आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ- जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भुसावळ येथील हतनूर धरणात तब्बल ५४ टक्के गाळ असल्याची धक्कादायक माहिती नाशिकच्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट तथा 'मेरी'च्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
नाशिक येथील 'मेरी' या संस्थेने गेल्या उन्हाळ्यात हतनूर धरणाचे सर्वेक्षण केले होते. त्यांचा अहवाल पाटबंधारे विभागाला नुकताच प्राप्त झाला. सन २००७ नंतरच्या ११ वर्षात हतनूरमधील गाळाची टक्केवारी १४ टक्क्यांनी वाढली आहे. हा वेग कायम राहिल्यास जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले धरण येत्या १० वर्षांत पूर्णपणे गाळाने भरण्याची भीती आहे. सन १९८६ मध्ये पूर्णा नदीला आलेल्या महापुरापासून या धरणात गाळ संचयनास सुरुवात झाली. पाटबंधारे विभागाने सुरुवातीपासून गाळ काढण्याचे कोणतेही नियोजन केले नाही. परिणामी 'मेरी'ने सन २००७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात हतनूर धरणात सुमारे ४० टक्के गाळ असल्याचे समोर आले होते. यामुळे प्रकल्पाचा १३३ दलघमीचा मृतसाठा तब्बल २४ दलघमीपर्यंत घसरला होता. म्हणजेच १०९ दलघमी पाण्याची जागा गाळाने व्यापली होती. आता ११ वर्षांनंतर मेरीने गेल्या उन्हाळ्यात हतनूरचे पुन्हा सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा अहवाल पाटबंधारे विभागाला प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार हतनूरमध्ये सद्य स्थितीत तब्बल ५४ टक्के गाळ आहे. अहवालात मेरीने धरणाच्या २०७.७०० मीटरवरील पातळीचे सर्वेक्षण केल्याचे नमूद आहे.
दुर्लक्षित : गाळाचे प्रमाण कमी करण्यासाठी बुडीत क्षेत्रात तापी व पूर्णा काठावर नियोजनपूर्वक वृक्षारोपण करणे, संपादित जमिनीची धूप थांबवणे आदी उपाययोजना सुचवल्या होत्या. मात्र, पाटबंधारे विभागाने या उपयायोजनांकडे दुर्लक्ष केले. हतनूर धरणावर ११० दलघमीचे वार्षिक आरक्षण आहे.
का साचतो गाळ ?
मध्य प्रदेश व विदर्भातून वाहणारी पूर्णा नदी राज्यातील सर्वाधिक गाळ वाहून आणणाऱ्या नद्यांपैकी एक आहे. पूर्णातून हतनूरमध्ये सर्वाधिक गाळ येतो. गाळाचे सहज उत्सर्जन होण्यासाठी ८ विस्तारित वक्राकार दरवाजांची उभारणी प्रस्तावित आहे. मात्र, हे काम गेल्या १० वर्षांपासून पूर्णपणे खोळंबले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.