापण्यात आले आहे. तसेच िवद्यार्थ्याच्या आईचे नाव देखील प्रमाणपत्रावर असेल तर प्रमाणपत्रावर क्यूआर कोड राहणार असून या कोडचा उपयोग मोबाइल अॅप्लीकेशनद्वारे पदवी पडताळणीसाठी होणार आहे. विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी डिग्री कोड देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी पदवी ग्रहण करण्यासाठी दीक्षांत समारंभाच्या दिवशी संकेतस्थळावरून प्राप्त केलेला डिग्री कोड, ओळखपत्र किंवा ओळखदर्शक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळणे सोयीचे व्हावे, याकरिता पदवी प्रमाणपत्राचे वाटप तालुका / महाविद्यालयनिहाय ( सर्व अभ्यासक्रम) काउंटरवर देण्याची व्यवस्था करण्यात आली असून तसेच समारंभस्थळी सकाळी ठिक ९ वाजता विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असेही या वेळी सांगण्यात अाले.

बातम्या आणखी आहेत...