आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएमद्वारे फसवणूक; एकाच दिवशी 26 ट्रान्झेक्शनद्वारे काढले 50 हजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मित्रांना पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड देऊन त्यांना पासवर्डही सांगणे तालुक्यातील वावडदा येथील युवकाला चांगलेच महागात पडले. या युवकाच्या एटीएमद्वारे एकाच दिवशी ऑनलाइन खरेदीच्या माध्यमातून २६ वेळा ट्रान्झेक्शन करून बंॅक खात्यातून ५० हजार रुपये काढून फसवणूक करण्यात आली आहे.

 

गणेश देविदास कळसे या युवकाचे वावडदा येथे इलेक्ट्रिकचे दुकान आहे. त्याच्या एका मित्राला पैशांची आवश्यकता होती. त्याने गणेश याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे नसल्याने २४ मे रोजी गणेश याने मित्राला त्याचे एटीएम कार्ड दिले. तसेच पैसे काढण्यासाठी पासवर्ड देखील सांगितला. त्यानंतर दुसऱ्या एका मित्राला ही त्याने याच पद्धतीने पैसे दिले. तीन दिवसांनंतर मित्राने गणेशला एटीएम परत दिले. २९ मे रोजी त्याच्या बंॅक खात्यातून २६ वेळा पैसे काढण्यात आले. कोणत्या तरी भामट्याने ऑनलाइन खरेदी करून ५० हजार रुपये बंॅक खात्यातून काढल्याचे ३० मे रोजी गणेश याच्या लक्षात आले. त्याने तातडीने एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून यासंदर्भात तक्रार दिली. प्रथमदर्शनी पोलिसांनी गणेशला पासवर्ड विचारून एटीएमद्वारे पैसे काढणाऱ्या मित्रांवरच संशय व्यक्त केला. त्यांच्याशी माेबाइलद्वारे संपर्क साधण्याचा देखील पोलिसांनी प्रयत्न केला. सद्य:स्थितीत त्याचा एक मित्र केरळ येथे गेलेला आहे. मित्रांनी फसवणूक केली नसावी, असे गणेश याने पोलिसांना सांगितले अाहे.

 

सायबर सेलने कंपनीला पाठवला ई-मेल
ऑनलाइन फसवणुकीचे प्रकरण असल्याने या प्रकरणाबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध आढाव यांनी सायबर सेलला कळवले अाहे. फसवणूक करणाऱ्या भामट्याने एटीएम कार्डचा वापर करून अॉनलाइन खरेदी केलेली आहे. त्याद्वारे बँकेतील ५० हजार रुपये काढलेले आहेत. या ऑनलाइन खरेदीद्वारे भामट्याने ऑनलाइन शॉपिंग केली असून त्याचे बिल अडवण्यात यावे, अशा आशयाचा ई-मेल सायबर सेलने ऑनलाइन खरेदी करण्यात आलेल्या कंपनीला पाठवलेला आहे. दोन दिवस बंॅकांचा संप असल्याने हे ट्रान्झेक्शन न होण्याबाबत शंकाच आहे. २४ तासांच्या आत कंपनीला पैसे न मिळाल्यास फसवणूक करणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात सापडू शकतो.

बातम्या आणखी आहेत...