आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: पोलिस गस्तीवर असतानाही एकाच रात्रीत पाच घरफोड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील वेगवेगळ्या भागात एकाच रात्रीतून पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या. सुदैवाने यात जास्त रक्कम किंवा ऐवज चोरीस गेला नाही. परंतु पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटना आहेत. बोहरा बाजारात पहाटे ५.१५ वाजता चोरट्याने एक दुकान फोडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पॉश दुचाकीवरून आलेला हा चोरटा परिसरातील एका दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पहाटेच्या उजेडात भर रस्त्यावरील दुकान फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. शनिवारी रात्रीतून चोऱ्या करीत चोरट्यांनी विकेंड साजरा केला असून पोलिसांची झोप उडवली आहे. शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिनकरनगर व बोहरा गल्ली, जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुड्डुराजानगर, गांधीनगर व जिल्हापेठ परिसरात अशा चार ठिकाणीतील ३ घरे, १ दुकान व १ दवाखाना येथे चोरट्यांनी हातसफाई केली आहे.


बोहरा गल्ली : सुभाष चौकाजवळील बोहरा गल्लीत गुलामअली मोहम्मद अली लहरी यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. रविवारी पहाटे ५.१५ मिनीटांनी एका पॉश दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने दुकानाच्या समोर दोन वेळा फेऱ्या मारल्या. नंतर चोरट्याने त्यांच्या दुकानाचा कडी कोयंडा तोडला. तसेच दुकानाच्या लाकडी दरवाजाला आडवी लावलेल्या लोखंडी पट्टीचे दोन कुलूप त्याने तोडले. दुकानात प्रवेश करीत चोरट्याने गल्ल्यातील २०० रूपये चोरून नेले. लहरी यांच्या हार्डवेअर दुकानाजवळ मुथा ब्रदर्स नावाचे यांचे दुकान आहे. दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरटा कैद झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पहाटेच्या उजेडात चोरट्याने भररस्त्यावर असलेले दुकान फोडण्याची मजल मारली आहे. या बोहरा गल्ली येथून हाकेच्या अंतरावर सुभाष चौकातील पोलिस चौकी आहे. हे विशेष म्हणावे लागेल. दरम्यान, पाेलिसाच्या पथकानी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन चाेरट्याचा शाेध सुरु केला अाहे.

 

दिनकरनगर : शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आसोदा रस्त्याला लागून हा परिसर आहे. येथील दोन घरांमध्ये चोरी झाली आहे. गणेश जानकीराम बाविस्कर हे एमआयडीसी परिसरातील कंपनीत कामाला आहे. शनिवारी रात्री ते कुटुंबीयांसह घराच्या गच्चीवर झोपण्यास गेले होते. चोरट्यांनी संधी साधून त्यांच्या घराच्या लाकडी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी शोकेस, कपाट फोडून रोख २ हजार ५०० रूपये त्यांनी लंपास केले. तसेच घरातील माळ्यावर ठेवलेले सर्व डबे, देव घरही तपासले. पहाटे ५ वाजता बाविस्कर हे खाली आल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसून आला. तसेच दिनकरनगर परिसरातच असलेल्या घर क्रमांक ३६ मध्ये एकनाथ गुलाब बाविस्कर हे राहतात. शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ते परिवारासह हातेड (ता.चाेपडा) येथे शेतात हरभरा कापणीच्या कामासाठी गेले होते. शनिवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट फोडून त्यातील ३० हजार रूपये रोख आणि ५ हजार रूपये किमतीच्या चांदीच्या साखळ्या लंपास केल्या. किचनमध्ये असलेल्या लाकडी देवघरातील काही पैसे देखील चोरट्यांनी चोरून नेले. रविवारी सकाळी आजूबाजूला राहणारे नागरिक उठल्यावर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर परिसरातील नागरिकांनी शनी पेठ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला.


गुड्डूराजानगर : एसएमआयटी काॅलेज मागील असलेल्या गुड्डूराजानगरातील घर क्रमांक अ-८ हे चोरट्यांनी फोडल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. नितीन पाचपांडे यांच्या मालकीचे हे घर अाहे. पाचपांडे कुटुंबीय नाशिक येथे राहण्यासाठी गेले असून मागील बाजूस असलेले घर त्यांनी भाड्याने दिले आहे. दरम्यान, पुढील बाजूस असलेल्या पाचपांडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. परंतु हे घर बंद असल्यामुळे त्यात सामानही ठेवलेले नव्हते. चोरट्यांनी तपासणी केली असता त्यांना काहीच मिळाले नाही. अशी माहिती पाचपांडे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. दरम्यान, चार दिवसांपासून चोरट्यांनी या घरावर पाळत ठेवली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. कारण चार दिवसांपूर्वीच घराच्या कंपाऊंडमध्ये कुणीतरी प्रातर्विधी केल्याचे आढळून आले होते. परंतु कुणीतरी खोडसाळपणा केला असावा, असे भाडेकरू पुष्पा खिंवसरा यांना वाटले. दरम्यान, रविवारी पाचपांडे यांच्या घराचा दरवाजाचे कुलूप तोडलेले असल्यामुळे हा प्रकार चोरट्यांनी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...