आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसांत पाच लाख ३४ हजार ८१० रोपे लावली; विभागात जळगाव जिल्हा द्वितीय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वृक्षारोपण मोहिमेच्या चार दिवसातच नाशिक विभागाने वृक्षारोपणात मोठा आकडा गाठला आहे. विभागात १३ लाख ५४ हजार तर जळगाव जिल्ह्यात दोनच दिवसांत ५ लाख ३४ हजार ८१० वृक्षांची लागवड झाली आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा दुसऱ्यास्थानी अाहे. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात ७२ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. 


जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी जळगाव व यावल येथील उप वनसंरक्षकांशी चर्चा करुन १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा घेतला. त्याचबरोबर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. रावेर, यावल, चोपडा या भागात ही मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यात येत असल्याचे यावल विभागाचे उपवनसंरक्षक संजय दहिवले यांनी सांगितले. वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत जिल्ह्यात वन विभागामार्फत ४ लाख १२ हजार २२, जलसंपदा विभागामार्फत ३ हजार ३७०, सहकार व पणन विभागामार्फत १ हजार ६५४, ग्रामपंचायतीमार्फत १ हजार १२५, सामाजिक वनीकरण विभागामार्फत ९९ हजार २३२ तर वन्यजीव ११ हजार, महसूल विभागामार्फत १ हजार ५०, नगरविकास विभागामार्फत २ हजार ५८५ , जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांनी १ हजार ६१८ वृक्षांची लागवड केली आहे. जिल्ह्यात पावसाचे आगमन झाल्याने आता ग्रामपंचायत पातळीवर वृक्ष लागवड मोहिम व्यापक स्वरुपात राबविण्यात येऊन देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी दिली. 


दिखाऊ वृक्षारोपणाला चाप 
सरकारी कार्यालयात वृक्षारोपण फार्स ठरू नये, यासाठी खड्डे आणि प्रत्यक्ष लागवड याची संपूर्ण माहिती माय प्लँट अॅपवर अपलोड करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता सरकारी बाबूंच्या दिखाऊ वृक्षारोपणाला चाप बसणार आहे. सरकारी विभागांकडून वृक्षारोपणाचे सोपस्कार पार पाडण्यात येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. अनेक सरकारी कार्यालयांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमांचा गाजावाजा केला. त्याची छायाचित्रे काढली. परंतु, प्रत्यक्षात वृक्षारोपण आणि वास्तव परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे वृक्षारोपणाचा दिखाऊपणा असू नये, यासाठी सरकारी कार्यालयांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. 


महिनाभर चालणार माेहीम 
यंदा वृक्षारोपण मोहीम महिनाभर चालणार आहे. वृक्षारोपणाच्या अगोदर महिनाभरापूर्वी खड्डे खोदण्याच्या वनविभागाच्या सूचना आहेत. त्यानुसार ३१ मेपर्यंत खड्डे खोदण्याचे आदेश सरकारी कार्यालयांना देण्यात आले. खड्डे खोदल्यानंतर त्याचे छायाचित्र माय प्लँट अॅपवर अपलोड करावे लागणार आहे. त्यामुळे वृक्षारोपणाचा दिखावा करण्याची संधी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. खोटी माहिती दिल्यास या अॅपमुळे ती माहिती उघड होऊ शकणार आहे. खड्डे खोदल्यानंतर आणि वृक्षारोपणानंतर संबंधित छायाचित्रे कोणी काढली, याचा उल्लेखही अॅपमध्ये असणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात चांगलीच धडकी भरली आहे. 


पावसामुळे अडचणी
शासनाच्या योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात पावसामुळे वृक्षारोपणास अडचणी येत अाहे. यातही उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू आहे. ऑफ लाइनही आलेली माहिती घेऊन रोपे पोहोचवण्याचे काम सुरू आहे. यामुळे उद्दिष्टापेक्षा जास्त वृक्षलागवड होईल. 
- डी. डब्लु. पगार, उपवनसंरक्षक