आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाडा हत्याकांड: आणखी 20 नावे समोर, सर्व संशयित फरार; संशयितांची संख्या 60 वर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील सामूहिक हत्याकांड प्रकरणी २० मारेकऱ्यांची नावे तपासातून समोर आली आहेत. विशेष म्हणजे हे सर्व संशयित गावातून पसार झाले आहेत. सायबर सेलच्या मदतीने संशयितांची नावे शोधण्यात आली. त्यामुळे अटकेतील २४ अाणि नव्याने समोर आलेल्या २० मारेकऱ्यांसह संशयितांची संख्या सुमारे ६० पर्यंत जाणार आहे.

 

या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी  अधिकृत दुजोरा दिला. शिवाय तपासाच्या कारणास्तव मारेकऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, विसरवाडी येथून महारू वंक्या पवार (वय. २१) याला पोलिस निरिक्षक दिवाणसिंग वसावे यांनी बुधवारी रात्री उशीरा अटक केली. 

 
पिंपळनेरपासून जवळ असलेल्या राईनपाडा गावात दि १ जुलै राेजी सामूहिक हत्याकांड झाले होते. मुले पळवण्याच्या संशयावरून पाच भिक्षुकांचा ठेचून निर्दयीपणे खून करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देऊन २४ संशयितांना अटक केली.  पोलिसांच्या भीतीने मारेकरी पसार झाले आहेत. अटकेतील संशयितांकडे विचारपूस करण्यासोबत पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली आहे. त्यामुळे  २० संशयितांची नावे स्पष्ट झाली आहेत. त्यापैकी बहुतांशी संशयित  राईनपाडा गावाला लागून असलेल्या इतर गावांमधील आहेत. शिवाय संशयितांमध्ये तरुणांची संख्या अधिक आहे.

 

घटनेनंतर सर्व संशयित  पसार झाले आहेत. त्यांच्या शोधात पोलिसांचे  पथक शेजारील जिल्ह्यामध्ये  गेले आहे. या सर्व संशयितांचा  माग काढण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जाते आहे. एवढेच नव्हे तर अटकेतील २३ व नव्याने समोर आलेल्या २० संंशयितांनंतरही एकूण मारेकऱ्यांची संख्या सुमारे ६० पर्यंत जाणार आहे. या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. 

 

यू ट्यूब चॅनल अन‌् चौकशी   

साक्री परिसरातील एका कथित यू ट्यूब चॅनलने घटनेपूर्वी मुले पळवणाऱ्यांबद्दल वृत्त दिले होते. कथित यू ट्यूबची लिंक शेअर करून अनेकांनी हे वृत्त बघितले. दुर्दैवाने त्यामुळे अफवा अधिक पसरली. असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधित यू ट्यूब चॅनलच्या तिघांना बोलावून त्यांची कसून चौकशी केली. प्रसंगी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ही केली जाऊ शकते, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.  

 

समन्वय, अद्ययावत तंत्राने तपास   
पोलिस गांभीर्याने तपासात गुंतले आहेत. तपास प्रगतिपथावर आहे. पसार असलेल्या काही संशयितांची नावे समोर आली आहेत. पोलिस पथक त्यांच्या मागावर आहेत. त्यामुळे मारेकऱ्यांचा आकडा ६० पर्यंत जाऊ शकतो. तपासासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते आहे. शिवाय पोलिस दल समन्वयाने तपासात गुंतले आहे.   
- विवेक पानसरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनेच्‍या तिस-या दिवशीही गावातील बहुतांश घरांना कुलुप...

 

बातम्या आणखी आहेत...