आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नपत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या दुचाकीस्वार रेल्वे कर्मचाऱ्याला उडवले; चार दिवसांत चाैघांचा बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- साडूच्या मुलाचे लग्न असल्याने रविवारी सुटीच्या दिवसाचे निमित्त साधत लग्नपत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या दुचाकीस डंपरने धडक दिली. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी १२.३० वाजता अजिंठा चौफुलीजवळ महामार्गावर हा अपघात झाला. वाळू वाहतूक करणारे डंपर जळगावकरांच्या जीवावर उठले असून गेल्या चार दिवसांत चाैघांचा बळी गेला अाहे. 


चंद्रकांत भुता पाटील (वय ५२, रा.पोस्टल कॉलनी) असे मृत रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. पाटील हे २५ वर्षे भारतीय सैन्यात नोकरी केल्यानंतर निवृत्त होऊन रेल्वेत ट्रॅकमन म्हणून नोकरीस लागले होते. जुलै महिन्यात त्यांच्या साडूच्या मुलाचे लग्न असल्याने त्यांनी रविवारी जळगाव शहरातील नातेवाइकांकडे पत्रिका वाटण्याचा बेत आखला होता. त्यानुसार दुपारी १२ वाजता भावाचे मेहुणे पुरुषोत्तम रामू कोल्हे (वय ५६, रा. सम्राट कॉलनी) यांच्या घरी गेले होते. तेथून त्यांनी कोल्हे यांची दुचाकी (एमएच- १९, बीवाय- ०६४४) घेतली. याच दुचाकीने ते पत्रिका वाटणार होते. दुचाकी घेऊन निघालेले पाटील अजिंठा चौफुलीवरून पुढे येताच ट्रान्स्पोर्टनगरजवळ समोरून येणाऱ्या एका डंपरने (एमएच- ०६, बीडी- ५६५६) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यास जबर मार बसला होता. जखमी अवस्थेत नागरिकांनी खासगी वाहनाने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यानंतर काही वेळातच खासगी रुग्णालयात हलवले होते. उपचार सुरू असताना सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. डाॅक्टरांनी उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही पाटील यांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीय, नातेवाइकांनी आक्रोश केला. पाटील यांच्या पश्चात पत्नी नयना, मुलगी धनश्री (वय २३), मानसी (वय १८) व मुलगा मोहित (वय १५) असा परिवार आहे. कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबावर अाभाळ काेसळले अाहे. पुरुषोत्तम कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


समांतर रस्ते नसल्याने वर्षभरात ४५० बळी 
कालिंकामात चौफुली ते खोटेनगर हा सात किमीचा महामार्ग शहरातून जातो. वाहतूक वाढल्याने या मार्गावरून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. अवजड वाहनांची वर्दळ जास्त असल्यामुळे अपघातांची शक्यता वाढल्या आहेत. शहरातून जाणाऱ्या महामार्गाला लागून समांतर रस्त्यांची आवश्यकता आहे. समांतर रस्ते नसल्यामुळे वर्षभरात सुमारे ४५० निर्दाेष लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. पाटील यांचा देखील बळी याच कारणामुळे गेला असल्याचे समाेर अाले. 


चार दिवसांत चार बळी 
> २१ जून : पाळधी येथून जळगावात येणाऱ्या प्रवासी रिक्षेत बसलेल्या प्रेमनगरातील अाशा साेमानी (वय ५२) यांचा एक पाय बाहेर हाेता. पाठीमागून डंपरने जबर धडक दिल्याने त्या जखमी झाल्या हाेत्या. त्याच दिवशी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अाहुजानगरजवळ हा अपघात झाला हाेता. 
> २२ जून : जळगाव शहरातून खासगी कामे अाटाेपून परतताना जामनेर तालुक्यातील माेहाडी येथील दुचाकीस्वार शेतकरी भारत बागुल (वय ३७) यांना वाळू भरलेल्या डंपरने चिरडले. त्यात त्यांचा बळी गेला. चिंचाेली बसस्थानकाच्या शेजारील गतिराेधकावर हा अपघात झाला हाेता. 
> २३ जून : जळगाव तालुक्यातील चिंचाेली येथे माेहाडीच्या शेतकऱ्याला ज्या जागेवर डंपरने शुक्रवारी चिरडले हाेते, त्याच जागेवर शनिवारी एका अनाेळखी तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला अाहे. या मृत तरुणाची अाेळख अद्याप पटलेली नाही. 
> २४ जून : शहरातील अजिंठा चाैफुलीच्या पुढील ट्रान्स्पाेर्टनगरजवळ समाेरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. त्यात पाेस्टल काॅलनीतील चंद्रकांत भुता पाटील (वय ५२) यांचा मृत्यू झाला. ते रेल्वेत ट्रॅकमन म्हणून नाेकरीला हाेते. दुपारी १२.३० वाजता ही अपघाताची घटना घडली. 


सैन्यदलात केली हाेती २५ वर्षे सेवा 
सैन्यात असताना पाटील यांनी २५ वर्षे देशाची सेवा केली. निवृत्तीनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रेल्वेत नोकरीस लागले होते. घरात पत्नी, दोन तरुण मुली, एक मुलगा आहे. तिन्ही मुलांचे शिक्षण सुरू आहे. पाटील यांच्या अपघाती मृत्यूमुळे नातेवाइकांनी हळहळ व्यक्त केली. 


डंपरसह चालक पसार, दुचाकी जप्त 
या अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. तत्पूर्वी अपघात घडल्यानंतर डंपरचालक न थांबताच वाहनासह पळून गेला. यानंतर तो पोलिस ठाण्यात हजर न होता बेपत्ता झाला आहे. तर पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी जप्त केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...